
नागपूर: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची वक्तव्य नेहमीच चर्चेत असतात. आपल्या रोखठोक वक्तव्यांसाठी गडकरींना ओखळले जाते. कालही नागपूरमधील एका कार्यक्रमात नितीन गडकरींना एक वक्तव्य केलं आणि चर्चांना उधाण आलं. नागपुरात ऍग्रोव्हिजन फाउंडेशन तर्फे आयोजित कार्यक्रमात नितीन गडकरी यांनी मोठं वक्तव्य केलं, ते म्हणाले ''सरकारच्या फार भरवश्यावर राहू नका, मी सरकार आहे म्हणून सांगतो...''
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपुरातील ऍग्रो व्हिजन फाउंडेशन तर्फे आयोजीत कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करत होते. यावेळी बोलतांना गडकरी म्हणाले की, मी कालच माझ्या शेतातील चवळीच्या शेंगाची भाजी खालली, ऑरगॅनिक आहे. मी नागपूरतील प्रतापनगरवाला भाजीवाला आहे तो पकडला आहे, तो 30-35 रुपये मला भाव देतो आणि मी माझी भाजी त्याच्याकडे देतो, तिथून माझा मार्केट एस्टॅब्लिश झाला आहे. मी ऑरगॅनिक म्हणून सर्टिफाईड नाहीये पण माझी भाजी ऑरगॅनिक आहे त्याची चव आणि कॉलिटी चांगली आहे.
पुढे गडकरी म्हणाले ''लोकांना ही सवय लागली की ते भाजी दुकानात येतात साहेबांकडची भाजी कुठली आहे ते घरी घेऊन जातात त्याला जास्त भाव मिळतो तो रिटेल मध्ये विकतो दलाली लागत नाही, फिरायला लागत नाही. परवा माझ्याकडे टीव्हीएस कंपनीचे मालक आले त्यांना मी सांगितलं मला एक टन माल वाहून नेता येईल अशी इलेक्ट्रिक व्हेईकल पाहिजे, पंधरा दिवसात ती गाडी मला ते देणार आहेत, मी पाच ग्रीन हाऊस तयार करत आहे आणि मी ठरवलं की रोज रात्री दहा वाजता भाजी मार्केटमध्ये माल 600 किलो, 800 किलो येईल.
मला 25 रुपयांच्या वर रेट मिळतो म्हणजे मला दोन दिवसात 30 ते 35 हजार रुपये मिळतात, माझं मार्केट एस्टॅब्लिश झाला आहे. मला भाजी विकण्याकरता अडचण राहिलेली नाही. माझा मार्केट मी शोधलं, तुमचं मार्केट तुम्ही शोधा. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो हे सरकारच्या फार भरोशावर राहू नका. मी सरकार आहे म्हणून सांगतो आपल्याकडे दोन गोष्टी होतात एक तर आपला विश्वास सरकारवर आहे किंवा मग परमेश्वरावर आहे.''