‘हर हर महादेव’ विरोधाची धार तीव्र; बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचाही आक्षेप

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या विरोधाची धार आता आणखी तीव्र झाली आहे. संभाजीराजे छत्रपती, अनेक इतिहासकार, राजकारणी यांच्यानंतर या वादात आता बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनीही उडी घेतली आहे. बाजीप्रभू देशपांडे यांच्या तेराव्या आणि चौदाव्या वंशजांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन आक्षेप नोंदविले आहेत. तसंच या चुकीच्या बाबी दुरूस्त केल्या नाही तर कायदेशीर कारवाई करू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

प्रा. रुपाली देशपांडे काय म्हणाल्या?

बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज प्रा. रुपाली देशपांडे म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आराध्य दैवत आहे. पण या चित्रपटात बाजीप्रभू देशपांडे यांच्या तोंडी अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख दाखविण्यात आला आहे. तो हा असा उल्लेख टाळू शकले असते. हिरडस मावळ शिरवळ येथे त्यांनी समुद्र किनारा दाखवला आहे, पण प्रत्यक्षात इथे कुठेही समुद्र किनारा नाही. इथे निरा नदी आहे.

सोबतच इथून इंग्रज आपल्या मराठी मुलींना अगदी सहजपणे बोटीतून घेऊन जात आहेत, असं दाखविण्यात आलं आहे. पण प्रत्यक्षात त्यावेळी मावळ प्रांतात इंग्रजांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राबल्य होतं का हा मोठा प्रश्न आहे. याबाबत आपण इतिहास तज्ञ आणि लेखकांशीही चर्चा केली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे महाराजांनी इंग्रजांना थोपवून ठेवलं होतं आणि इथे समुद्र नाही, हे आपल्याला देखील माहित आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तिसरा आक्षेप, चित्रपट स्वातंत्र्याच्या नावाखाली बाजीप्रभू देशपांडे आणि बंधू फुलाजी देशपांडे यांच्यामध्ये लहानपणी एक तंटा दाखविण्यात आला आहे. याला विश्वासघात असं नाव दिलं आहे. फुलाजी यांनी बाजीप्रभूंचा विश्वासघात केला, असं दाखवलं आहे. पण प्रत्यक्षात या तंट्याचे कुठेही ऐतिहासिक संदर्भ नाहीत. संदर्भाशिवाय त्यांनी हे दाखविणं योग्य नाही. यामुळे फुलाजी यांची प्रतिमा डागाळली जात आहे. प्रत्यक्षात या दोन वीर भावांची समाधी विशाळगडावर शेजारी-शेजारी आहे. हे दोघेही वीरबंधू स्वराज्यासाठी, महाराजांसाठी धारातीर्थी पडले.

अफजलखानाच्या वधावेळीही बाजीप्रभू देशपांडे तिथं हजर नव्हते. पण प्रत्यक्षात ते तिथं तंबूच्या बाहेर हजर होते आणि ते इतर लोकांना मारत आहेत, असं दाखवलं आहे. सोबतच बाजीप्रभू देशपांडे हे अफजलखानाला आमिष दाखविण्यासाठी देऊळं बांधत आहेत, हे दाखविण्यात आलं आहे. पण हे इतिहासाला धरुन आहे का? शिवा काशिद या महत्वाच्या व्यक्तीरेखेला थोडक्यात संपविण्यात आलं आहे. बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यातील वादाचे कारणही खटकणारे आहे. स्त्रियांचा बाजार आणि पाटील या वेगळ्या गोष्टींमुळे हा वाद असल्याचं दाखविण्यात आलं आहे, असे आक्षेप नोंदविण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

हा चित्रपट प्रदर्शित करण्यापूर्वी फस्ट कट दाखवला जावा, अशी मागणी आम्ही केली होती. पण हा फस्ट कट दाखविला नाही. त्यामुळे आता चित्रपट पाहून आम्ही हे आक्षेप नोंदवत आहोत. तसंच आता याबाबत आपण सेन्सर बोर्डला पत्र लिहिणार आहोत. यानंतरही या चुकांची दुरुस्ती झाली नाही तर निर्माते आणि दिग्दर्शकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा यावेळी प्रा. रुपाली देशपांडे यांनी दिला.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT