Maharashtra Rain: Satara जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ, कोयना धरणातील पाणीसाठा प्रचंड वाढला; चिपळूण-कराड मार्गावर पाणी
महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी पहाटेपासून कोयना धरणात प्रतिसेकंद तब्बल 1 लाख 73 हजार 935 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे. बुधवार सायंकाळी पाच वाजता धरणात 58.51 टीएमसी पाणी होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणात 66.75 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. त्यामुळेच धरणात अवघ्या अकरा तासात […]
ADVERTISEMENT

महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत आहे. गुरुवारी पहाटेपासून कोयना धरणात प्रतिसेकंद तब्बल 1 लाख 73 हजार 935 क्युसेक पाण्याची आवक होऊ लागली आहे. बुधवार सायंकाळी पाच वाजता धरणात 58.51 टीएमसी पाणी होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता धरणात 66.75 टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. त्यामुळेच धरणात अवघ्या अकरा तासात 8.25 टीएमसी पाण्याची आवक झाली असून महाबळेश्वर, नवजा, कोयना या धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे.
मागील अकरा तासात कोयना धरणात सरासरी 84 हजार 416 क्युसेक पाण्याची आवक झाली आहे. तर पहाटे पाच वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत या एक तासात धरणातील पाण्याची आवक 1 लाख 54 हजार 9 क्युसेकपर्यंत पोचली आहे. त्यामुळे पहाटेपासून कोयना धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सकाळी सहा वाजल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत दोन तासात धरणातील पाण्याची आवक 1 लाख 73 हजार 935 क्युसेकपर्यंत पोहोचली होती.
दरम्यान, कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बुधवारी रात्री पायथा वीजगृहातून 20 मेगावॅट वीज निर्मितीनंतर प्रतिसेकंद 2100 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्याचा निर्णय कोयना धरण व्यवस्थापनाकडून घेण्यात आला आहे. 22 जुलै रोजी सकाळी हे पाणी सोडले जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे कृष्णा आणि कोयना या दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत अगोदरच मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यातच आता कोयना धरणाचा पायथा वीजगृहातून पाण्याचा विसर्ग सुरू होणार असल्याने कृष्णा तसेच कोयना नदी काठच्या गावांना प्रशासनाकडून दक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.