फोन टॅपिंग प्रकरण : रश्मी शुक्लांविरुद्ध गुन्हा दाखल, महाविकास आघाडी सरकार अॅक्शन मोडमध्ये
राज्य सरकारमधील नेत्यांविरुद्ध केंद्रीय तपाय यंत्रणांच्या कारवाईमुळे बॅकफूटला गेलेली महाविकास आघाडी आता अॅक्शन मोडमध्ये येताना दिसत आहे. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या CRPF महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या रश्मी शुक्ला या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे […]
ADVERTISEMENT

राज्य सरकारमधील नेत्यांविरुद्ध केंद्रीय तपाय यंत्रणांच्या कारवाईमुळे बॅकफूटला गेलेली महाविकास आघाडी आता अॅक्शन मोडमध्ये येताना दिसत आहे. पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त आणि सध्याच्या CRPF महासंचालक रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बेकायदेशीर पद्धतीने फोन टॅपिंग केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. सध्या रश्मी शुक्ला या केंद्रीय प्रतिनियुक्तीवर हैदराबाद येथे कार्यरत आहेत.
महाविकास आघाडी सरकारमधील अनेक महत्वाच्या नेत्यांचे फोन टॅप करुन गोपनीय माहिती उघड केल्याचा आरोप रश्मी शुक्लांवर ठेवण्यात आला होता. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यानंतर राज्य सरकारने आणखी एका पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध केलेली ही कारवाई आहे. या फोन टॅपिंगविरोधात अनेक नेत्यांनी सभागृहातही आवाज उठवला होता. ज्यानंतर राज्यात मोठं वादळ निर्माण झालं होतं.
जाणून घ्या काय आहे हे प्रकरण?
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त डॉ. रशी शुक्ला यांच्यावर महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत. रश्मी शुक्ला या राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आयुक्त पदावर कार्यरत असताना त्यांनी अनेक महत्वाच्या नेत्यांचे विनापरवानगी फोन टॅप केल्याचा आरोप झाला होता. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये घोटाळ्याचा आरोप करत सभागृहात अहवालदेखील वाचून दाखवला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर रश्मी शुक्ला यांच्याकडूनच माहिती लीक झाल्याचे समोर आले होते. त्यांनंतर त्यांनी आपण महाराष्ट्र सरकारच्या परवानगीनेच फोन कॉल्स टॅप केल्याचे सांगत आपली बाजू मांडली.