नरेंद्र दाभोळकर हिंदू विरोधी होते? न केलेल्या कवितेवरून सोशल मीडियावर बदनामी, वाचा काय आहे प्रकरण?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

विवेकवादी कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी आपलं आयुष्य वेचणारे नरेंद्र दाभोळकर यांना समाजातील, तळागाळाती अंधश्रद्धा मिटावी यासाठी नरेंद्र दाभोळकर आयुष्यभर झटले. 20 ऑगस्ट 2013 ला नरेंद्र दाभोळकर यांची पुण्यात ओंकारेश्वर पुलावर अज्ञातांनी गोळ्या घालून हत्या केली. त्यांचे मारेकरी अद्यापही फरार आहेत. नरेंद्र दाभोळकर यांचं कार्य संपवण्याचा कुठेतरी विवेकाचा आणि विज्ञाननिष्ठ चळवळ संपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र नरेंद्र दाभोळकर यांचं कार्य थांबलेलं नाही. त्यांच्या मुलांनी म्हणजेच हमीद आणि मुक्ता दाभोळकर या दोघांनीही हे कार्य अविरतपणे सुरू ठेवलं आहे. आपलं सगळं आयुष्य अंधश्रद्धा निर्मुलनासाठी वेचणाऱ्या दाभोळकरांची बदनामी सोशल मीडियावर सुरू आहे. एक कविता त्यांच्या नावाने व्हायरल केली जाते आहे. तसंच डॉ. सचिन चिंगरे यांनी त्या कवितेला दिलेलं उत्तरही व्हायरल होतं आहे. याबाबत मुंबई तकने डॉ. हमीद दाभोळकर यांच्याशी संपर्क साधला त्यावेळी त्यांनी हे उत्तर दिलं की जी कविता व्हायरल होते आहे ती नरेंद्र दाभोळकर यांची कविताच नाही. आपण जाणून घेऊ काय आहे हे संपूर्ण प्रकरण.

ADVERTISEMENT

नरेंद्र दाभोळकर यांच्या नावाने कोणती कविता व्हायरल झाली आहे?

हे वाचलं का?

मुर्त्यांना पुजण्यापेक्षा,

माणुसकीला पूजतो मी

ADVERTISEMENT

काल्पनिक देवांना न मानता,

ADVERTISEMENT

फुले,शाहू,आंबेडकरांना वाचतो मी

छाती ठोकून सांगतोय,

असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

पोथ्या,पुराणे वाचण्यापेक्षा

शिवरायांना वाचतो मी

दगडासमोर त्या कशाला झुकू?

जिजाई,सावित्री, रमाईपुढे नतमस्तक होतो मी

छाती ठोकून सांगतोय,

असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

घामाचे पैसे दानपेटीत टाकून,

भटांची घरे भरत नाही मी

तहानलेल्यांना पाणी,

भूकेलेल्यांना अन्न देऊन,

त्यांच्यातच देव शोधतो मी

छाती ठोकून सांगतोय,

असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

हिंदू,मुस्लिम,सिख,ईसाई म्हणून जगण्यापेक्षा,

माणूस म्हणून जगतो मी

धर्मातील पाखंडांना न जपता,

माणूसपणालाच जपतो मी

छाती ठोकून सांगतोय,

असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

कर्तुत्ववान माणसापेक्षा,

दगडाला श्रेष्ठ समजत नाही मी

मंत्र,होमहवन,कर्मकांड यांना पायाखाली तुडवून,

मनगटावर भरवसा ठेवतो मी

छाती ठोकून सांगतोय,

असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

मांजर आडवी गेली म्हणून न थांबता,

थेट माझ्या ध्येयाजवळ त्या पोहोचतो मी

अंधश्रद्धेला मातीत लोळवून,

विज्ञानवाद स्विकारतो मी

छाती ठोकून सांगतोय,

असत्य नाकारणारा नास्तिक आहे मी

ही कविता नरेंद्र दाभोळकर यांनी केली आहे असं लिहून डॉ. सचिन चिंगरे यांनी या कवितेला उत्तर दिलं आहे.

काय आहे सचिन चिंगरे यांचं म्हणणं?

दाभोळकर ही केवळ एक व्यक्ति नसून (केवळ हिन्दू) धर्म चिकित्सा करू पाहणारी, वरुन स्वतः ला नास्तिकही म्हणविणारी एक बेगडी प्रवृत्ती आहे असे मी मानतो .

दाभोळकरांच्या जादूटोणाविरोधी कार्याचा मी आदर करतो.परंतु फक्त हिन्दू धर्मपरंपरेवरील एकांगी टीकेचा निषेध करतो. माझी ऊत्स्फूर्त प्रामाणिक कविता या अप्रामाणिक ,हिंदुत्वद्वेष्टया, खोट्या धर्मनिरपेक्ष परंपरेवर परखड नर्भीड टीका करते. हे माझेही संविधानदत्त अभिव्यक्ति स्वातंत्र्य आहे.

हिंस्त्र धर्मांध कट्टरांना

घाबरुन पळतो मी

शांत सहिष्णू हिंदूंनाच

यथेच्छ शब्दांनी झोडतो मी

नी वर छाती ठोकून सांगतो

सत्य नाकारणारा बेगडी

सेक्युलर नास्तिक आहे मी

टीका करतो गणेशोत्सवावर

मोहर्रम ताबूतला डरतो मी

बकरीदला मी शेळी होतो

होळीवर शूर टीका करतो मी

नी वर छाती ठोकून सांगतो

सत्य नाकारणारा बेगडी

सेक्युलर नास्तिक आहे मी

उपहास करतो तीर्थयात्रांचा

हज बाबत चूप बसतो मी

आरतीने ध्वनिप्रदूषण म्हणतो

बांगेपुढे नतमस्तक होतो मी

नी वर छाती ठोकून सांगतो

सत्य नाकारणारा बेगडी

सेक्युलर नास्तिक आहे मी

मंदिर, भट, दक्षिणा दिसते

दर्गे ,पीर,चढावा दिसत नाही

जणू हिन्दू धर्मातच फक्त दोष

ईतरांत एकही असत नाही

नी वर छाती ठोकून सांगतो

सत्य नाकारणारा बेगडी

सेक्युलर नास्तिक आहे मी

मी पुरोगामी दहशतवाद

ही श्रद्धा ती अंधश्रद्धा ठरवतो

कावळा होत हर हिन्दूसणाला हटकून अपशकून करवतो

वर छाती ठोकून सांगतो

सत्य नाकारणारा बेगडी

सेक्युलर नास्तिक आहे मी

कुर्हाडीचा दांडा गोतास काळ

अस्सा मी द्वाड आहे

क्रूर देशद्रोही धर्मांधांपुढे

शेपूटघालू भ्याड आहे मी

नी वर छाती ठोकून सांगतो

सत्य नाकारणारा बेगडी

सेक्युलर नास्तिक आहे मी

दाभोळकर तेव्हा तुम्ही गप्प का?

देवाला फूल चढ़वलं जातं

तेव्हा तुम्ही रागवता!

मग मेणबत्ती पेटवते वेळी

चौथर्‍यावर चादर चढ़वते वेळी

तुम्ही गप्प्प का दाभोळकर?

माझा गणपती घरी येतो

तेव्हा तुम्ही टिका करता!

त्यांचा शांताक्लॉज येतो त्यावेळी

त्यांचा मसीहा येतो त्यावेळी

तुम्ही गप्प का दाभोळकर?

माझ्या मुलांच जावळ उतरवणं

तुमच्या नजरेत जुनाट चालीरीत!

त्यांचं मुल मेरीच्या मांडीवर देते वेळी

त्यांची सुंता होते त्यावेळी

तुम्ही गप्प का दाभोळकर?

आमचे व्रत उपवास सण

तुम्हाला नकोसे होतात!

पण त्यांचा रोजाच्या वेळी

यांचा गुडफ्रायडे वेळी

तुम्ही गप्प का दाभोळकर?

माझ्या शिक्षणात धर्माला जागा नाही

त्यांचं मात्र धर्मावर शिक्षण बंधनकारक

ख्रिस्ती शाळेत येशु मूर्तीरूपानं हज़र

त्यावेळी तुम्ही गप्प का दाभोळकर?

स्री शिक्षणातली हिंदू सावित्री

कधी तुम्ही समजूनच घेतली नाही

कारण मुस्लिम बुरख्यातुन व

पाश्चमात्य नग्नता

चांगली वाटली ना दाभोलकर?

आमचे एकपत्नी राम व त्यांचं कुटुंबनियोजन

तुम्ही जगासमोर मांडलंच नाही

कारण एकाच पुरुषाच्या ४ बायका व त्याची २० पोर

तसेच दर सिजनला बायका बदलणारे पाश्चिमात्य

तुमच्या मनाला जास्त भावले का?

विचार करा दाभोळकर अन मग सांगा तेव्हा तुम्ही गप्प का?

माझी ती अंधश्रद्धा जगासमोर मांडलीत, मग इतरांची ती काय?

म्हणे सत्यशोधक कुराणातील काहीच असत्य नाही का?

अन् बायबलमध्ये तिथेही काहीच असत्य नाही?

की सत्य शोधण्याचा व अपप्रचार करण्याचा छंद केवळ हिंदुत्वा पुरताच मर्यादीत ठेवणे

तेवढे सोयीस्कर वाटले का तुम्हाला दाभोळकर?

असेच निर्भीडपणे लिहिणारे हिंदूअभिमानी जागोजागी तयार झाले पाहिजेत तरच या तथाकथित फेक्युलर पुर्रोगाम्याना चाप बसेल नाहीतर कोणीही अलबत्या गलबत्या उठतो अन हिंदूंवर टपली मारुन जातो . या असल्या पाखंडीचे असेच वस्त्रहरण केलेच पाहिजे.

असं लिहून सचिन चिंगरे यांनी त्यांची पोस्ट संपवली आहे.

मुंबई तकने याबाबत आम्ही संपर्क साधला असता हमीद दाभोळकर यांनी आम्हाला सांगितलं की ही नरेंद्र दाभोळकरांची कविताच नाही.

काय आहे डॉ. हमीद दाभोळकर यांची प्रतिक्रिया ?

‘मागील चार वर्षांपासून ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. मात्र ही नरेंद्र दाभोळकर यांची कविताच नाही. कुणीतरी हा खोडसाळपणा केला आहे. आम्ही अनेकदा सांगितलं आहे की नरेंद्र दाभोळकर यांची ही कविता नाही. ही त्यांची भूमिकाही नाही. ही कविता खोडसाळपणे कुणीतरी लिहिली आहे. कुणीतरी कॉलेजच्या मॅगझीनमध्ये ही कविता लिहिली होती जी नरेंद्र दाभोळकर यांची आहे असं सांगितलं जातं आहे. मात्र ही कविता त्यांची नाहीच. नरेंद्र दाभोळकर यांनी देव-धर्माला कधीच विरोध केला नाही. देव आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या शोषणाला नरेंद्र दाभोळकर यांनी विरोध केला आहे. तरीही त्यांच्या नावाने जी कविता त्यांची आहे असं सांगून व्हायरल केली जाते आहे त्यामागे निव्वळ खोडसाळपणा आहे. त्याला दिलेलं उत्तर हा देखील या खोडसाळपणाचाच भाग आहे’

डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना त्यांना न केलेल्या कवितेतून हिंदू विरोधी ठरवलं जातं आहे. त्यांची आणि त्यांच्या कार्याची अकारण बदनामी केली जाते आहे. डॉ. दाभोळकर यांच्या तिमिरातून तेजाकडे या पुस्तकातल्या काही प्रकरणांचा आढावा.

साहिबजादीची करणी

साहिबजादीची करणी या प्रकरणात डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी साताऱ्यातल्या एका कॉलनीत राहणाऱ्या साहिबजादी नावाच्या महिलेविषयी लिहिलं आहे. या अशिक्षित मुस्लिम असलेल्या पण मुक्या असलेल्या महिलेने आपल्याला घरावर झालेली करणी काढता येते असा दावा केला होता. काही हावभाव ही महिला करत असे. तिच्याकडे गेलेल्या लोकांना ती घरातील पाणी, माती आणि लिंबे घेऊन येण्यास सांगे. नंतर संबंधित पीडित व्यक्तीवर किंवा तिच्या घरात करणी झाली आहे की नाही हे कळण्यासाठी ही महिला काही लिंबे उतरवून पाण्याच्या भांड्यात टाकत असे. ती लिंबे पाण्यात हात घालून संबंधित व्यक्तीला ती पिळण्यास सांगत असे. लिंबं पिळत असताना संबंधित व्यक्तीच्या हाताला खिळे, टाचण्या, ताईत लागत. घरातली करणी काढली असा त्याचा अर्थ घेतला जाई. नरेंद्र दाभोळकर म्हणतात आम्हाला हे समज्यावर आम्ही आणि अंनिसचे कार्यकर्ते आणि पोलीस त्या महिलेच्या घरी गेले. एका मुलीबाबत त्या महिलेला सांगण्यात आलं. त्या मुलीच्या डोक्यात चार-पाच वर्षे टाचण्या टोचल्या जात आहेत असे तिला वाटते आहे. या मुलीला साहेबजादीच्या समोर बसवण्यात आलं. लिंबे, पाणी, माती, भांडे यांची प्रकिया सुरू होणार एवढ्यात मी म्हणालो की साहिबजादीची तपासणी घ्यायला हवी. दोन महिलांनी तिची तपासणी घेतली. ती बाहेर आली. डोक्यातील करणी काढण्याची सुरूवात ती महिला करणार तेवढ्यात आम्ही तिच्या समोरची लिंबं बदलली. सुरूवातीला बारा लिंबं कापून त्या महिलेने मुलीच्या डोक्यावर चोळली. पण काही उपयोग झाला नाही. मग आणखी लिंबं आणून दिली. शेवटी 38 लिंबं कापून त्या मुलीच्या डोक्यावर चोळण्यात आल्याने तिला त्याचा त्रास होऊ लागला. साहिबजादीने मग कुराण मागवलं. त्यावर काहीतरी लिहिल्यासारखं केलं… काहीतरी करून आजचा कार्यक्रम साहेबजादीने उद्यावर ढकलला. त्यानंतर साहेबजादीची पिशवी आम्ही तपासली त्यामध्ये आधी जप्त करण्यात आलेली लिंबं ठेवली होती. त्यात चार लिंबांमध्ये सुया, खिळे, ताईत होते. साहिबजादी करणी काढते असं सांगून तिच्या साडीमध्ये आधीच हे सगळं साहित्य लपवलेली लिंबं लपवत असे आणि पीडित माणूस जी लिंबं घेऊन येत असे त्यामध्ये शिताफीने मिसळत असे. तिची हातचलाखी एवढी होती की सुरूवातीला अंनिसच्या कार्यकर्त्यांनाही ती कळली नाही. नंतर या सगळ्या प्रकरणी साहिबजादीला अटक करण्यात आली.

कमरअली दरवेशचा पुकार

पुण्यापासून तीस किमी अंतरावर खेड-शिवापूर हे गाव आहे. त्याच्यावळ कमरअलीबाबांचा दर्गा आहे. सर्वधर्मीयांचा प्रवेश असलेला हा दर्गा या दर्ग्याच्या समोर दोन दगड आहेत. त्यातला एक 90 किलो आणि दुसरा 60 किलो वजनाचा. पहिल्या दगडाला अकरा आणि दुसऱ्या दगडाला नऊ लोकांना फक्त बोटांचा टेकू लावायचा आणि कमर अली दरवेश की जय असा जयघोष करायचा. असं झालं की दगड पिसासारखा हलका होतो. बोटं लावणाऱ्यांच्या डोक्यापर्यंत हे दगड उचलले जातात. पहिल्या दगडासाठी 11 आणि दुसऱ्या दगडासाठी 9 माणसं हवीत. स्त्रियांनी या दगडाला बोट लावले तरीही मामला बिघडतो. कमरअली दरवेश यांच्याबद्दल कथा अशी होती की ते साक्षात्करी फकीर होते. ते या जागी कधी आणि कसे आले ते माहित नाही. मात्र या जागेतली भूतं, पिशाच्चं यांना त्यांनी पिटाळून लावलं होतं. वयाच्या सत्तराव्या वर्षी त्यांनी समाधी घेतली होती. जे दोन दगड होते ते फकिराच्या शापाने म्हणजे दरवेश यांच्या शापाने दगड झाले होते. ही सगळी माहिती कळल्यावर मी, प्रा. आर्डे, श्री मंडपे, शिंदे, पांगे, दयाळ, बाबर असे सातजण निघालो. भिकारी, हारवाले, यात्रेकरू यांच्यातून वाट काढत दर्ग्यापर्यंत पोहचलो. दर्ग्याच्या फाटकासमोर दोन दगड ठेवले आहेत. एक दगग कुरुंदाचा आहे. दुसरा दगड काळा आहे. दोन्ही दगड घडवलेले आहेत. आकार मोठ्या प्रेशर कुकरसारखा आहे. आम्ही चारजण आणि दर्ग्यासमोर असलेले सातजण अशा अकरा जणांना बोटाची तर्जनी लावून पहिला दगड उचलला तो जेमतेम अर्धा फूट उचलला गेला. त्यानंतर त्या सात जणांना लक्षात आलं की आम्ही चपला घातल्या आहेत. आम्हाला चपला काढण्यास सांगण्यात आलं. आम्ही चपला-बूट काढून ठेवले. पुन्हा एकदा तर्जनी लावून कमर अली दरवेश यांच्या नावाचा पुकारा केला. मात्र दगड अर्ध्या फुटाच्या वर उचलला जाईना. आज नेमकं काय झालं? हा प्रश्न सगळ्यानांच पडला. मग आम्ही पुढे सरसावलो. दर्ग्यावर आलेल्या आमच्यासारख्याच चार पाहुणे मंडळींना बोलावले, बोट लावण्यास सांगितले आणि पुकारा केला. बघता बघता दगड चांगला खांद्यापर्यंत वर गेला. मग तो शेजारच्या वाळूत टाकला. आता आम्ही आव्हान दिलं की कमर अली दरवेश असा जयघोष न करता आम्ही हा दगड उचलतो. मग आम्ही सगळ्यांनी महात्मा फुले की जय असं म्हणत दगड उचलला तो डोक्यापेक्षा वर गेला. अकराच लोक का? मग आम्ही आधी दहा आणि मग बारा लोकांना बोटं लावायला सांगितली तेव्हाही दगड उचलला गेला. शेजारच्या दगडावरही आठ आणि दहा जणांना बोटं लावायला सांगितली आणि तो दगड वर नेला. एवढंच काय काही महिलांनाही आम्ही यात सहभागी करून घेतलं. त्यांच्याकडूनही दगड उचलला गेला. दगडाखाली बोट लावून बळ लावले आणि सर्व दिशांनी बळ कार्य करत असल्याने दगड मागे पुढे होत नाही. त्यावर चांगली पकड बसे एकाच सूरात ओरडल्याने एकाच वेळी बळ लावा ही सूचनाही सगळ्यांना आपोआप मिळते. मोठ मोठ्या वस्तू, ओंडके उचलताना जोर लगा के हय्या म्हणतात तसाच हा प्रकार आहे हे आम्ही दाखवून दिलं.

(दोन्ही उतारे तिमिरातून तेजाकडे या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या पुस्तकातून साभार)

नरेंद्र दाभोळकर यांनी त्यांच्या कार्यातून अंधश्रद्धेला विरोध केला आहे. कधीही त्यांनी डोळस श्रद्धा नाकारली नाही. देवालाही त्यांनी कधीच नाकारलं नाही. आपलं कार्य करत असताना त्यांनी धर्म पाहिला नाही. ज्या धर्मांमध्ये देवाच्या आणि धर्माच्या नावाखाली शोषण चालतं त्या शोषणाला विरोध केला. वरील दोन उदाहरणंही हेच सांगतात. त्यामुळे उगाचच डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना हिंदू विरोधी ठरवणाऱ्यांनी आधी त्यांच्या साहित्याचा अभ्यास केला पाहिजे हे नक्की.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT