एक अभिनेत्री मलाना क्रीमचा ओव्हरडोज झाल्यासारखं बोलतेय; मलिकांचं कंगनावर टीकास्त्र
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक आणि अभिनेत्री कंगना रनौतIndia Today

एक अभिनेत्री मलाना क्रीमचा ओव्हरडोज झाल्यासारखं बोलतेय; मलिकांचं कंगनावर टीकास्त्र

अभिनेत्री कंगना रनौतने भारताच्या स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. या विधानानंतर कंगना टीकेची धनी ठरली आहे. कंगनाला दिलेला पद्मश्री परत घेण्याचीही मागणी जोर धरू लागली आहे...

गेल्या वर्षभरापासून आपल्या विधानांमुळे चर्चेत असलेल्या अभिनेत्री कंगना रनौतचा पुन्हा एकदा तोल सुटला. एका कार्यक्रमात कंगनाने भारतीय स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त विधान केलं. या विधानावरुन कंगनाविरुद्ध संताप व्यक्त होत असून, राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी कंगनाला अटक करण्याची मागणी करत टीकास्त्र डागलं आहे.

नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत बोलताना कंगना रनौतने भारतीय स्वातंत्र्याबद्दल केलेल्या विधानावर टीका केली. 'भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरं स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळालं, असं कंगना रनौत म्हणाली. 1857 पासून या देशात स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरू झाल्यानंतर लाखो स्वातंत्र्यसैनानींनी आपल्या प्राणांची आहुती दिली. महात्मा गांधींनी मोठा लढा उभारला. शेवटी ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य बहाल करण्याची घोषणा केली आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला', मलिक म्हणाले.

'आज काही अभिनेत्री मलाला क्रीम घेऊन ओव्हरडोस झाल्यासारखं बोलत आहेत. तिला देण्यात आलेल्या पद्मश्री सन्मान तत्काळ मागे घेण्यात यावा, अशी आम्ही मागणी करतोय. करोडो भारतीयांच्या भावना दुखावण्याचं काम त्यांनी केलं आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांनी स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान केलेला आहे. तत्काळ गुन्हा दाखल करून तिला अटक करण्यात यावी आणि पद्मश्री पुरस्कार केंद्र सरकारने ताबडतोब परत घ्यावा', अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.

संजय राऊतांचा कंगनासह भाजपवर निशाणा

कंगनाच्या या विधानावर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही संताप व्यक्त केला आहे. कंगना रनौतला देण्यात आलेले सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेण्याची मागणी करत राऊत यांनी कंगनासह भाजपलाही लक्ष्य केलं. मुंबईत माध्यमांशी बोलताना राऊतांनी भाजपने भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली.

'कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपाने देखील 'कंगनाबेन'च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी', असं म्हणत राऊतांनी कंगना रनौतसह भाजपवरही निशाणा साधला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in