Shiv Sena Symbol : सर्वोच्च न्यायालयानं ‘ती’ संधी घालवली; प्रकाश आंबेडकरांनी मांडला महत्त्वाचा मुद्दा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

खरी शिवसेना कुणाची? धनुष्यबाण हे शिवसेनेचं निवडणूक चिन्ह कुणाला मिळणार यासंदर्भातील कार्यवाही पुढे नेण्यास सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला हिरवा कंदील दाखवला. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष निवडणूक आयोगात काय होणार याकडे लागलं आहे. आता याच प्रकरणावर ज्येष्ठ वकील आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाचं पुनर्विलोकन करावं, अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांनी केलीये.

ADVERTISEMENT

एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी राजकीय लढाई सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. दोन्ही बाजूंनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झालेल्या आहेत. यातच शिवसेनेच्या निवडणूक चिन्हावरील निवडणूक आयोगातल्या सुनावणीच्या मुद्द्याचाही समावेश होता. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयाने निकाली काढलं. या निर्णयानंतर प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य केलं असून, काही मुद्दे उपस्थित केले आहेत.

शिवसेना निवडणूक चिन्ह वाद : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?

प्रकाश आंबेडकर यांनी एका व्हिडीओतून यावर भूमिका मांडलीये. “शिवसेनेच्या संदर्भात काल सर्वोच्च न्यायालयानं निर्णय दिला. सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला जाईल का याबाबत मला शंका आहे.”

हे वाचलं का?

“संविधानानं आणि संसदेनं निवडणूक आयोगाची तटस्थता जपली होती. निवडणूक आयोग जुळवून घेईल किंवा त्याच्यावर शिंतोडे उडवले जाणार नाही, याची दक्षता घेतली होती. परंतु निवडणूक आयोगानं स्वतःच्याच अधिकाराखाली Symbol Order 1968 काढली. त्यामध्ये Section 15  प्रमाणे एखाद्या पक्षामध्ये निवडणूक चिन्हावरून जर वाद निर्माण झाला, तर आम्हाला हस्तक्षेप करता येतो, अशी तरतूद केली. हे Symbol Order मधील section 15 हे संविधानिक आहे की नाही याची तपासणी करण्याची संधी सर्वोच्च न्यायालयाला यानिमित्ताने आली होती. परंतु दुर्दैवानं ती तपासणी झाली नाही आणि निवडणूक आयोगाला शिवसेनेच्या प्रकरणात निर्णय घ्या, असं सांगण्यात आलं”, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

“संविधानानं आणि संसदेनं निवडणूक आयोगाची जी तटस्थता जपली होती, दुर्दैवाने या निर्णयामुळे ती धोक्यात आली आहे. यापुढे पक्षातील विवादावर निवडणूक आयोग निर्णय घेणार, हा जो संदेश या निर्णयातून गेला आहे तो चुकीचा आहे असे मी मानतो. निवडणूक आयोगाला आपण फ्रँकेन्स्टाईन (Frankenstein – स्वतः निर्माण केलेली गोष्ट जी त्याच्याच नाशाला कारणीभूत ठरते असा मनुष्य) करायला निघालो आहोत का अशी दाट शक्यता निर्माण होते. यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयाचे पुनर्विलोकन करावे”, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने केली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT