काँग्रेस अध्यक्ष निवडणूक : राहुल गांधींना बिनविरोध निवडण्यास पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बिनविरोध काँग्रेस अध्यक्ष करण्यास महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मतभेद असल्याचे समोर येत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे बडे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुल गांधी यांना बिनविरोध काँग्रेस अध्यक्ष करण्यास विरोध दर्शविला आहे. त्यांना अध्यक्ष व्हायचे अथवा करायचे असल्यास त्यांनी निवडणूक लढवावी अशी ठाम भूमिका चव्हाण यांनी मांडली आहे.

ADVERTISEMENT

राजस्थान, दिल्ली आणि छत्तीसगडनंतर महाराष्ट्र काँग्रेसनेही राहुल गांधी यांनी पुन्हा अध्यक्षपद स्वीकारावे आणि त्यांना बिनविरोध अध्यक्ष करावे असा ठराव मंजूर केला. सोमवारी (19 सप्टेंबर) पक्षातील नवनिर्वाचित प्रदेश प्रतिनिधींची बैठक मुंबईतील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. या बैठकीत हा ठराव मांडण्यात आला आणि तो मंजूरही झाला.

पृथ्वीराज चव्हाणांचा विरोध

कालच्या बैठकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राहुल गांधीसंदर्भातील हा ठराव मांडला. या ठरावाला माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी अनुमोदन दिले. तसेच इतर नेत्यांनी हात वर करून समर्थन केले. पण त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी मात्र हात वर केले नाहीत. त्यामुळे प्रदेश काँग्रेसमधील हे मतभेद चव्हाट्यावर आले.

हे वाचलं का?

राहुल गांधी यांनी अध्यक्षपदाची निवडणूक लढवावी, या भूमिकेवर चव्हाण कालही ठाम राहिले. कॉंग्रेसच्या अध्यक्षपदासाठी रितसर निवडणूक व्हावी, अशी भूमिका सुरवातीपासूनच त्यांनी घेतली आहे. कॉंग्रेस पक्षासाठी योग्य त्या सर्व गोष्टी पक्षाच्या नेत्यांनी करायला हव्यात अशी मागणी वेळोवेळी त्यांनी केली आहे.

दिवाळीपूर्वी मिळणार काँग्रेसला नवीन अध्यक्ष :

काँग्रेस अध्यपदाच्या निवडणुकीसाठी सध्या निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. यानुसार दिवाळीपूर्वी काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार आहेत. निवडणूक कार्यक्रमानुसार 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसुचना निघणार आहे. तर 24 ते 30 सप्टेंबरदरम्यान अर्ज दाखल करता येणार आहेत. मतदान आणि मतमोजणीची वेळ आल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यामुळे 24 ऑक्टोबरच्या दिवाळीपूर्वीच काँग्रेसला नवीन अध्यक्ष मिळणार आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT