Kangana Ranaut ची गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणी, धमकी दिल्याची याचिका

जावेद अख्तर यांनी केलेल्या अब्रू नुकसानीच्या दावा प्रकरणाला नवा ट्विस्ट
Kangana Ranaut ची गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणी, धमकी दिल्याची याचिका
Defamation Case: Actor Kangana Ranaut appeared before Andheri court.The case has been adjourned till 15th November

अभिनेत्री कंगना रणौतने गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात खंडणी मागितल्याची आणि धमकी दिल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. आज कंगना रणौत कोर्टात हजर राहिली होती. यावेळी तिने गीतकार जावेद अख्तर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवा ट्विस्ट आला आहे. जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अब्रूनुकसानीचा दावा केला होता. या प्रकरणी आज कंगना कोर्टात हजर राहिली होती. मात्र आता तिने जावेद अख्तर यांच्या विरोधातच काऊंटर याचिका दाखल केली आहे.

मुंबईतल्या अंधेरी कोर्टात सोमवारी कंगना रणौत कडेकोट सुरक्षेत पोहचली. मॅजिस्ट्रेटनी दिलेल्या आदेशानंतर आज दोघांनाही हजर व्हायचं होतं. त्यानुसार कंगना आणि जावेद अख्तर हे दोघेही कोर्टात आले होते. आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 नोव्हेंबरला होणार आहे. दरम्यान याच वेळी कंगनाने आणखी एक तक्रार याचिका दाखल केली. ज्यामध्ये तिने जावेद अख्तर यांच्यावर खंडणी मागितल्याचे, धमकी दिल्याचे आरोप केले आहेत. एवढंच नाही तर कंगनाने आपल्या आणखी एका याचिकेसंदर्भातल्या दोन प्रकरणांची सुनावणी दुसऱ्या कोर्टात वर्ग करण्याचीही मागणी केली आहे. त्याबाबत 1 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे.

सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या मृत्यूशी संबंधित वक्तव्य करत असताना कंगनाने गीतकार जावेद अख्तर यांच्यावर काही गंभीर आरोप केले होते. त्यानंतर जावेद अख्तर यांनी कंगनाच्या विरोधात अब्रू नुकसानाची दावा केला होता. कोर्टाने याआधीही तिला हजर राहण्यास सांगितलं होतं. मात्र तिने आपण शुटिंगमध्ये व्यस्त आहोत असं कारण देत हजर राहणं टाळलं होतं. आज कंगना कोर्टात हजर राहिली होती आणि आजच तिने जावेद अख्तर यांच्या विरोधात आणखी एक याचिका दाखल केली आहे.

कंगनाचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मीडियाला सांगितलं की, कंगनाने मागील पाच वर्षांपासून जावेद अख्तर यांच्या विरोधात खंडणी किंवा धमकी संदर्भातली याचिका दाखल केली नाही कारण तिने त्यांच्या वयाचा आणि प्रतिष्ठेचा आदर राखला. मात्र जे झालं ते पुरेसं आहे त्यामुळे आता गप्प बसायचं नाही असं कंगना आणि तिच्या कुटुंबीयांनी ठरवलं आहे. हृतिक रोशन कंगना वादाच्या प्रकरणात जेव्हा जावेद अख्तर यांनी तिला भेटायला बोलावलं होतं तेव्हा कंगना अक्षरशः हादरून गेली होती कारण त्यांनी तिच्या माफीसाठी तिला हर तऱ्हेने सांगितलं होतं. त्यांचे प्रयत्न त्यांनी सोडले नव्हते असंही रिझवान सिद्दीकी यांनी माध्यमांना सांगितलं.

Related Stories

No stories found.