नाना पटोले : "गुजरात दंगलीवेळी अटलबिहारी वाजपेयींनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होतं"

गुजरात दंगल : "सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून विरोधकांची प्रतिमा डागाळण्यात मोदी-शाहांचा हातखंडा"
gujarat sit report on 2002 godhra riots
gujarat sit report on 2002 godhra riots

-योगेश पांडे, नागपूर

"काँग्रेस नेते स्व. अहमद पटेल यांच्यावर भाजपने केलेल्या आरोपात काहीही तथ्य नाही. २००२ च्या गुजरात दंगलीने नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा स्वच्छ करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. गुजरात दंगलीवेळी राजधर्माचे पालन केले नाही म्हणून तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही मोदींना तीव्र शब्दात फटकारले होते. गुजरात दंगलीचे हे पाप झाकण्यासाठीच काँग्रेसवर भाजपकडून गलिच्छ आरोप केले जात आहेत," अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

गुजरात एसआयटीने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात अहमद पटेल आणि तिस्ता सेटलवाड यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, "गुजरात दंगल हाताळण्यात नरेंद्र मोदी सरकार सक्षम नव्हते व त्या सरकारची तशी इच्छाही नव्हती हे दिसून आले आहे. गुजरातमध्ये २००२ साली झालेल्या नरसंहारांने भारताची जगात नाच्चकी झाली. हे पाप नरेंद्र मोदी यांची पाठ सोडत नाही व सोडणार नाही. पण आपली डागाळलेली प्रतिमा सुधारण्याच्या केविलवाण्या प्रयत्नात ते विरोधकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहेत."

"सरकारी यंत्रणाच्या माध्यमातून विरोधकांना छळण्याचा, त्यांना त्रास देण्याच्या मोदी-शाह यांच्या षडयंत्राने मृत्यू झालेल्या व्यक्तींनाही सोडलेले नाही. मृत्यूनंतरही त्या व्यक्तीवर आरोप करण्याचे भाजपचे गलिच्छ राजकारण दर्शवते तसेच मयत व्यक्ती या आरोपांचे उत्तर देऊ शकत नाही हे माहित असूनही भाजपकडून हीन राजकारण केले जात आहे," असं नाना पटोले म्हणाले.

"ज्या एसआयटीच्या हवाल्याने अहमद पटेल यांच्यावर कपोलकल्पित आरोप लावले गेले आहेत, ती एसआयटी सरकारची कठपुतळी बाहुली असून सरकारच्या इशाऱ्यावर नाचत आहे. मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी यांना क्लीन चीट दिल्याबद्दल एका माजी एसआयटी प्रमुखाला दिलेले खास बक्षीस लपून राहिलेले नाही," अशी टीका पटोले यांनी केली.

नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा यात हातखंडा -नाना पटोले

"कोर्टात सुरु असलेल्या प्रकरणातील काही तथ्यहीन, खोटा व तथाकथित भाग प्रसारमाध्यमांना हाताशी धरून प्रसारित करण्यात मोदी-शाह जोडीचा हातखंडा आहे. विरोधकांची बदनामी करण्याच्या मोहिमेचा तो एक भाग आहे यापेक्षा अहमद पटेल यांच्यावर केलेल्या आरोपात काहीही तथ्य नसून, अशा आरोपांचे काँग्रेस पक्ष तीव्र शब्दात खंडन करत आहे, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

"गुजरातमध्ये भाजपच्या सरकारवर जनता प्रचंड नाराज आहे. तथाकथित गुजरात विकास मॉडेलची पोलखोल झाली आहे. नुकत्याच झालेल्या पावसाने ‘तरंगता गुजरात’ जगाने पाहिला आहे. केंद्रातही भाजपा सत्तेत असून महागाई, बेरोजगारी, अर्थव्यवस्था हाताळण्यात मोदी सरकार सपशेल फेल झाले आहे. भाजपकडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काँग्रेसची बदनामी करण्याचा हा डाव आहे. परंतु अशा बदानामीला काँग्रेस पक्ष घाबरत नाही व जनतेलाही भाजपचे कारनामे माहित आहेत," असं उत्तर नाना पटोले यांनी दिलं आहे.

हमीद अन्सारींवरील आरोप राजकीय हेतूने प्रेरित...

भाजप राजकारणाची सर्व मर्यादा सोडून वागत आहे. विरोधकांवर खोटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याची त्यांची खोड जुनीच आहे. भाजपच्या गलिच्छ राजकारणात त्यांनी माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारींवरही खोटेनाटे आरोप लावून त्यांना बदनाम करण्याचे काम केले आहे, अशा शब्दात नाना पटोले यांनी भाजपला टोला लगावला.

"भाजपचे अतिरेक्यांचे संबंध जगजाहीर आहेत. कुख्यात दहशतवादी मसूर अजहर याला सरकारी लवाजाम्यासह तत्कालीन भाजप सरकारनेच सोडून दिले होते. याच मसूद अजहरने त्यानंतर भारतात अनेक घातपाती कारवाया घडवून आणल्या. जम्मू काश्मीरमध्ये अटक करण्यात आलेल्या दोन अतिरेक्यामध्ये भाजपचा एक पदाधिकारी होता. मध्य प्रदेशात केलेल्या कारवाईत अटक केलेल्यामध्येही भाजपचा पदाधिकारी होता, अशा अनेक प्रकरणात भाजपचे संबंध उघड झाले आहेत. मोदी सरकारचे अपयश झाकण्यासाठी केवळ निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुस्लीम रंग देऊन राजकीय पोळी भाजण्याचा भाजपाचा हा प्रयत्न आहे," असं नाना पटोले म्हणाले.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in