दसरा मेळावा: “विचारधारा विसरणाऱ्यांना धडा देणारा मेळावा” शिंदे गटाने आणला नवा टिझर
महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांचीच. एक मेळावा आहे उद्धव ठाकरे यांचा तर दुसरा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवतीर्थावर पार पडणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत. अशात कुणाच्या मेळाव्यात काय […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती मुंबईत होणाऱ्या शिवसेनेच्या दोन दसरा मेळाव्यांचीच. एक मेळावा आहे उद्धव ठाकरे यांचा तर दुसरा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. उद्धव ठाकरेंचा मेळावा शिवतीर्थावर पार पडणार आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मेळावा बीकेसी मैदानावर होणार आहे. शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच दोन दसरा मेळावे होत आहेत. अशात कुणाच्या मेळाव्यात काय काय आरोप होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्राचं लक्ष त्याकडे लागलं आहे. शिंदे गटाने आता आणखी टिझर आणला आहे. या टिझरमध्ये विचारधारा विसरणाऱ्यांना धडा देणारा मेळावा असं वाक्य वापरण्यात आलं आहे.
शिवसेना मुख्यनेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली बीकेसी मैदानावर भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या मेळाव्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो शिवसैनिक बीकेसी मैदानात जमणार आहे. शिवतीर्थची क्षमता ८० हजार एवढीच असल्याने बीकेसी मैदानावर त्यापेक्षा पाचपट जास्त गर्दी जमवण्याचे नियोजन पक्षकार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.
विचारांचा वारसा पुढे नेणारा मेळावा असल्याचा दावा
स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि गुरुवर्य धर्मवीर आंनद दिघे यांची शिकवण अंगिकारून हिंदुत्वाचा विचार पुढे नेणारे शिवसेनेचे मुख्यनेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या मेळाव्यात नक्की काय बोलणार, कोणते नवीन गौप्यस्फोट करणार, कुणाकुणाला पक्षात प्रवेश देणार याबाबत सर्वसामान्य शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील कानाकोपऱ्यातील अनेक शिवसैनिकांनी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांचे हात अधिक बळकट करण्याचा निर्धार करून पक्षप्रवेश केला आहे. त्यामुळेच काहीही करून बीकेसी मैदानावर जाऊन हा मेळावा प्रत्यक्ष पहायचाच असा निश्चय या कार्यकर्त्यांनी केलेला आहे. यासाठीच राज्यभरातील लाखो शिवसैनिक मिळेल त्या वाहनाने मुंबईकडे निघाले असून बीकेसी मैदानावरच आजवरचे सगळे रेकॉर्डब्रेक गर्दी जमेल असा दावा अनेक राजकीय विश्लेषक आतापासूनच करत आहेत.
एका कुटुंबाचा नाही तर विचारांचा वारसा सांगणारा मेळावा
बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी खरी निष्ठा बाळगणारे आणि दसरा मेळाव्यात त्यांच्या मुखातून अनुभवायला मिळणारा हिंदुत्वाचा हुंकार अनुभवायचा असेल तर बीकेसी मैदानात जमायला हवे अशी चर्चा शहर आणि ग्रामीण भागात नाक्यांनाक्यावर गेल्या काही दिवसांपासून सुरू झाली होती. त्यांचच प्रत्यक्ष चित्र दसरा मेळाव्यात अनुभवायला मिळेल यात शंका नाही.