बजरंग दल कार्यकर्त्याच्या हत्येनंतर शिमोगा का उसळला हिंसाचार?, असं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

हिजाबच्या वादामुळे निर्माण झालेला तणाव निवळत असतानाच शिमोगामध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. रविवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास काही अज्ञातांनी २३ वर्षीय हर्षा या तरुणावर हल्ला केला.

हे वाचलं का?

अज्ञातांनी केलेल्या प्राणघातक चाकू हल्ल्यात हर्षा जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याने प्राण सोडले होते. मगॅन हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केल्यानंतर ही वार्ता शहरात पसरली आणि वातावरण पुन्हा तणावपूर्ण बनतं गेलं.

ADVERTISEMENT

शवविच्छेदनानंतर पोलिसांनी हर्षाचं पार्थिव त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द केलं. त्यानंतर कडक बंदोबस्तात अंत्ययात्रा काढण्यात आली. अंत्ययात्रेदरम्यान संतप्त जमावाकडून दगडफेक करण्यात आल्याची घटना घडली. मुस्लिम बहुल असलेल्या शिमोगातील आझाद नगर परिसरात दगडफेक झाल्याचं इंडिया टुडेनं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत तीन जणांना अटक केली आहे.

ADVERTISEMENT

शीघ्र कृती दल आणि पोलिसांच्या बंदोबस्तात काढण्यात आलेल्या हर्षाच्या अंत्ययात्रेत कर्नाटकचे मंत्री ईश्वरप्पा, स्थानिक आमदार आणि शिमोगाचे खासदार बीवाय राघवेंद्र यांच्यासह अनेकजण सहभागी झाले होते. दरम्यान, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांच्या ह्त्येनंतर शिमोगामध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या. त्यामुळे १,२०० च्या जवळपास पोलीस आणि जवान तैनात करण्यात आले आहेत. त्याचबरोबर ४०० हून अधिक जवानांची कुमक बंगरुळु आणि राज्याच्या इतर भागातून बोलावण्यात आली आहे.

कर्नाटकाचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी घटनेचे पडसाद उमटण्यास सुरूवात झाल्यानंतर तत्काळ शांततेचं आवाहन केलं. प्रकरणाचा तपास सुरू असून, दोषींना अटक केलं जाईल, असं म्हणत शांततेचं आवाहन केलं.

२३ वर्षीय हर्षाच्या हत्येनंतर या घटनेचा संबंध गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या हिजाब वादाशी जोडला जात आहे. हर्षाने फेसबुकवर हिजाबशी संबंधित पोस्ट केल्यामुळे हत्या करण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळेच तीव्र पडसाद उमटताना दिसत आहे. मात्र, कर्नाटकचे गृहमंत्री आरगा ज्ञानेंद्र यांनी हे फेटाळून लावलं आहे.

कर्नाटकचे गृहमंत्री आरगा ज्ञानेंद्र यांनी सोमवारी मयत हर्षाच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी हर्षाची हत्येचा हिजाब वादाशी संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचण्याआधी सर्वांनी पुढील तपास होईपर्यंत प्रतिक्षा करायला हवी, असं ज्ञानेंद्र म्हणाले.

या प्रकरणात मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य ईश्वरप्पा यांनी मात्र मुस्लिम गुंडावर ठपका ठेवला आहे. या घटनेत मुस्लिम गुंडाचा समावेश असल्याचं ईश्वरप्पा यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर काँग्रेसचे डीके शिवकुमार यांनी मुस्लिम गुंडांना चिथावणी दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या घटनेवर राजकीय प्रतिक्रिया उमटल्या असून, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कर्नाटकचे गृहमंत्री ज्ञानेंद्र यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर हर्षाची हत्या करणाऱ्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणीही सिद्धरामय्या यांनी केली आहे.

जनता दल संयुक्तचे नेते तथा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी मात्र भाजपबरोबरच काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. राज्यात अशी घटना घडावी असं भाजप आणि काँग्रेसच्या मनात होतं. या पक्षांकडून राज्यात अशांतता निर्माण केली जात असल्याचा आरोपही कुमारस्वामींनी केला आहे. दरम्यान, सध्या शिमोगामध्ये कलम १४४ लागू करण्यात आलेलं असून, फक्त अत्यावश्यक वस्तू आणि सेवांनाच परवानगी देण्यात आलेली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT