आर्यन खानवर कारवाई ते क्लिनचीट, नवाब मलिकांची अटक; समीर वानखेडेंची बदली काय घडलं ८ महिन्यात?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

२ ऑक्टोबर हा गांधी जयंतीचा दिवस म्हणून देशभरात साजरा केला जातो. मात्र गेल्या वर्षीचा २ ऑक्टोबर हा दिवस एका वेगळ्याच कारणाने गाजला. कॉर्डिलिया या क्रूझवर एनसीबीने कारवाई केली आणि आर्यन खानसह आठ जणांना ड्रग्ज प्रकरणात अटक केली. पुढचा महिनाभर हे प्रकरण गाजत होतं. तर ही कारवाई करणारे त्यावेळी एनसीबीचे झोनल डायरेक्टर असलेले समीर वानखेडे यांची आता चेन्नईत बदली झाली आहे. मागच्या आठ महिन्यात काय काय घडलं आपण जाणून घेऊ या बातमीतून-

ADVERTISEMENT

समीर वानखेडे यांची आता महसूल गुप्तचर संचलनालयात करदाता सेवा संचालनालयाचे महासंचालक म्हणून नॉन सेसिंटिव्ह पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. आर्यन खानला २ ऑक्टोबरला अटक झाली होती त्यानंतर तो सुमारे २० दिवसांपेक्षा जास्त काळ तुरूंगात होता. त्याला २७ ऑक्टोबरला जामीन मिळाला आणि तो ३० ऑक्टोबरला तुरुंगाबाहेर आला.

आर्यन खानवर समीर वानखेडे यांनी कारवाई केल्यामुळे ते चर्चेत आले खरे. मात्र आर्यन खानच्या अटकेनंतर आरोप आणि प्रत्यारोपांची खरी लढाई रंगली ती नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यात. २ ऑक्टोबरची कारवाई झाल्यानंतर चार दिवसातच नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन ही एनसीबीने केलेली कारवाई म्हणजे फर्जिवाडा असल्याचं म्हटलं होतं. त्या एका पत्रकार परिषदेनंतर जवळपास रोज नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किंवा ट्विट करून समीर वानखेडेंवर विविध आरोप केले.

हे वाचलं का?

आर्यन खानला क्लिन चिट, समीर वानखेडे, सना मलिक काय म्हणाले?

नवाब मलिक यांचे आरोप काय होते?

ADVERTISEMENT

आर्यन खान प्रकरणात नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोवर (NCB) निशाणा साधला होता. मलिक यांनी एनसीबीचे साक्षीदार फिक्सर असल्याचा आरोप केला होता. NCB केवळ ठराविक साक्षीदारांद्वारे बनावट छापे मारते. असा आरोप केला होता. त्यांच्या या आरोपानंतर एनसीबीचे अधिकारी अस्वस्थ झाले. पण तरीही त्यांनी यावर फार काही भाष्य केलं नव्हतं.

ADVERTISEMENT

यानंतर मंत्री नवाब मलिक यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांची बहीण जस्मिन वानखेडे आणि फ्लेचर पटेल नावाच्या व्यक्तीचे फोटो शेअर करुन काही सवाल उपस्थित केले होते. समीर वानखेडे यांना शाहरुख खानकडून पैसे वसुल करायचे होते असाही आरोप नवाब मलिकांनी केला होता.

फ्लेचर पटेल हा जास्मिन वानखेडेंचा भाऊ असल्याचं म्हटलं जात आहे. पण हाच व्यक्ती एनसीबीच्या अनेक प्रकरणांमध्ये पंच किंवा साक्षीदार कसा काय असतो? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला होता.

नवाब मलिक यांनी वानखेडेंवर निशाणा साधताना आणि म्हटले की, समन्स बजावण्यात आलेले सेलिब्रिटी हे मालदीवमध्ये होते तेव्हा समीर त्यांच्याकडून पैसे गोळा करायला गेला होते का?

समीर वानखेडे हे जातीने मुस्लिम असून सरकारी नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

एवढंच नाही तर समीर वानखेडे यांच्या पहिल्या पत्नीचा फोटोही त्यांनी ट्विट केला होता, त्यानंतर त्यांच्या सासऱ्यांचं एक वक्तव्यही समोर आलं होतं की समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत. त्यावरूनही नवाब मलिक यांनी आरोप केले होते.

समीर वानखेडे यांच्या वडिलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचाही आरोप नवाब मलिक यांनी केला होता.

या सगळ्या दरम्यान समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे, दुसरी पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर तसंच जस्मिन वानखेडे यांनी वारंवार भाष्य करत समीर वानखेडे यांचा बचाव करण्याचा आणि त्यांची बाजू कशी योग्य आहे त्यांना कसा जाणीवपूर्वक त्रास दिला जातो आहे? हे वारंवार सांगितलं. त्यामुळे क्रांती रेडकर, ज्ञानदेव वानखेडे विरूद्ध नवाब मलिक यांच्यातही आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या.

कोण आहेत समीर वानखेडे?

महाराष्ट्राचे रहिवासी असलेले समीर वानखेडे २००८ च्या बॅचचे IRS ऑफिसर आहेत. प्रशासकीय सेवेत लागू झाल्यानंतर समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर आपल्या कामात दाखवलेल्या प्रावीण्यामुळे समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. अमली पदार्थविरोधी प्रकरणांमध्ये तपासात समीर वानखेडे यांचा विशेष हातखंडा मानला जातो.

समीर वानखेडेंच्या नेतृत्वाखालीच गेल्या दोन वर्षांत १७ हजार कोटींच्या अमली पदार्थ तस्करीचं रॅकेट उध्वस्त केलं आहे. मागच्या वर्षातच वानखेडे यांनी DRI मधून NCB मध्ये बदली करण्यात आली होती. आता आर्यन खान प्रकरणात तोंडघशी पडल्यानंतर समीर वानखेडे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांच्या आरोपांनंतर काय काय झालं?

समीर वानखेडे यांच्यावर सातत्याने विविध आरोप केल्यानंतर मुख्य गोष्ट ही घडली की या प्रकरणातले पंच तसंच साक्षीदार गायब झाले. मनिष भानुशाली, किरण गोसावी, प्रभाकर साईल असे सगळेच जण एका पाठोपाठ एक कुणाच्याच समोर आले नाहीत.

ऑक्टोबर महिन्यातच किरण गोसावीचा ड्रायव्हर असलेला प्रभाकर साईल हा साक्षीदार फुटला आणि या सगळ्या प्रकाराला एक नवं वळण मिळालं. प्रभाकर साईलने केलेला प्रमुख आरोप हा होता की समीर वानखेडेंना शाहरुख खानकडून बक्कळ खंडणी वसूल करायची होती. त्यासंदर्भात डील झालं होतं ते फिस्कटल्याने आर्यन खानला अडकवण्यात आलं असंही त्याने सांगितलं.

प्रभाकर सईलच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी समीर वानखेडे आणि इतरांविरुद्ध प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. मंगळवारी रात्री प्रभाकरचा जबाब कॅमेऱ्यात रेकॉर्ड करण्यात आला आहे. डीसीपी स्तरावरील अधिकाऱ्याने प्रभाकरचे म्हणणे घेतले असून, त्यानंतर तपास सुरू केला

२६ ऑक्टोबर २०२१ ला समीर वानखेडे दिल्लीतल्या एनसीबीच्या मुख्यालयात गेले होते दिल्लीतील नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुख्यालयात एसएन प्रधान यांची भेट त्यांनी घेतली.

यानंतर आर्यन खान आणि कॉर्डिलिया क्रूझ प्रकरणाची चौकशी आणि संपूर्ण तपास दिल्ली एनसबीच्या विशेष तपास पथकाकडे गेला.

नोव्हेंबर महिना उजाडला तरीही या प्रकरणातल्या आरोपांची फोडणी काही थांबायचं नाव घेत नव्हती. समीर वानखेडेंनी निकाह कसा केला होता? समीर वानखेडेंनी आणखी फसवेगिरी केली आहे. त्यांचे वडील उत्पादन शुल्क विभागात नोकरीला होते. बोगसगिरी करण्यात ते माहिर होते. त्यांनी १९९७-९८चं जिल्ह्याचं नोंदवही आहे. त्यात हॉटेल सद्गुरू नावे बारचं लायसन्स कसं दिलं गेलं? हे प्रश्न विचारणं आणि ट्विट करणं नवाब मलिक यांनी सुरूच ठेवलं.

डिसेंबर महिन्यातही अशाच प्रकारचे काही आरोप प्रत्यारोप झाले आणि प्रकरण मागे पडत गेलं. डिसेंबर महिन्यात महापरिनिर्वाणाच्या दिवशी म्हणजेच ६ डिसेंबरला जेव्हा समीर वानखेडे हे चैत्यभूमिवर गेले तेव्हा तिथे त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी झाली. तर १० डिसेंबरला समीर वानखेडे आणि त्यांची पत्नी क्रांती रेडकर कोर्टात धाव घेतली.

गुगल, फेसबुक आणि ट्विटर यावरून होणारी बदनामी रोखण्यासाठी क्रांती रेडकर आणि समीर वानखेडेंनी आता कोर्टात दावा दाखल केला आहे. गुगल, फेसबुक आणि ट्विटरवर होणारी आमची आणि आमच्या नातेवाईकांची बदनामी रोखण्याची विनंती या दाव्यामध्ये करण्यात आली आहे. या तिन्ही माध्यमांतून आमची आणि आमच्या नातेवाईकांची बरीच बदनामी झाली आहे. ती रोखण्यासाठी आता आम्ही कोर्टात धाव घेतली असं या दोघांनी सांगितलं.

फेब्रुवारी महिन्यात नवाब मलिक यांना अटक झाली…

दाऊदच्या भावामुळे नवाब मलिक सापडले ईडीच्या जाळ्यात?

2017 साली इक्बाल कासकर, अनिस इब्राहिम, आणि दाऊद इब्राहिम यांच्याविरोधात ठाण्यात एक एफआयआर दाखल करण्यात आली होती. याच प्रकरणी खंडणीविरोधी पथकाने इक्बाल कासकरला अटक केली होती. काही वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी इकबाल कासकर आणि अनीस इब्राहिम आणि इतरांविरुद्ध रिकव्हरी प्रकरणात गुन्हा दाखल केला होता ज्यांची कागदपत्रे ईडीने ताब्यात घेतली होती

15 फेब्रुवारी 2022- दाऊद इब्राहिमविरोधात नुकत्याच दाखल झालेल्या तक्रारीनंतर ईडीने 14 आणि 15 फेब्रुवारीला मुंबईतील अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते. यावेळी ईडीची एक टीम हसीना पारकर हिच्या घरी देखील पोहचली होती. इथे ईडीच्या टीमने काही कागदपत्रं देखील तपासली होती.

17 फेब्रुवारी 2022- ईडीने छोटा शकीलचा मेव्हणा सलीम फ्रुटला देखील चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलं होतं. सलीम फ्रुटने काही काळापूर्वी पाकिस्तानला जाऊन आल्याची ईडीला माहिती मिळाली होती. तसेच भेंडी बाजारात चालत असलेल्या एका गँगसाठी सलीम फ्रुट काम करत असल्याचंही ईडीला समजलं होतं.

18 फेब्रुवारी 2022- ईडीने जी कागदपत्रं ताब्यात घेतली त्या कागदपत्रांच्या आधारे एनआयएने (NIA) नुकताच गुन्हा नोंदवला होता या प्रकरणाच्या आधारे ईडीने देखील मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल केला.

18 फेब्रुवारी 2022- भारतीय तपास संस्थेने (NIA) अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकीलसह डी-कंपनीच्या सात जणांविरुद्ध एफआयआर नोंदवला होता. एनआयएच्या तपासात काही दिवसांपूर्वी असं समोर आलं होतं की, दाऊद इब्राहिम याने एक ग्रुप तयार केला आहे. ज्यामध्ये मुंबई किंवा देशाच्या दुसऱ्या भागात कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याची तयारी होती. त्यात खूप लोकांशी संपर्क केला होता. त्यानंतर एनआयएने याप्रकरणी एक एफआयआर दाखल केली होती.

18 फेब्रुवारी 2022- कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकरला ठाणे कारागृहातून ED ने ताब्यात घेतलं आहे.

21 फेब्रुवारी 2022- मनी लाँड्रिंगप्रकरणी दाऊद इब्राहिमचा भाचा आणि हसीना पारकरचा मुलगा अली शाह पारकर याची ईडीने चौकशी केली. हसीना पारकरच्या घरातून मिळालेल्या कागदपत्रांच्या बाबतीत चौकशी करण्यासाठी अली शाह याला ईडी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं.

22 फेब्रुवारी 2022- 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्री नीरज गुंडे यांनी एक ट्विट केलं होतं. ज्यामध्ये असं म्हटलं होतं की, ‘सूत्रांकडून मिळालेली माहिती: दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याने ईडीच्या कस्टडीत असताना महाराष्ट्रातील राजकारण्यांनी केलेल्या गुंतवणुकीचे बरेच तपशील दिले आहेत. तसेच दाऊद आणि छोटा शकीलच्या भारतातील आणि परदेशातील गुंतवणुकीचा तपशीलही दिला आहे.’

23 फेब्रुवारी 2022- आज पहाटेच कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांच्या घरी ईडीचं पथक पोहचलं. ज्यांनी जवळजवळ दोन तास घरातच त्यांची चौकशी केली होती. त्यानंतर त्यांना ईडी कार्यालयात नेलं आणि दुपारी तीन वाजेच्या सुमारास अटक करण्यात आली. आता या सगळ्यात असा दावा केला जात आहे की, इक्बाल कासकरने दिलेल्या काही माहितीच्या आधारेच नवाब मलिक यांना अटक करण्यात आली

समीर वानखेडेंवर सातत्याने आरोप करणारे नवाब मलिक दाऊदशी संबंधित व्यक्तींसोबत आणि बॉम्बस्फोटाच्या खटल्यात आरोपी असलेल्या शाहवली खान सोबत व्यवहार केल्याच्या आरोपांखाली तुरुंगात आहेत. त्यांना अद्यापही जामीन मिळालेला नाही. मात्र मागच्या शुक्रवारी म्हणजेच २७ मे रोजी आर्यन खानला एनसीबीच्या विशेष एसआयटीने क्लिन चीट दिली आणि त्यानंतर त्यांच्या मुलीनेही ट्विट केलं की नवाब मलिक जे काही सांगत होते ते सत्यच होतं. हा सगळा फर्जिवाडाच होता. एक कारवाई झाली त्यात बड्या अभिनेत्याचा मुलगा अडकला त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली. तर त्याच्यावर कारवाई करणारे समीर वानखेडे यांची बदली झाली आहे. मागच्या आठ महिन्यात घडलेल्या या घडामोडी एक प्रकरण कुठवर जाऊ शकतं हेच दाखवून जाणाऱ्या ठरल्या आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT