युद्धविराम! ९ डिसेंबरपर्यंत Wankhede परिवाराबद्दल काहीही पोस्ट करणार नाही – मलिकांची कोर्टासमोर माहिती
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. आर्यन खान प्रकरणात NCB च्या कार्यपद्धतीवर टीका करताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांची अनेक प्रमाणपत्र समोर आणली होती. याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतलेल्या वानखेडे परिवाराला आता काहीसा दिलासा मिळाला […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक आणि NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यात चांगलाच वाद रंगला आहे. आर्यन खान प्रकरणात NCB च्या कार्यपद्धतीवर टीका करताना नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लीम असल्याचा आरोप करत त्यांची अनेक प्रमाणपत्र समोर आणली होती. याविरुद्ध हायकोर्टात धाव घेतलेल्या वानखेडे परिवाराला आता काहीसा दिलासा मिळाला आहे.
समीर वानखेडेंचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणीदरम्यान नवाब मलिकांनी ९ डिसेंबपर्यंत सोशल मीडियावर वानखेडे परिवाराबद्दल काहीही पोस्ट करणार नसल्याची हमी दिली आहे.
Nawab Malik: ‘अंत्य संस्कारासाठी मुस्लिम, सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू?’, मलिकांचा वानखेडेंवर पुन्हा निशाणा
नवाब मलिकांतर्फे कोर्टात बाजू मांडणारे वकील कार्ल तांबोळी यांनी जस्टीस शाहरुख काठावाला आणि मिलींद जाधव यांच्या खंडपीठासमोर, “मी सर्व सुचना लक्षात घेतल्या असून ते ९ डिसेंबरपर्यंत कोणतीही गोष्ट पोस्ट करणार नाहीत”, असं सांगितलं.
याआधी वानखेडे परिवाराने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना हायकोर्टाने नवाब मलिक यांना वानखेडेंबद्दल पोस्ट करताना थांबवलेलं नव्हतं. परंतू जस्टीस माधव जामदार यांच्यासमोर झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने मलिकांना पोस्ट करत असताना एकदा त्याबद्दलची खातरजमा करुन घेत चला असा सल्ला दिला होता. परंतू वानखेडे परिवाराची बाजू कोर्टात मांडणाऱ्या वकीलांनी कोर्टासमोर, नवाब मलिक वानखेडे परिवाराला जाणुनबुजून टार्गेट करत असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने ट्विट करत असल्याचा युक्तीवाद गेला.
समीर वानखेडेंनी खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप मलिकांनी याआधी केला होता. यावर बोलताना जस्टीस काठावाला यांनी, नवाब मलिकांनी ही बाब जात पडताळणी समितीसमोर मांडली आहे का? तर नाही…मग त्यांना नेमकं हवंय तरी काय? Media Trial? जर त्यांच्याकडे जात प्रमाणपत्राबद्दल पुरावे असतील तर त्यांनी तक्रार करायला नको होती का? प्रसारमाध्यमांसमोर येण्याआधी त्यांनी तक्रार करायला हवी होती असं परखड मत नोंदवलं.
याचवेळी नवाब मलिक यांच्या वकीलांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला असता जस्टीस जाधव यांनी, नवाब मलिक हे मंत्री आहेत, त्यांना व्हीआयपी ट्रिटमेंट मिळते. पण सर्व कागदपत्र असतानाही ते तक्रार करत नाहीत असं म्हटलं. दरम्यान वानखेडे परिवाराची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी कोर्टासमोर नवाब मलिक यांची काही ट्विट दाखवत ते वानखेडे परिवाराला कशा पद्धतीने जाणूनबुजून टार्गेट करत असल्याचं दाखवून दिलं. समीर वानखेडेंनी मालदिवमधून काही जणांना खंडणी मागितल्याचा आरोप मलिकांनी काही दिवसांपूर्वी केला होता.
यावर जस्टीस काठावाला यांनी नवाब मलिकांच्या वकीलांना प्रश्न विचारला असता वकीलांनी मला फक्त ते मालदिवमध्ये असल्याचं माहिती होतं असं उत्तर दिलं. या उत्तराने आश्चर्यचकीत झालेल्या जस्टीस काठावाला यांनी मंत्री असं का वागत आहेत? आम्हाला हे जाणून घ्यायचं आहे. हे दुसरं काहीही नसून प्रतिमा मलिन करणं आहे असं मत नोंदवलं. यानंतर जस्टीस काठावाला यांनी पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही गोष्ट पोस्ट करण्यापासून थांबवण्यास सांगितलं. नाहीतर आम्हाला त्यांना थांबवावं लागेल.
याचदरम्यान कोर्टात सुनावणीसाठी हजर असलेल्या नवाब मलिकांच्या सुनेसोबत वकीलांनी सल्लामसलत केली असता खंडपीठाने यावर आक्षेप नोंदवत, आता मंत्री महोदय या प्रकरणात आपल्या परिवारालाही सहभागी करुन घेणार आहेत का? असं विचारलं. असं दिसतंय की त्यांचा परिवारही यात सहभागी आहे असं कोर्टाने विचारल्यानंतर मलिक यांचे वकील तांबोळी यांनी पुढील दोन आठवड्यांपर्यंत वानखेडे परिवाराबद्दल मंत्री महोदय सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाहीत असं सांगितलं.