कल्याण: 4 वर्षाच्या मुलावर तीन भटक्या कुत्र्यांचा हल्ला, तब्बल 18 ठिकाणी चावा

Stray dogs attacked on four year old boy: कल्याणमधील द्वारली गावात एका 4 वर्षीय मुलांवर तीन भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला. ज्यामध्ये मुलगा गंभीर जखमी झाला आहे.
कल्याण: 4 वर्षाच्या मुलावर तीन भटक्या कुत्र्यांचा हल्ला, तब्बल 18 ठिकाणी चावा
in kalyan four year old boy attacked by three stray dogs bite in 18 places

मिथिलेश गुप्ता, कल्याण: एका 4 वर्षीय मुलाचा तीन भटक्या कुत्र्यांनी मिळून तब्बल 18 ठिकाणी चावा घेतल्याची कल्याण पूर्वेकडील द्वारली गावात घडली आहे. नागरिकांमुळे हा मुलगा कुत्र्यांच्या तावडीतून कसाबसा बचावला. मात्र, या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. या मुलाला डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयात नेले असता त्या ठिकाणी उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्ध नसल्याने त्याला कळवा येथील शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आलं आहे. सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, या घटनेमुळे कल्याण-डोंबिवलीमध्ये भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली आहे. रात्री-अपरात्री ये जा करणाऱ्या नागरिकांना हे कुत्रे लक्ष करत आहेत. गेल्या नऊ महिन्यात भटक्या कुत्र्यांनी तब्बल 9 हजार 44 जणांचा चावा घेतल्याचं समोर आलं आहे. म्हणजेच एका महिन्यात सुमारे हजार नागरिकांना कुत्रे लक्ष्य करत असल्याने या भटक्या कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढत आहे.

अशीच एक घटना कल्याण पूर्वेकडील द्वारली गावात घडली आहे. सुहास निंबोरे हे आपल्या कुटुंबासह द्वारली येथील आदित्य अपार्टमेंटमध्ये राहतात. काल (1 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास त्यांचा चार वर्षाचा मुलगा तुषार हा इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या  परिसरात खेळत होता. याच दरम्यान अचानक तीन ते चार भटक्या कुत्र्यांनी तुषारचा दिशेने धाव घेतली आणि तुषारवर थेट हल्ला केला.

तुषार या घटनेने घाबरला त्याने आरडाओरडा सुरू केला. यावेळी आजूबाजूच्या नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ तुषारच्या दिशेने धाव घेत या कुत्र्यांच्या तावडीतून त्याची सुटका केली. मात्र, तोपर्यंत या भटक्या कुत्र्यांनी त्याच्या शरीरावर तब्बल 18 ठिकाणी चावा घेतला होता.

in kalyan four year old boy attacked by three stray dogs bite in 18 places
दिसलं कुत्र्याचं पिल्लू की फेक झाडावरून खाली! बीडमधल्या गावात वानरांची जबरदस्त दहशत

तुषारचा कुटुंबीयांनी तुषारला उपचारासाठी डोंबिवली येथील शास्त्रीनगर रुग्णालयात नेले. मात्र, रुग्णालयात डॉक्टर उपलब्ध नव्हते. त्यामुळे तुषारला कळवा येथे उपचारासाठी घेऊन जावं लागलं. ही बाब अत्यंत दुर्दैवी असून केडीएमसीच्या आरोग्य यंत्रणेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

सध्या, तुषारवर कळवा येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत कायम आहे ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in