काँग्रेस नेतृत्वास हे कधी उमगणार?; शिवसेनेचं काँग्रेसला सल्ल्याचं 'टॉनिक'

काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली : कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर कृषी कायद्यावरून टीकास्त्र
काँग्रेस नेतृत्वास हे कधी उमगणार?; शिवसेनेचं काँग्रेसला सल्ल्याचं 'टॉनिक'
काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत. (संग्रहित छायाचित्र)sanjay Raut/twitter

गेल्या काही महिन्यांपासून पंजाब काँग्रेसमध्ये अतंर्गत कलह वाढला आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेत्यांकडून पक्षाध्यक्षपदाचा मुद्दा अधोरेखित केला जात आहे. यावरून काँग्रेसच्या भविष्याबद्दलही शंका उपस्थित केल्या जात आहे. काँग्रेसमधील अंतर्गत कलहावर शिवसेनेनं भाष्य केलं असून, काँग्रेस नेतृत्वाला सल्ल्याचं टॉनिक देण्याचा प्रयत्न केला आहे.

शिवसेनेनं सामना अग्रलेखातून काँग्रेसमधील परिस्थितीवर भाष्य केलं आहे. शिवसेना म्हणते, "काँग्रेस पक्षाचे काय होणार, असा घोर अनेकांना लागला आहे. महात्मा गांधी त्यांच्या इच्छेनुसार काँग्रेसचे विसर्जन सुरू आहे काय? अशा आनंदाच्या उकळ्या भारतीय जनता पक्षाला फुटत आहेत. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे काम उरले नाही व तिचे विसर्जन करावे, असे महात्मा गांधींचे सांगणे होते. ते तितकेसे खरे नाही. स्वातंत्र्यानंतर पन्नासेक वर्षे काँग्रेस सत्तेवर राहिली व आजही अनेक राज्यांत काँग्रेसचे बऱ्यापैकी अस्तित्व आहे. गेल्या सात-आठ वर्षांपासून काँग्रेसची अवस्था बरी नाही. नरेंद्र मोदींच्या वादळापुढे, भाजपच्या विस्तारामुळे काँग्रेसची हालत 'पतली' झाली व काँग्रेसच्या वाड्यातील उरलेसुरले वतनदारही सोडून चालले आहेत."

"पंजाबचा सुभा याक्षणी मुळापासून हादरला आहे. काँग्रेस श्रेष्ठींनी कॅ. अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्रीपदावरून दूर केले. नवे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि त्यांचे नवे मंत्रिमंडळ सत्तेवर आले. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी या बदलानंतर पेढे वाटले. आनंदाने त्यांनी भांगडा केला, पण या उठवळ, बेभरवशाच्या सिद्धू यांनीच आता प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसपुढील संकट वाढवले आहे. सिद्धू यांच्या सततच्या कटकटीमुळे कॅ. अमरिंदर यांना दूर केले गेले. आता सिद्धूही गेले. काँग्रेसच्या हाती काय उरले?", असा प्रश्न शिवसेनेनं पंजाब काँग्रेसमधील परिस्थितीवरून उपस्थित केला आहे.

"तिकडे 79 वयाचे कॅ. अमरिंदर हे दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना भेटले. कॅ. अमरिंदर हे भाजपत जातील, असं सांगितले जात होतं, पण त्या शक्यतेला खुद्द अमरिंदर यांनीच पूर्णविराम दिला आहे. मात्र आपण काँग्रेसमध्येही राहणार नाही, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे. तेव्हा ते स्वतःचा नवा पक्ष स्थापन करून काँग्रेसला खड्ड्यात टाकतील, असे दिसत आहे. कॅ. अमरिंदर म्हणतात, 'मी तीन कृषी कायद्यासंदर्भात अमित शहांची भेट घेतली.'' हे सपशेल झूट आहे. मुख्यमंत्री असताना हेच अमरिंदर पंजाबच्या शेतकऱ्यांना सांगत होते, आंदोलन पंजाबात करू नका, तर दिल्लीत करा. म्हणजे त्यांना शेतकऱ्यांची ही आक्रमकता स्वराज्यात नको होती."

"मुख्यमंत्री असताना कॅ. अमरिंदर हे तीन कृषी कायद्यासंदर्भात किती वेळा दिल्लीत आले? उलट त्यांची भूमिका मोदी सरकारधार्जिणी व शेतकऱ्यांत फूट पाडण्याची होती असे सांगतात. आता हे महाराज शेतकऱ्यांचे कैवारी बनले. कॅ. अमरिंदर यांना केंद्रीय कृषी मंत्रीपदाची ऑफर मिळाल्याची बोंब उठली होती. ज्यांचे वय 75 झाले. त्यांना सत्तेचे पद मिळणार नाही, असे मोदींचे धोरण आहे. कॅ. अमरिंदर यांचे वय 79 आहे. तेव्हा कसे काय होणार?", अशी शंका शिवसेनेनं उपस्थित केली आहे.

"पंजाबातील गोंधळात भाजपचा हात आहे तसा काँग्रेस नेतृत्वाचाही गोंधळ आहे. काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी अध्यक्ष नाही व हंगामी स्वरूपाचे काम सुरू आहे. पंजाबात दलित मुख्यमंत्री करून राहुल गांधी यांनी एक जोरदार पाऊल टाकले ते त्यांच्या प्रिय सिद्धूने अडकवले. काँग्रेस पक्षात मूळच्याच बोलघेवड्यांची कमी नसताना सिद्धूसारख्या उपऱ्या बोलघेवड्यावर फाजील विश्वास टाकण्याची गरज नव्हती. पंजाबातील गोंधळाचे पडसाद आता इतर राज्यांतही उमटू शकतात. पंजाबप्रमाणेच राजस्थानमध्येही नेतृत्वबदल होईल व मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनाही जावे लागेल अशी हवा निर्माण झाली होती. ती पंजाबमुळे थंड पडली", असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

"जुने वतनदार नव्या लोकांना संधी मिळू देत नाहीत. वाडा पडका झाला असला तरी त्यातील खिडक्या, दरवाजे, पंखे, पलंग, झुंबरांवर मालकी हक्क सांगून त्या वाड्यातच ते पथारी पसरून बसले आहेत. राहुल गांधी वाड्याची डागडुजी करू इच्छितात. वाड्यास रंगरंगोटी करू पाहतात, गळकी भोके बुजवू पाहतात. पण जुने लोक राहुल गांधींना ते करू देत नाहीत. राहुल गांधींना रोखण्यासाठी हे लोक आतून भाजपसारख्या पक्षाशी हातमिळवणी करतात हे आता पक्के झाले आहे. काँग्रेस बुडवायची सुपारी काँग्रेसच्याच लोकांनी घेतली हे मान्य, पण काँग्रेसला कायमस्वरूपी अध्यक्ष द्या. पक्षाला सेनापतीच नाही तर लढायचे कसे? ही जुन्याजाणत्या काँग्रेसवाल्यांची मागणीही चुकीची नाही. काँग्रेस पक्षात नेता कोण, हा प्रश्न आहेच", असं भाष्य शिवसेनेनं केलं आहे.

"गांधी परिवार आहे. पण नेता कोण? अध्यक्ष कोण? याविषयी भ्रम असेल तर तो दूर करायला हवा. एखादा बडा नेता पंजाबात जाऊन बसेल व मामला खतम करेल असा कोणी आहे काय? कन्हैय्या कुमार, जिग्नेश मेवानीसारखे तरुण काँग्रेस पक्षात आले. गुजरातचा हार्दिक पटेलही आलाय. पण त्यामुळे काँग्रेस उसळी मारू शकेल काय? पंजाबात गोंधळ सुरू असताना गोव्यातील काँग्रेसचे जुनेजाणते लोक पक्ष सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. त्यांच्यात माजी मुख्यमंत्री लुईझिन फालेरो आहेत. कॅ. अमरिंदर, लुईझिन फालेरो यांना मुख्यमंत्रीपदासारखे सर्वोच्च पद पक्षाने देऊनही हे लोक काँग्रेस सोडायला धजावतात हा निगरगट्टपणाचा कळस झाला", असं टीकास्त्र शिवसेनेनं काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांवर डागलं आहे.

"भाजपकडे मंत्रीपदे वाटण्याची क्षमता आहे म्हणून आज लोक त्यांच्याकडे जात आहेत. त्याला सूज येणे असे म्हणतात. अर्थात काँग्रेसची ही सूज जरा जास्तच उतरली आहे आणि त्यामुळे काँग्रेसचे काय होणार, असा घोर लागला आहे. काँग्रेस पक्ष आजारी आहे. त्यासाठी उपचारही सुरू आहेत, पण ते चुकीचे आहेत का, याचा विचार व्हायला हवा. काँग्रेस पक्षाने उसळी मारून उठावे, मैदानात उतरावे, नवचैतन्याची बहार राजकारणात आणावी अशी लोकभावना आहे. त्यासाठी काँग्रेसला आधी पूर्णवेळ अध्यक्ष हवाच. डोकेच नसेल तर शरीराचा काय फायदा? सिद्धू, अमरिंदर यांची मनधरणी करण्यात अर्थ नाही. पंजाबात काँग्रेस फोडून भाजपास विधानसभा गिळायची आहे, हा विनोदच म्हणावा लागेल. काँग्रेसशिवाय भाजपासही जिंकता येत नाही आणि भाजपासही काँग्रेसचे टॉनिक लागते. पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?", असा सवाल शिवसेनेनं काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठीला केला आहे.

Related Stories

No stories found.