अपयशी देशाकडून धडे शिकण्याची गरज नाही ! मराठमोळ्या अधिकाऱ्याने UNHRC मध्ये पाकला ठणकावलं
पवन बढे यांनी पाकिस्तानला दिलेल्या उत्तराची सर्वत्र चर्चा

अपयशी देशाकडून धडे शिकण्याची गरज नाही ! मराठमोळ्या अधिकाऱ्याने UNHRC मध्ये पाकला ठणकावलं

काश्मिर प्रश्नावरुन भारतावर टीका करणाऱ्या पाकिस्तानला भारताचं प्रत्युत्तर

काश्मिर प्रश्नावर आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला भारताने खणखणीत प्रत्युत्तर दिलं आहे. दहशतवादाचं केंद्र असलेल्या आणि अपयशी देशाकडून आम्हाला धडे शिकण्याची गरज नाही असं उत्तर भारताचे जेनेव्हामधले मराठमोळे अधिकारी पवन बढे यांनी दिलं आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या मानवी अधिकार आयोगात बोलत असताना पाकिस्तानने काश्मिरमधल्या सध्याच्या परिस्थितीचा दाखला देत भारतावर टीका केली होती.

पाकिस्तानची जगभरात ओळख ही दहशतवादाला खतपाणी घालणारा, प्रशिक्षण देणारा देश अशी आहे, अशा देशाकडून आम्हाला धडे शिकण्याची गरज नाही असं भारताने म्हटलं आहे. काश्मिर प्रश्नावर UNHRC ने आयोजित केलेल्या Organization of Islamic Cooperation (OIC) मध्ये बोलत असताना पाकिस्तानने केलेल्या टीकेला उत्तर देताना पवन बढे यांनी भारताची बाजू परखडपणे मांडली.

पाकिस्तानने स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी स्वतःकडे असलेल्या अध्यक्षपदाचा वापर करत OIC ला ओलीस ठेवण्याचा प्रकार केला असल्याचंही बढे म्हणाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर खोट्या माहितीच्या द्वारे नेहमी भारताविरुद्ध बोलत रहायचं ही पाकिस्तानची जुनी सवय असल्याचंही बढे यावेळी म्हणाले. स्वतःच्या देशात मानवी अधिकारांचं उल्लंघन होत असल्याचं सांगत बढे यांनी पाकिस्तानला टोला लगावला.

भारतात जगातली सर्वात मोठी लोकशाही कार्यरत आहे आणि तिचं काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. अशा देशाला दहशतवादाचं केंद्र असलेल्या आणि एका अपयशी देशाकडून धडे शिकण्याची गरज नसल्याचं बढे म्हणाले. पाकिस्तान स्वतः आपल्या देशातील अल्पसंख्यांक असलेल्या शिख, हिंदू, ख्रिश्चन आणि अहमदीया लोकांच्या मानवी हक्कांचं संरक्षण करण्यात अपयशी ठरल्याचंही बढेंनी ठणकावून सांगितलं.

पाकिस्तानात हजारो अल्पसंख्यांक मुलींचं अपहरण करुन त्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्विकारायला लावून त्यांचं लग्न केलं जात आहे. पाकिस्तानात एका विशिष्ट धर्म-पंथाच्या लोकांविरुद्ध होणारे हल्ले हे नेहमीचंच चित्र आहे. पाकिस्तानातील अल्पसंख्यांक लोकांच्या नेहमीच्या आयुष्यात सतत भीती असते असं म्हणत बधे यांनी पाकिस्तानला ठणकावलं. काश्मिर हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे यावर बोलण्याचा अधिकार OIC कडे नाही असं म्हणत बढे यांनी OIC ला ही फटकारलं आहे.

जम्मू आणि काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश जो भारताचा अविभाज्य भाग आहे त्याबद्दल OIC मध्ये झालेली चर्चा आम्ही फेटाळत आहोत. पाकिस्तान स्वतःचा अजेंडा राबवण्यासाठी OIC ला वारंवार ओलीस धरत आहे. एखाद्या विषयावर चर्चा करणं योग्य आहे की नाही हे सभासदांनी ठरवणं गरजेचं आहे", असं म्हणत बढे यांनी भारताची बाजू मांडली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in