Navneet Rana and Ravi Rana : मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला काय दिला इशारा?

Mumbai police : खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस
Navneet Rana and Ravi Rana : मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला काय दिला इशारा?

खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवि राणा (Ravi Rana) मुंबईत (Mumbai) दाखल झाले असून, त्यामुळे मातोश्री (Matoshree) परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. राणा दाम्पत्यांचा शोध शिवसैनिकांकडून घेतला जात होता. मात्र, नंतर पोलिसांनी (Mumbai Police) त्यांच्या घरी जाऊन त्यांना नोटीस बजावली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांनी जमावबंदी आदेश लागू केलेले आहेत. पोलीस आयुक्तांच्या आदेशाचा उल्लेख करत पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

नवनीत राणा आणि रवि राणा यांनी मुख्यमंत्र्यांचं खासगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याचा इशारा दिलेला आहे. उद्या (२३ एप्रिल) राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार होते. मात्र, एक दिवस आधीच दोघेही मुंबईत दाखल झाले.

राणा दाम्पत्य मुंबईत आल्याचं कळताच शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेर मोठी गर्दी केली होती. शिवसेनेचे अनेक नेतेही मातोश्री बाहेर जमले. नवनीत राणा आणि रवि राणा यांचा शोधही सुरूवातीला शिवसैनिकांकडून घेतला गेला. नंतर पोलिसांनी राणा दाम्पत्याला गाठून नोटीस बजावली.

नवनीत राणा आणि रवि राणा यांना नोटीस देताना पोलीस अधिकारी.
नवनीत राणा आणि रवि राणा यांना नोटीस देताना पोलीस अधिकारी.
Navneet Rana and Ravi Rana : मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याला काय दिला इशारा?
"बंटी-बबली पोहचले असतील तर..." संजय राऊतांचा नवनीत राणा आणि रवी राणांना टोला

पोलिसांनी नोटीसमध्ये काय म्हटलंय?

"आपण 'मला तारीख आणि वेळ द्या. मी मातोश्रीच्या बाहेर हनुमान चालीसा पठण करणार' असं जाहीर आव्हान केलं आहे, तशी माहिती पोलीस ठाण्याला मिळाली आहे."

"मातोश्री बंगला हे महाराष्ट्र मुख्यमंत्री यांचं खासगी निवासस्थान असून, ते कलानगर रहिवाशी सोसायटीमध्ये आहे. कलानगर जंक्शन हे मुंबईमधील महत्त्वाचे वाहतुकीचे जंक्शन आहे. परिसरात शासकीय कार्यालये, तसेच अति महत्त्वाचे आस्थापना व त्यांची कार्यालये आहेत. त्यामुळे सदर परिसरात नेहमी वाहतुकीची वर्दळ असते."

रवि राणा यांना पोलिसांनी दिलेली नोटीस.
रवि राणा यांना पोलिसांनी दिलेली नोटीस.

"मुंबई उच्च न्यायालयाने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर (१२०३/१९९७) न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे कोणतेही धरणे, रॅली, घंटानाद, संप, निदर्शने, निषेध किंवा तत्सम कार्यक्रम फक्त आझाद मैदान येथे करण्याची परवानगी देण्यात आली आहे."

"ज्याअर्धी, पोलीस ठाण्याला मिळालेल्या माहितीनुसार आपण व आपले सहकारी मातोश्री बंगल्याबाहेर एकत्रित जमल्यास सदर परिसरातील सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण शकतो. प्रसंगी त्यामुळे सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान होऊ शकते."

"ज्याअर्थी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी बृहन्मुंबई पोलीस आयुक्त हद्दीत जमावबंदी आदेश जारी केलेला आहे. त्यामुळे सदर आदेशाचा भंग झाल्यास असे कृत्य कलम ३७सह १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियमान्वये व अन्य प्रचलित कायद्यातंर्गत दखलपात्र गुन्ह्याचे कृत्य आहे."
नवनीत राणा यांना देण्यात आलेली नोटीस.
नवनीत राणा यांना देण्यात आलेली नोटीस.

"आपण वरील परिच्छेदात नमूद केल्याप्रमाणे जमावबंदी आदेशाचा भंग होईल किंवा सार्वजनिक शांततेस बाधा निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणतंही दखलपात्र गुन्ह्याचे कृत्य घडल्यास त्यासाठी आपणास जबाबदार धरून प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्यात येईल. सदरची नोटीस संबंधित सक्षम न्यायालयात आपण व आपल्या सहकाऱ्यांविरुद्ध पुरावा म्हणून वापरण्यात येईल."

Related Stories

No stories found.