
मुंबई: तौकताई चक्रीवादळाने (Tauktae Cyclone) महाराष्ट्र आणि गुजरातला मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. गुजरात आणि महाराष्ट्रात हजारो झाडे आणि विजेचे खांब यांच्यासह बऱ्याच गोष्टींची पडझड झाली आहे. बर्याच भागात मुसळधार पाऊस देखील बरसला आहे. आता या आपत्तीनंतर आणखी एका चक्रीवादळ इशारा देण्यात आला आहे. यावेळी धोका पश्चिम बंगाल आणि ओडिसासाठी असून या वादळाला 'Yaas' असे नाव देण्यात आले आहे.
Tauktae नंतर आणखी एका चक्रीवादळाचा इशारा
25-26 मे रोजी 'यास' हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरातून ओडिसा आणि प. बंगालच्या काही भागात धडकणार असल्याची माहिती मिळाली आहे. 22 मे पर्यंत पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होऊन याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हे चक्रीवादळ किती गंभीर स्वरुपाचं असेल हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र या दरम्यान, पूर्व किनारपट्टीवर बर्याच राज्यांमध्ये पावसाच्या सरी बरसण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
त्याच वेळी अंदमानमध्ये ताशी 45 ते 55 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. जे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचेपर्यंत ताशी 70 किमी वेग पकडू शकतात. वादळाचा धोका लक्षात घेता मच्छीमारांना देखील इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सर्व मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये. तसेच जे मच्छिमार खोल समुद्रात गेले आहेत त्यांनी लवकरात लवकर किनाऱ्यावर परतण्याचं आवाहन केलं जात आहे.
Yaas वादळामुळे धोका
यापूर्वी पश्चिम बंगालमध्ये अम्फान वादळामुळे मोठा विध्वंस पाहायला मिळाला होता. त्या वादळामुळे बर्याच लोकांना आपले प्राण गमवावे लागले होते तसेच कोट्यवधींचे नुकसान देखील झालं होतं. त्यामुळेच आता जेव्हा 'यास' हे वादळ येण्याचा अंदाज व्यक्त केल्यानंतर तात्काळ प्रभावित होणाऱ्या भागामध्ये आवश्यक ती तयारी केली जात आहे. विनाश कमी करण्यासाठी आणि वेळेत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील काही भागांमध्ये अद्यापही वादळाचा परिणाम जाणवत आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह अनेक भागात सध्या पावसाच्या सरी बरसत आहेत. याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी गुजरातमध्ये हवाई सर्वेक्षण केले आहे.
Tauktae चक्रीवादळाचा परिणाम असा आहे की दिल्ली आणि देशातील इतर काही भागातही पाऊस कोसळत आहे. येत्या काही दिवसात राजधानीत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.