Nitin Gadkari letter To Uddhav Thackeray : शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना आवरा! गडकरींनी दिला इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्राने राज्याच्या राजकारणात शनिवारी खळबळ उडाली. नितीन गडकरी यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं असून, शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींकडून (खासदार, आमदार व अन्य) रस्त्यांच्या कामात अडथळा आणला जात असून, कामं करणाऱ्या कंत्राटदारांना त्रास दिला जात असल्याचा गंभीर आरोप केला आहे. यामुळे प्रकल्पांचा खर्च वाढेल, अशी चिंताही गडकरींनी व्यक्त केली आहे.

ADVERTISEMENT

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांचं २५ जुलै रोजी उद्धव ठाकरे यांना (Nitin Gadkari letter to Uddhav thackeray) पाठवलेलं पत्र समोर आलं आहे. या पत्रातून नितीन गडकरी यांनी शिवसेनेच्या काही खासदार, आमदार आणि इतर लोकप्रतिनिधींबद्दल तक्रार केली आहे. राज्यात सुरू असलेल्या काही महामार्गाच्या कामात शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आडकाठी टाकत असल्याचा गंभीर आरोप गडकरींनी केला आहे.

नितीन गडकरी त्या पत्रात काय म्हणाले?

हे वाचलं का?

केंद्राच्या रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयातर्फे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर राष्ट्रीय महामार्गावरील प्रकल्प मंजूर करण्यात आलेले आहेत. त्यापैकी बरेच प्रकल्प पूर्णत्वास आलेले असून, काही प्रगतीपथावर आहेत. मात्र, अनेक प्रकल्पांच्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी अडचणी आणत असल्याचं माझ्या निर्दशनास आलेलं आहे. विविध प्रकारच्या नियमबाह्य मागण्यांनी अधिकारी व कंत्राटदारांना भंडावून सोडणे व त्यांनी न ऐकल्यास कार्यकर्त्यांना चिथावणी देऊन काम बंद पाडण्यापर्यंत या लोकप्रतिनिधींची मजल गेली आहे. विशेषतः वाशिम जिल्ह्यात हे प्रामुख्याने घडत आहे’, असं गडकरींनी पत्राच्या सुरुवातीला म्हटलं आहे.

१. अकोला आणि नांदेड या २०२ किमी राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये चौपदरीकरणाची कामं चार पॅकेजेसमध्ये सुरु आहेत. गेडशी ते वाशिम या पॅकेज-२ मध्ये वाशिम शहरासाठी बायपास (लांबी १२ किमी) निर्माण करण्याचं कामसुद्धा समाविष्ट आहे. परंतु, प्रस्तुत बायपास व मुख्य रस्त्याचं काम तेथील शिवसेना लोकप्रतिनिधींनी थांबवलं असल्याचं मला सांगण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

२. या मतदारसंघात सुरु असलेल्या मालेगाव ते रिसोड या राष्ट्रीय महामार्गाचं काम एक पूल वगळता पूर्णत्वास आलेलं आहे. या लांबीमध्ये पैनगंगा नदीवर उंच पुलाचं काम अर्धवट स्वरुपात आहे. ते पूर्ण करण्यासाठी कंत्राटदाराला मज्जाव केला जात आहे. काम सुरु केल्यास कार्यकर्ते येऊन धमक्या देतात. त्यामुळे कंत्राटदारानं आहे, त्या स्थितीत काम अंतिम करण्याबाबत विनंती केली आहे.

ADVERTISEMENT

३. पुलगाव-कारंजा-मालेगाव-मेहकर-सिंदखेडराजा हा राष्ट्रीय महामार्ग अतिशय खराब अवस्थेत आहे. त्याच्या दुरुस्तीचं काम (अंदाजे किंमत १३५ कोटी) आमच्या मंत्रालयानं हाती घेतलं, परंतु वाशिम लोकसभा मतदारसंघातील लांबी वगळता इतर ठिकाणचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. वाशिम जिल्ह्यातील काम, विशेषतः सेलू बाजार गावातून जाणाऱ्या रस्त्याचं काम शिवसेना कार्यकर्त्यांनी थांबवले होतं, अशी माहिती मला देण्यात आली. परिसरातील लोकांच्या मागणीनुसार आणि रस्ता धोकादायक स्थितीत असल्यामुळं कंत्राटदारानं पुन्हा काम सुरु केलं असता शिवसेना कार्यकर्त्यांनी मशिनरीची जाळपोळ करुन कंत्राटदार, अधिकारी-कर्मचारी-कामगार यांच्यात दहशत निर्माण केली. त्यामुळे ते काम पुन्हा बंद झालं आहे.

४. उपरोक्त बाबी लक्षात घेता वाशिम जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं यापुढेही सुरु ठेवावीत की कसं? याबद्दल आमचं मंत्रालय आता गांभीर्याने विचार करत आहे. ही कामं आहे त्या स्थितीत अंतिम केल्यास ती वाहतुकीसाठी धोकादायक ठरतील. अपघाताचं प्रमाण वाढेल आणि त्यामुळे जनतेच्या असंतोषाला तोंड द्यावं लागेल.

५. हे असंच चालत राहिलं तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्गावरील कामं मंजूर करण्याच्या संदर्भात आमच्या मंत्रालयाला विचार करावा लागेल. यामुळे महाराष्ट्राचं आणि जनतेचं नुकसान होईल. ही कामे डिस्कोप केली तरी आपण लोकांच्या दृष्टीनं अपराधी ठरु. तसं झालं तर महाराष्ट्रातील नागरिक व लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या मनात कायमची खंत राहील. ही कामं पुढे न्यायची असतील तर आपला हस्तक्षेप मला आवश्यक वाटतो. आपण यातून कृपया मार्ग काढावा, अशी माझी विनंती आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील विविध रस्त्यांच्या कामांची यादी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिली असून, महाराष्ट्रातील रस्त्यांची कामं थांबवण्याचाही इशारा दिला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT