सीताराम केसरींना खोलीत बंद करुन सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्षा झाल्या होत्या?

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

नवी दिल्ली: काँग्रेसने अनेक टीकांचा सामना केल्यानंतर पक्षाच्या अध्यक्षपदाची निवडणूक 17 ऑक्टोबरला घेण्याचा निर्णय घेतला आहे. या पदासाठी कोणीही दावा करु शकतो असे सांगण्यात आले आहे. मागच्या कित्येक वर्ष काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष नाहीये, त्यामुळे भाजप काँग्रेसवरती वारंवार टीका करत आहे.

यापूर्वी 2001 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक झाली होती, ज्यामध्ये सोनिया गांधी विजयी झाल्या होत्या आणि जितेंद्र प्रसाद यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. म्हणजेच 21 वर्षांपूर्वी अशाच एका निवडणुकीत दोन उमेदवार आमने-सामने आले होते. 2017 मध्ये काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूकही झाली होती, मात्र त्यात राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाली होती.

काँग्रेस अध्यक्षांची निवडणूक होणार की निवड?

138 वर्षांच्या प्रदीर्घ राजकीय इतिहासात काँग्रेसने अनेक संकटांचा सामना केला आहे, परंतु अस्तित्वाच्या संकटाचा सामना करण्याची ही कदाचित पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अशा वेळी योग्य अध्यक्ष निवडण्याचे मोठे आव्हान पक्षासमोर आहे. मात्र, ही निवडणूक होणार की निवड हा मोठा प्रश्न आहे. बरं, मागील निवडणूक आणि त्यापूर्वीच्या घडामोडींवर एक नजर टाकूया.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

नरसिंह राव यांची निवड कशी झाली?

काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठीची चढाओढ नवीन नाही. 1991 मध्ये तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष राजीव गांधी यांची हत्या झाली आणि पीव्ही नरसिंह राव पंतप्रधान झाले. तेव्हा पक्षातील वर्चस्वाची लढाई समोर आली. पुढच्याच वर्षी राव यांना काँग्रेसचे अध्यक्षही करण्यात आले.

हा काळ अनेक अर्थांनी महत्त्वाचा होता. 1990 च्या दशकाच्या सुरुवातीला जेव्हा आर्थिक बदल घडत होते आणि बाबरी मशीद पाडली गेली तेव्हा त्या वेळी गांधी घराण्यातील एकही व्यक्ती नव्हती. अशा परिस्थितीत नरसिंह राव यांच्यासमोर अनेक आव्हानं होती आणि ते गांधी घराण्याकडूनही लक्ष्य झाले होते. मात्र, तोपर्यंत सोनिया गांधी पक्षात सहभागी झाल्या नव्हत्या. काँग्रेसच्या अनेक निष्ठावंतांच्या मागणीला बगल देत त्यांनी पक्षात प्रवेश नाकारला. त्यांची मुलंही त्यावेळी लहान होती. परंतु सोनिया गांधी यांचा नरसिंह राव यांच्याशी असलेला दुरावाही कोणापासून लपून राहिलेला नाही.

ADVERTISEMENT

बाबरी मशीद पाडण्याचे काम थांबवण्यात राव यांच्या कथित अनिच्छेबद्दल आणि अटलबिहारी वाजपेयींचे कौतुक केल्याबद्दल सोनिया गांधींनी नाराजी व्यक्त केली होती. तथापि, दोघांमधील वादाचे प्रमुख कारण राव यांचा निर्णय होता, ज्यात त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात बोफोर्स घोटाळ्यातील राजीव गांधींवरील खटला फेटाळण्याला आव्हान दिले होते. 2020 मध्ये, राव यांच्या निधनानंतर अनेक वर्षांनी, सोनिया गांधी यांनी नरसिंह राव यांच्या नेतृत्व क्षमतेबद्दल सांगितले आणि पक्षाला त्यांच्या भूमिकेचा अभिमान असल्याचे सांगितले.

ADVERTISEMENT

सोनिया गांधी अध्यक्षा कशा झाल्या?

1996 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पराभवाला सामोरे जावे लागले आणि भाजपचे अटलबिहारी वाजपेयी सत्तेवर आले. मात्र, ते काही दिवसच पदावर राहिले आणि बहुमताअभावी त्यांचे सरकार पडले. यानंतर 1996 ते 1998 दरम्यान जनता दलाचे दोन नेते एचडी देवेगौडा आणि इंदर कुमार गुजराल पंतप्रधान झाले. काँग्रेसने त्यांना बाहेरून पाठिंबा दिला होता. या दोन वर्षांत सीताराम केसरी काँग्रेसचे अध्यक्ष होते, ते नेहरू-गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती होते. केसरी हे जवळपास दोन दशकं पक्षाचे कोषाध्यक्ष होते. राव यांनी त्यांच्यासाठी मार्ग तयार केला होता.

पण या सगळ्यात आणखी एक मोठी गोष्ट घडत होती. सोनिया गांधी यांनी 1997 मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांनी 1998 मध्ये लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती. दरम्यान, केसरींच्या विरोधातही वातावरण तयार होऊ लागले होते. शरद पवार आणि राजेश पायलट यांनी काँग्रेसला आव्हान दिले.

मात्र, सोनिया गांधी विजयी झाल्या आणि त्यांना अचानक काँग्रेस अध्यक्ष करण्यात आले. केसरींसोबत जे घडले ते ‘रक्तहीन सत्तापालट’ होते आणि लोकसभा निवडणुकीनंतर मार्च 1998 मध्ये सीताराम केसरी यांना काँग्रेस अध्यक्षपदावरून हटवण्यात आले होते, असे म्हटले जाते. प्रत्यक्षात सरकार स्थापनेसंदर्भात काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. मात्र सभेतच काही लोकांनी केसरी यांना लक्ष्य करत सोनिया गांधींना आपला अक्ष्यक्ष बनवण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक बोलावण्यास सांगितले.

मात्र, सीताराम केसरी यांनी त्यास नकार देत सभेतून बाहेर पडले. दरम्यान, सदस्यांकडून संधी मिळताच ठराव मंजूर करून सोनिया गांधी यांना पक्षाध्यक्ष करण्यात आले. इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, केसरींना एका खोलीत बंद करण्यात आले होते आणि सोनिया गांधी या पदावर सहजपणे निवडूण आल्या होत्या.

सोनिया गांधी यांच्याविरोधात निवडणूक कोणी लढवली?

सन 1998 मध्ये नाट्यमय घडामोडींमुळे अध्यक्ष बनल्यानंतर सोनिया गांधी यांना 2001 मध्ये निवडणूक लढवावी लागली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यावेळी गांधींना आव्हान देणारे जितेंद्र प्रसाद त्यांच्यासमोर होते. मात्र, या निवडणुकीतही सोनिया गांधींना एकतर्फी विजय मिळाला.

या निवडणुकीत सोनिया गांधींना कार्यकर्त्यांची 98.7 टक्के मतं (7448 मते) मिळाली, तर प्रसाद यांना 1.2 टक्के मतांवर (94 मते) समाधान मानावे लागले. हे जितेंद्र प्रसाद तेच आहेत ज्यांचा मुलगा जितिन प्रसाद गेल्या वर्षी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झाला होता. शाहजहांपूरचे रहिवासी असलेले जितेंद्र प्रसाद त्यांच्या जिल्ह्यातून तीन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते. याशिवाय काँग्रेसने त्यांना दोनदा राज्यसभेवर पाठवले.

राहुल गांधींची अध्यक्षपदावर वर्णी कशी लागली होती?

सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस दोनदा सत्तेवर आली आणि मनमोहन सिंग पंतप्रधान झाले. तथापि, त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसला इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 44 जागांवर घसरली. यानंतर अनेक राज्यात पक्षाचा पराभव झाला आणि अनेक बडे नेते पक्ष सोडून गेले.

साहजिकच अशा वातावरणात काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वावर प्रश्न उपस्थित झाले आणि अध्यक्ष बदलण्याची मागणी होऊ लागली. काँग्रेसने राहुल गांधींचे कार्ड खेळले आणि सोनिया गांधींनी सलग 19 वर्षांनी आपल्या मुलासाठी अध्यक्षपद सोडले.

मात्र, दोन वर्षांनंतर झालेल्या 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरं जावं लागले. पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देत गांधी-नेहरू कुटुंबाव्यतिरिक्त अन्य कोणाला तरी अध्यक्ष करण्याची मागणी केली. दरम्यान, सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा करण्यात आलं. आता तब्बल तीन वर्षांनंतर अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT