पत्रा चाळ जमीन घोटाळा : संजय राऊत यांना अटक! ईडीची कारवाई, शिवसेनेला मोठा धक्का
शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, नेते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झालीये. काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केलीये. दोन वेळा समन्स बजावल्यानंतरही अनुपस्थित राहिल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना त्यांच्या भांडुप येथील घरातून ताब्यात घेतलं होतं. मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा […]
ADVERTISEMENT

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते, नेते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झालीये. काही वर्षांपूर्वी समोर आलेल्या पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणात ईडीने ही कारवाई केलीये. दोन वेळा समन्स बजावल्यानंतरही अनुपस्थित राहिल्यानंतर ईडीने संजय राऊत यांना त्यांच्या भांडुप येथील घरातून ताब्यात घेतलं होतं.
मुंबईतील गोरेगाव परिसरात असलेल्या पत्रा चाळ जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेनं गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यावरून ईडीने या प्रकरणाचा मनी लाँडरिंगच्या अनुषंगाने तपास सुरू केला होता. याच प्रकरणात संजय राऊत यांचं नाव समोर आल्यानंतर ईडीने त्याची चौकशी सुरू केली होती.
संजय राऊत यांच्या भांडुप येथील घरी काय घडलं?
२० जुलै आणि २७ जुलैला समन्स बजावल्यानंतर संजय राऊत हे उपस्थित राहिले नाही. संसदेचं अधिवेशन सुरू असल्यानं उपस्थित राहू शकत नाही, असं संजय राऊतांनी ईडी कार्यालयाला कळवलं होतं. दरम्यान, ३१ जुलै रोजी ईडीच्या अधिकाऱ्यांचं एक पथक संजय राऊत यांच्या भांडुप येथील निवासस्थानी दाखल झालं. सकाळी पथक दाखल झाल्यानंतर राऊत यांना अटक होणार, अशी चर्चा सुरू झाली होती.
दुपारी चार वाजेपर्यंत ईडीचे अधिकारी संजय राऊत यांच्या घरीच होते. संसदेचं अधिवेशन सुरू असताना ईडी कार्यालयात घेऊन जाऊ शकत नाही, असं संजय राऊतांकडून ईडी अधिकाऱ्यांना सांगितलं जात होतं. संजय राऊतांच्या वकिलांनीही याचं कारणावरून ईडीच्या अधिकाऱ्यांना विरोध दर्शवला. नऊ ते दहा तास चाललेल्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतलं. त्यानंतर त्यांना भांडुप येथील निवासस्थानावरून ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. त्यानंतर रात्री उशिरा ही कारवाई करण्यात आली.