भारतीय महिला पर्यटकाच्या मृत्यूवरून पोर्तुगालमध्ये हंगामा, आरोग्यमंत्र्यांनी दिला राजीनामा
पोर्तुगालची राजधानी लिस्बन भारतीय वंशाच्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्ता टेमिडो यांना राजीनामा द्यावा लागला आहे. भारतीय महिलेला मॅटर्निटी वॉर्डमध्ये दाखल करण्यात येणार होतं. मात्र तिला पोर्तुगालच्या सर्वात मोठ्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. दुसऱ्या एका रूग्णालयात घेऊन जाण्याआधी या महिलेचा मृत्यू झाला. नेमकी काय घडली पोर्तुगालमधली घटना? पोर्तुगालमध्ये आलेल्या एका […]
ADVERTISEMENT

पोर्तुगालची राजधानी लिस्बन भारतीय वंशाच्या एका गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. यानंतर पोर्तुगालच्या आरोग्यमंत्री मार्ता टेमिडो यांना राजीनामा द्यावा लागला आहे. भारतीय महिलेला मॅटर्निटी वॉर्डमध्ये दाखल करण्यात येणार होतं. मात्र तिला पोर्तुगालच्या सर्वात मोठ्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं नाही. दुसऱ्या एका रूग्णालयात घेऊन जाण्याआधी या महिलेचा मृत्यू झाला.
नेमकी काय घडली पोर्तुगालमधली घटना?
पोर्तुगालमध्ये आलेल्या एका भारतीय पर्यटक महिलेला रूग्णालयातल्या वॉर्डमध्ये जागा मिळाली नाही. त्यामुळे तिला दुसऱ्या रूग्णालयात घेऊन जात होते त्याचवेळी या महिलेचा मृत्यू झाला. या मुद्द्यावरून आरोग्यमंत्री डॉ. मार्ता टेमिडो यांना राजीनामा द्यावा लागला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये अशा काही घटना घडल्या आहेत. पोर्तुगालमध्ये आरोग्य व्यवस्थेतल्या दोषांमुळे लोकांना त्यांचा जीव गमवावा लागला आहे.
मंगळवारी पोर्तुगाल सरकारने हे जाहीर केलं की डॉ. मार्ता यांना हे समजून चुकलं होतं की आपण आता पदावर राहण्यात काहीही अर्थ नाही त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला आहे. पोर्तुगालचे पंतप्रधान एंटोनियो कोस्टा यांनी म्हटलं आहे की गर्भवती महिलेच्या मृत्यूमुळे मार्ता यांनी राजीनामा दिला आहे. आत्तापर्यंत आरोग्य व्यवस्थेतल्या ढिसाळपणाची अनेक उदाहरणं समोर आली होती. भारतीय पर्यटक महिलेचा मृत्यू होणं ही यातली शेवटची घटना होती त्यामुळे डॉ. मार्ता यांनी राजीनामा दिला.
२०१८ पासून आरोग्यमंत्री होत्या डॉ. मार्ता
पोर्तुगाल सरकारमध्ये मार्ता टेमिडो या २०१८ पासून आरोग्य मंत्री होत्या. कोरोना काळात त्यांनी चांगलं काम केलं होतं. कोरोना काळात त्यांनी रूग्णहाताळणी आणि एकंदरीत ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली होती त्यामुळे त्यावरून त्यांचं कौतुक झालं होतं. भारतीय महिला पर्यटकाच्या मृत्यूनंतर पोर्तुगाल सरकारवर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. एवढंच नाही तर या महिलेला ज्या रूग्णालयात नेण्यात आलं होतं तिथला मॅटर्निटी वॉर्डवर, स्टाफवर आणि ते देत असलेल्या कारणांचाही लोकांनी मोठ्या प्रमाणावर निषेध केला.