मराठवाड्यात शेकडो शेतकऱ्यांनी कवटाळलं मृत्यूला; आत्महत्या का वाढल्या आहेत?

अतिवृष्टी, पीककर्ज व पीकविमा वेळेवर न मिळणे, सावकारी पाश, पिकांवरील रोग या कारणांमुळे मराठवाड्याचा शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे.
Farmers suicide in Marathwada
Farmers suicide in Marathwada

महाराष्ट्रातील मराठवाडा हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. येथील बहुतांश भाग हा शेतीवर अवलंबून आहे. मराठवाड्यात गेल्या काही वर्षांपासून अत्यल्प पाऊस पडतो. त्यामुळे नापिकी आणि कर्जबाजारीपणामुळे विदर्भापाठोपाठ मराठवाड्यातही हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यात यंदा मात्र अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या जिवावर उठली आहे.

शेतकरी पुन्हा मेटाकुटीला

आता पुन्हा इथला शेतकरी मोठ्या संख्येने आत्महत्या करतोय. त्याचं कारण आहे अतिवृष्टी, पीककर्ज व पीकविमा वेळेवर न मिळणे, सावकारी पाश, पिकांवरील रोग या कारणांमुळे मराठवाड्याचा शेतकरी पुरता मेटाकुटीला आला आहे. त्यामुळे बळीराजा गळफास किंवा विष पिऊन आपलं जीवन संपवतोय. मराठवाड्यातील मागच्या काही महिन्यांचा शेतकऱ्यांचा आत्महत्येचा आकडा पाहिला तर तो चिंताजनक आहे.

मराठवाडा : मागच्या 8 महिन्यात 625 शेतकऱ्यांनी संपवलं आपलं जीवन

लोकमतमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार मराठवाड्यात गेल्या 8 महिन्यात 626 आत्महत्या झाल्यात. मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात 109, जालना 77, परभणी 50, हिंगोली 24, नांदेड 89, बीड 170, लातूर 36 तर उस्मानाबाद जिल्ह्यात 71 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागात मागील तीन वर्षांपासून अतिवृष्टी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पाण्यात वाहून जात आहे. मराठवाड्यात सलग तिसऱ्या वर्षी अतिवृष्टीचा फटका खरीप हंगामातील पिकांना बसला आहे. वेळेवर बँकेचं कर्ज मिळत नाही. पिकविम्याचा हफ्ता भरला तरी दोन- दोन वर्ष पीकविमा मिळत नाही, अशी स्थिती मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर ओढवली आहे.

खासगी सावकारांचा पाश

घर चालवणं, महाग खते आणि बियाणे घेऊन पेरणीसाठी पैसे आणायचे कुठून? म्हणून शेवटी खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजावर घेतलेल्या कर्जाची रक्कम देखील हातात आलेल्या पिकांच्या पैशातून मिळत नाही. म्हणून मुद्दलापेक्षा व्याजाची रक्कम जास्त झालेला सावकार घरासमोर येऊन इज्जत काढतोय. नुकसान भरपाई मिळत नाही. पीकविमा दोन-दोन वर्ष मिळत नाही. त्यामुळे यासगळ्या त्रासाला कंटाळून शेतकरी आपलं जीवन संपवतोय. त्याच्या जाण्याने त्याचं संसार उघड्यावर पडतोय.

मागच्या दोन महिन्यात 100 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले

मागच्या दोन महिन्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. यात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यातील 8 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं आहे. त्यात राज्यात सुरु असलेल्या राजकीय धुळ्वळीमुळे शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होतोय. वेळेवर मदत मिळत नाहीये. त्यामुळे मागील दोन महिन्यात मराठवाड्यातील 100 पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.मायबाप

सरकारकडून मदतीची अपेक्षा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी आत्महत्येबाबत चिंता व्यक्त केली आहे. मंगळवारी त्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना भावनिक आवाहन केले आहे. तुम्हाला शिवछत्रपतींची शपथ आत्महत्या करू नका, असं भावनिक आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे. मात्र आता शेतकऱ्यांसंदर्भात धोरणात्मक निर्णय घेणं गरजेचं आहे. पीकविमा, नुकसानभरपाई लवकर कशी मिळेल, पीककर्जाची अंलबजावणी करून घेणं, यावर लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खासगी सावकारांच्या मुसक्या आवळणे देखील तितकेच गरजेचं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे याच मराठवाड्यातील सिल्लोड मतदारसंघातून येतात. त्यामुळे त्यांच्या मदतीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in