kabul Blast Video : काबूल पुन्हा हादरलं! विमानतळ परिसरात रॉकेट हल्ला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

अफगाणिस्तानची राजधानी काबूल अवघ्या दोन दिवसांत पुन्हा हादरली. काबूल विमानतळ परिसरात दहशतवाद्यांनी रॉकेट हल्ला केला. रविवारी सायंकाळी करण्यात आलेल्या या हल्ल्याची दृश्ये समोर आली असून, यात जीवित हानी झाल्याचं वृत्त आहे.

दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा काबूल विमानतळाला लक्ष्य करत हल्ला केला आहे. काबूल विमानतळावर दहशतवाद्यांकडून पुन्हा हल्ला केला जाणार असल्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यानंतर रविवारी सायंकाळी दहशतवाद्यांनी विमानतळ परिसरातील नागरी भागात रॉकेट हल्ला केला. काबूल विमानतळाजवळील खाजेह बग्रा परिसरातील गुलई भागात रॉकेट डागण्यात आल्याची माहिती आहे.

आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ३ नागरिक जखमी झाले असून, जखमींमध्ये महिला व लहान मुलांचा समावेश असल्याचं वृत्त आहे. अफगाणिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाशी संबंधित सूत्रांनी हल्ल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून पुन्हा हल्ला होण्याची शंका व्यक्त करण्यात आल्यानंतर रॉकेट डागण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

तीन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी दहशतवाद्यांनी काबूलमधील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर भीषण आत्मघाती स्फोट घडवून आणले होते. आयसिसच्या दहशतवाद्यांनी विमानतळ परिसरात फिदायीन बॉम्बस्फोट केला होता. या हल्ल्यात १७० नागरिक मरण पावले होते. ज्यात १३ अमेरिकन जवानांचाही समावेश होता.

अमेरिकन लष्कराकडून ‘आयसिस’च्या दहशतवाद्यावर हल्ला

ADVERTISEMENT

अमेरिकन लष्कराने रविवारी एका संशयित स्फोटकं असलेल्या आत्मघाती कारला लक्ष्य करण्यात आलं. यात आयसिसच्या अतिरेक्यांना लक्ष्य करण्यात आलं. काबूल विमानतळावर हल्ला करण्याचा अतिरेक्यांचा उद्देश होता. त्यामुळे त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याचं वृत्त असोसिएट प्रेसने अमेरिकन लष्करातील अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलं आहे.

ADVERTISEMENT

काबूल विमानतळावर ‘आयसिस’च्या हल्ल्यांचा धोका

अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य आल्यापासून अस्थिरत माजली आहे. त्यामुळे नागरिक दुसऱ्या देशांमध्ये आश्रय घेत आहेत. तर अनेक देश अफगाणिस्तानात असलेल्या नागरिकांना परत घेऊन जात आहे. याचदरम्यान, काबूल विमानतळावर दहशतवादी संघटना ‘आयसिस’कडून दोन बॉम्बस्फोट घडवून आणण्यात आले.

या बॉम्बस्फोटानंतर आयसिस पुन्हा हल्ला करणार असल्याचा इशारा तालिबान व अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनीही दिला होता. पुढील २४ ते ३६ तासांत काबूल विमानतळावर हल्ला होण्याची शक्यता आहे, असं बायडेन यांनी म्हटलं होतं. परिस्थिती गंभीर असून, विमानतळावरील धोका वाढला आहे, असं बायडेन यांनी शनिवारी सुरक्षा अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर म्हटलं होतं.

अमेरिकेच्या इशाऱ्यानंतर विमानतळावर अलर्ट जारी करण्यात आला होता. अमेरिकन नागरिकांना विमानतळ आणि विमानतळ परिसरातून तातडीने स्थलांतरीत होण्याचे आदेश देण्यात आले होते. काबूल विमानतळावरील हल्ल्याबद्दल अमेरिककडून पहिला इशारा गुरूवारी देण्यात आला होता. त्याच दिवशी सायंकाळी दोन बॉम्बस्फोट झाले होते. आयसिस खुरासान (ISIS-K) या संघटनेनं हा बॉम्बस्फोट घडवला होता.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT