आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह वडील खांद्यावर घेऊन गेले, पूलाच्या नादरुस्तीमुळे ओढावली वेळ

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील भोजगावातला धक्कादायक प्रकार
आत्महत्या केलेल्या मुलीचा मृतदेह वडील खांद्यावर घेऊन गेले, पूलाच्या नादरुस्तीमुळे ओढावली वेळ

बीड जिल्ह्यातल्या गेवराई तालुक्यातील नागरिकांच्या नशिबी रस्त्याविना मरणयातना भोगणं सुरुच आहे. काही दिवसापूर्वी खराब रस्त्यामुळे एका महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. ही घटना ताजी असतानाच आज पुन्हा एक दुर्दैवी आणि संतापजनक घटना गेवराईच्या भोजगावमध्ये समोर आलीय. आत्महत्या केलेला 18 वर्षीय मुलीचा मृतदेह खांद्यावर घेऊन जाण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

या घडलेल्या प्रकाराने संताप व्यक्त केला जात असून लोकप्रतिनिधी आणि आमदार खासदार यांच्या वर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे.

गेवराई तालुक्यातील भोजगावात महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या निकीता संत या विद्यार्थीनीने आत्महत्या केली. निकीता संतला उमापूर येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यासाठी तिच्या घरातली मंडळी निघाली. भोजगाव परिसरातून वाहणाऱ्या, अमृता नदीवरील पूल वाहून गेल्याने, सुरुवातीला हा मृतदेह बैलगाडीतून घेऊन गेले. मात्र पुढे बैलगाडी देखील जात नसल्याने, चक्क नदी ओलांडण्यासाठी वडिलांना आपल्या मुलीचा मृतदेह, खांद्यावर घेऊन जावा लागलाय.

गेल्या अनेक महिन्यांपासून पूल दुरुस्तीची मागणी करूनही, पूल दुरुस्त केला नसल्याने, ग्रामस्थांतून लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या विरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान गेवराईच्या चोरपूरी येथील रस्त्याने महिलेचा बळी घेतल्याची घटना ताजी असतानाच, या भोजगावच्या दुर्दैवी आणि संतापजनक घटनेनंतरतरी स्थानिक लोकप्रतिनिधींसह प्रशासनाला जाग येणार का ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in