'भरत गोगावले आमच्या गटाचे प्रतोद, त्यामुळे...'; दीपक केसरकर संजय राठोड, बच्चू कडू काय बोलले?

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे गटातील मंत्र्यांनी शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांना केलं अभिवादन
maharashtra cabinet expansion : deepak kesarkar on bharat gogawale, sanjay rathod and bacchu kadu
maharashtra cabinet expansion : deepak kesarkar on bharat gogawale, sanjay rathod and bacchu kadu

मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटातील ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज हे सर्व कॅबिनेट मंत्री मुंबईतल्या बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळि गेले होते. या मंत्र्यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं. यावेळी दीपक केसरकर यांनी संजय राठोड, बच्चू कडू आणि भरत गोगावले यांच्याबद्दल भाष्य केलं.

माध्यमांशी बोलताना दीपक केसरकर म्हणाले, "मंत्रिपदाची शपथ घेतली असली, तरी मंत्रालयाचा कार्यभार कार्यालयात जाऊन स्वीकारायचा असतो. आमच्या कार्यालयांचं वितरण झालेलं नाही. वितरण झाल्यानंतर आम्हाला जी कार्यालये दिली जातील, त्याचा कार्यभार स्वीकारू. कार्यभार स्वीकारण्यापूर्वी बाळासाहेबांचं दर्शन घेत आवश्यक होतं, कारण त्यांच्या प्रेरणेनं महाराष्ट्राचा विकास करायचा आहे."

मुख्यमंत्र्यांनी पदाचा कार्यभार घेतला, त्यावेळी फक्त मुख्यमंत्रीच नाही, तर ५० आमदारही पावसात भिजत बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी आलो होतो. त्यांचे आशीर्वाद घेतले होते. त्यांच्या प्रेरणेने आम्हीच नाही, तर आमच्यासोबत असलेला भाजपही त्यांच्या विचार घेऊन काम करेल", अशी अपेक्षा दीपक केसरकर यांनी व्यक्त केली.

संजय राठोडांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर दीपक केसरकरांचा खुलासा

"संजय राठोडांवर कोणताही दोष सिद्ध झालेला नाही. त्यामुळे अशा परिस्थिती त्यांना त्यांच्या कर्तव्यापासून किती काळ वंचित ठेवणार. ते एका मागासलेल्या समाजाचं, भटक्या समाजाचं ते प्रतिनिधीत्व करतात. त्यांच्या समाजाचीही मागणी होती की, त्यांच्यावर आरोप सिद्ध झालेला नसेल, तर तुम्ही आमच्या समाजावर अन्याय करत आहात."

"त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे तपासावर परिणाम होणार नाही. तसं झालं, तर निर्णय घेतला जाऊ शकतो. संजय राठोडांनी टोकाचा निर्णय घेण्याचा इशारा दिल्यामुळे एकनाथ शिंदेंनी हा निर्णय घेतला, असं अजिबात नाहीये. असं का व्हावं? इतक्या दिवसांत ते असं बोलले असते का? मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश नसता, तर ते दोषी आहेत, असं चित्र समाजात गेलं असतं", असं स्पष्टीकरण दीपक केसरकर यांनी संजय राठोड यांच्या मंत्रिमंडळातील समावेशावर दिलं.

भरत गोगावले हे आमच्या गटाचे प्रतोद; दीपक केसरकर नेमकं काय म्हणाले?

"आमच्या गटाचे प्रतोद कोण आहेत? तर भरत गोगावले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात गोगावले यांचं नाव यायला हवं होतं. एकनाथ शिंदे यांच्यासमोर दोन पर्याय होते, एक मी (दीपक केसरकर) प्रवक्ता आहे आणि ते आमचे मुख्य प्रतोद आहेत. एकनाथ शिंदे यांनी जेव्हा जेव्हा मीटिंग घेतली, त्यावेळी दोन्ही बाजूला आम्ही बसलेलो असायचो. पण त्यांनी नाराजी व्यक्त केलेली नाहीये."

"सर्व आमदारांनी रायगडमधून एकमताने त्यांचं नाव सुचवलं होतं. मंत्रिमंडळ विस्तारावेळी कमी मंत्री घेतले जातात, त्यावेळी अनेकांना त्याग करावा लागतो. ही त्यागाची भूमिका फार महत्त्वाची असते. पुढे हीच लोक नेतृत्व करणार आहेत", असं दीपक केसरकरांनी सांगितलं.

बच्चू कडूंच्या नाराजीवर दीपक केसरकर काय म्हणाले?

"ते आमचे जवळचे नेते आहेत. आमच्या मित्रपक्षाचे ते अध्यक्ष आहेत. त्यांचा योग्य तो मान ठेवला जाईल. लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊ. मंत्रिमंडळ विस्तारानंतर त्यांना चांगलं खातं मिळालेलं दिसेल. त्याच्यामुळे थोडा संयम ठेवावा लागेल. पण त्याच्यापासून मिळणार फळ हे अतिशय गोड असेल." असे केसरकर बच्चू कडूंवरती म्हणाले आहेत.

नाराज आमदार शिवसेनेत जाणार? दीपक केसरकरांचा टोला

नाराज लोक परत शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू आहे, यावर दीपक केसरकर म्हणाले, "या सगळ्या अफवा आहेत. दिवा स्वप्न असतात ही. जेव्हा गुवाहाटी आणि गोव्यात होतो, त्यावेळी सांगितलं जात होतं की १५ लोक संपर्कात आहेत. २० लोक संपर्कात आहेत, ते आमच्याकडे येतील. प्रत्यक्षात अनेक आमदार कमी झालेत."

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in