मध्यप्रदेशचे CM उद्योजकांशी चर्चा करण्यासाठी पुण्यात; काँग्रेसचा शिंदे-फडणवीसांवर निशाणा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा महाराष्ट्रातील बड्या उद्योजकांसोबत चर्चा करण्यासाठी पार पडलेला पुणे दौरा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. राज्यातील उद्योग आता गुजरातपाठोपाठ मध्यप्रदेशला पळविण्याचा डाव असल्याचा आरोप करत काँग्रेसने या दौऱ्यावर टीका केली. तसंच महाराष्ट्राची लूटमार कधीपर्यंत सहन करायची? शिंदे-फडणवीसांना महाराष्ट्राचे नुकसान स्वतःच्या राजकीय फायद्यापेक्षा छोटे वाटते का? असा उद्विग्न सवालही काँग्रेसनं केला.

ADVERTISEMENT

मध्य प्रदेशच्या चौहान सरकारतर्फे महाराष्ट्रातील उद्योजकांना आकर्षित करण्यासाठी आणि मध्य प्रदेशमधील उद्योगसंधी दाखविण्यासाठी पुण्यात ‘इन्वेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज इन मध्यप्रदेश’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यासोबत मध्यप्रदेशचे उद्योग आणि कृषी मंत्री, आयएएस अधिकारी असे सर्वजण पुण्यात आले होते. या दौऱ्यानंतर चौहान यांनी संजय किर्लोस्कर, बाबा कल्याणी, अश्विनी मल्होत्रा अशा अनेक उद्योगपतींशी वैयक्तिक भेट घेऊन चर्चा केली.  

या वादावर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान काय म्हणाले?

यानंतर चौहान यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्यप्रदेशमध्ये आमंत्रित केलं आहे. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मी मध्यप्रदेशमध्ये आमंत्रित करतो. त्यांनी यावं आणि तिकडच्या उद्योगपतींना भेटावं, चर्चा करावी, असं म्हणत या देशात कुणीही कुठेही जाऊ शकतो असा टोला त्यांनी लगावला. तसंच, महाराष्ट्राच्या अनेक उद्योगांनी मध्यप्रदेशमध्ये येण्याचं आश्वासन दिलं असल्याचा मोठा दावा त्यांनी केला.

हे वाचलं का?

उदय सामंत यांचंही उत्तर :

काँग्रेसच्या आणि विरोधकांच्या या आरोपांवर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही उत्तर दिलं. ते म्हणाले, इतर राज्यातील मुख्यमंत्री आले म्हणजे ते रोजगार पळवण्यासाठी आले आहेत, असे नाही. वेदांता निघून गेली म्हणून खूप आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, मागील १४ महिन्यांपासून ही बैठक झाली नव्हती. तसंच देशात नवीन उद्योग येण्यासाठी महाराष्ट्राची पॉलिसी सर्वात चांगली आहे, मात्र त्याचं व्यवस्थित प्रेझेंटेशन झालं पाहिजे, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT