‘…म्हणून आपल्यावर ही वेळ आलीये’; आदित्य ठाकरेंचा शिंदेंसह बंडखोर आमदारांवर घणाघात

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

युवा सेनेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या शिव संवाद यात्रेला सुरूवात झाली. शिव संवाद यात्रेनिमित्त भिवंडीत पोहोचलेल्या आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर टीकेची तोफ डागली.

भिवंडीत शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरेंनी काय म्हटलं आहे?

भिवंडीत शिवसैनिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, “२० जूनपासून २० जुलैपर्यंत महाराष्ट्रात वेगळं वातावरण होतं, दुःखी वातावरण होतं. हे स्वतःचं दुःख विसरुन जाण्यासाठी मी हा शिव संवाद दौरा सुरू केला आहे. तुमच्याशी संवाद करायला. तुमचे आशिर्वाद घ्यायला. जे काही चित्र मी बघत होतो, ते क्लेशदायक आहे,” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“मतदार म्हणून, शिवसैनिक म्हणून आपण सर्वांनी जवळून बघितलं आहे. ज्यांना आपण ओळख दिली. पुढे आणलं, तिकीट दिली, मंत्रिपदं दिली. जे करु शकत होतो, ते केलं. ते केल्यानंतरही ते आपल्याला सोडून गेले. धोका देऊन निघून गेले. गद्दारी करून सोडून गेले,” अशी टीका आदित्य ठाकरेंनी भिवंडीत बोलताना केली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“तरुण मित्र-मैत्रिणींना मला विचारायचं आहे की, गेल्या महिनाभरापासून महाराष्ट्रात जे राजकारण सुरूये. जी काही सर्कस सुरूये. हे राजकारण म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? लोकशाही म्हणून तुम्हाला पटणारं आहे का? यांना काय कमी केलं?”

“आज मी ठाण्यात येत असताना केदार दिघेंनी माझं स्वागत केलं. सगळेच उपस्थित होते, पण मी वाट बघत होतो त्या चेहऱ्यांची ज्यांना वर्षानुवर्षांपासून मी ओळखतो. परिवार म्हणून सोबत बघितलं आहे. घरी यायचे. जे काही हवं होतं ते हक्काने मागायचे. जबाबदारी मागून घ्यायचे, मग अचानक काय बिघडलं की यांना आपल्या पाठीत खंजीर खुपसावा वाटला?,” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना केला.

ADVERTISEMENT

“मी हेच बघतोय की, शिवसेना हललेली नाहीये. ज्यांना खाऊन खाऊन अपचन झालंय, ते हलले आहेत. शिवसैनिक होते तिथेच आहेत. ही जी मंडळी आहे, मग ती ठाणे असो, भिवंडी असो, पालघर असो वा ग्रामीणमधील सत्तेचे लाभ आपण ज्यांना ज्यांना देऊ शकलो, ते मस्त तिथे जाऊन आनंदात बसले आहेत. पण यांच्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला, ते अजूनही निष्ठावंत म्हणून सोबत आहेत,” असं आदित्य ठाकरे शिवसैनिकांशी बोलताना म्हणाले.

ADVERTISEMENT

“गेले अडीच वर्ष म्हणून मी बघत आहे. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं गेलं. काम करायची संधी मिळाली. त्या काळात आपण धर्म, जातीवरून भेदभाव न करता विकासाची कामं केली. महाराष्ट्राची सेवा केली. आपण राजकारण कमी केलं, हेच आपलं चुकलं. आपल्याला राजकारण जमलंच नाही. उद्धव ठाकरे असो, मी असो वा शिवसैनिक... आपल्याला राजकारण जमलं नाही म्हणून ही वेळ आपल्यावर आलीये,” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी बंडखोरांना लक्ष्य केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT