शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची भाजपशी जवळीक... दबावतंत्र की पक्षांतराचे संकेत?

तानाजी सावंतांच्या पक्ष बदलाची चर्चा कधीपासून सुरूये, काय आहे यामागील कारण?
शिवसेनेच्या तानाजी सावंत यांची भाजपशी जवळीक... दबावतंत्र की पक्षांतराचे संकेत?
छत्रपती संभाजीराजे यांच्यासोबत तानाजी सावंत.

- गणेश जाधव, उस्मानाबाद

शिवसेनेचे विद्यमान आमदार तथा माजी मंत्री तानाजी सावंत हे शिवसेनेला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. मागील काही दिवसांपासून पक्षावर नाराज असलेल्या आणि भाजपशी जवळीक साधून दबावतंत्राचा वापर करणारे तानाजी सावंत यांनी कात्रज येथील निवासस्थानी खासदार छत्रपती संभाजीराजेंची भेट घेतल्याने पक्षांतराच्या चर्चेनं फेर धरला आहे. दोन्ही नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चा झाल्याचंही बोललं जात आहे. तर छत्रपती संभाजीराजेंशी झालेली भेट ही मराठा आरक्षणासंदर्भात होती, असा खुलासा सावंत यांनी केला आहे.

पक्ष बदलाची चर्चा कधीपासून व का?

युतीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले तानाजी सावंत शिवसेनेतील वजनदार नेते म्हणून ओळखले जातात. तानाजी सावंत यांना महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज होते. दरम्यान मध्यंतरी त्यांनी उस्मानाबादमध्ये भाजपशी संधान बांधून स्थानिक राजकारणात सत्तांतराचा खेळ खेळला होता. उस्मानाबाद जिल्ह्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष निवडी दरम्यान उस्मानाबाद येथील महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत असताना ऐनवेळी सावंत गटाने भाजपशी जवळीक साधून अचानक केलेल्या सत्तातरानंतर उस्मानाबादचे स्थानिक राजकारण ढवळून निघाले होते. तेव्हापासून त्यांच्या पक्षांतराची चर्चा सुरू झाली.

उस्मानाबाद जिल्हा नियोजन समितीमध्ये सावंत यांनी शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना विकास कामांवरून फैलावर घेतलं होतं. यावेळी दोघांमध्ये बरीच शाब्दिक खडाजंगी झाल्याचंही बघायला मिळालं. तेव्हापासूनच सावंत यांच्या पक्षांतराच्या चर्चेला बळ मिळण्यास सुरुवात झाली.

विधिमंडळ अधिवेशनादरम्यान तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मध्यस्थीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची अर्धा तास प्रतिक्षा करून घेतलेल्या भेटीनंतरही सावंत यांच्याबद्दल अशीच चर्चा सुरू झाली होती. परंतु ही केवळ औपचारिक भेट होती. याचा कुणीही गैरअर्थ काढू नये, अशी प्रतिक्रिया सावंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

दरम्यान, 'येत्या दोन चार महिन्यात दिवस बदलतील. मी नव्या रुपात तुमच्यासमोर येणार आहे, मग माझ्याकडे काय मागायचे ते मागा. कोरड्या राजकारणात आपल्याला रस नाही', असं विधान तानाजी सावंत यांनी काही दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात केलं होतं. या विधानावरही त्यांनी खुलासा केला होता. मी शिवसेनेत असून, शिवसेनेतच राहील, असं ते म्हणाले होते.

मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय हालचाली पाहता मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज असलेले तानाजी सावंत हे शिवसेनेला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. परंतु तानाजी सावंत यांची नेमकी राजकीय भूमिका घेणार? भाजपशी जवळीकता हे दबावतंत्र आहे का, याकडे उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागलं आहे.

कोण आहेत तानाजी सावंत?

तानाजी सावंत हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील वाकाव येथील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या सावंत यांनी शिक्षण क्षेत्रासह, राजकारण आणि कारखानदारीत आपली कारकीर्द सिद्ध केली आहे. कार्यक्षेत्र म्हणून त्यांनी पुण्याची निवड करत जयवंत शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली. 2016 मध्ये झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचा गड असलेल्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेत शिवसेनेला अनपेक्षित यश मिळवून देत तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरे यांचा विश्वास संपादन केला होता.

फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेले शिवसेनेतील वजनदार नेते म्हणून ओळख असणारे सावंत यांनी सोलापूर सह उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेची धुरा सांभाळली आहे. सध्या ते उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अजित पवार यांचे नातेवाईक व हॅट्ट्रिक साधलेले राष्ट्रवादीचे आमदार राहुल मोटेंचा पराभव केला होता. सुनेत्रा अजित पवार या राहुल मोटे याच्या मावशी आहेत.

उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा तालुक्यात सोनारी येथे भैरवनाथ शुगर या खासगी साखर कारखान्याची उभारणी करीत त्यांनी साखर उद्योगात पाऊल ठेवले. महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठा गाळप क्षमता असलेला तेरणा कारखाना सुरू करण्यासाठी तानाजी सावंत यांनी भैरवनाथ उद्योग समूहाच्या माध्यमातून पुढाकार घेतला होता. सद्यस्थितीत भैरवनाथ शुगर कारखान्याचे सोलापूर व उस्मानाबाद जिल्ह्यात पाच युनिट कार्यान्वित आहेत. यामुळे उस्मानाबादच्या आर्थिक व राजकीय क्षेत्रावर ही या माध्यमातून तानाजी सावंत यांचा मोठा प्रभाव असणार आहे. त्यामुळे सावंत यांची पुढील राजकीय वाटचाल ही शिवसेनेसाठी मारक की तारक ठरणार हे आगामी काळातच स्पष्ट होणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in