Russia-Ukraine crisis : ‘युद्ध थांबवा आणि सैन्य माघारी बोलवा’; युक्रेनची रशियाकडे मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

गेल्या आठवड्यात अचानक सुरू झालेला रशिया-युक्रेन यांच्यातील संघर्ष पाचव्या दिवशीही सुरूच राहिला. मात्र, युद्धाला विराम देण्याच्या दिशेनं सोमवारी पहिलं पाऊल पडलं. युक्रेन आणि रशियाच्या शिष्टमंडळाने सोमवारी बेलारुसच्या सीमाभागात भेटून चर्चा केली. या चर्चेत युक्रेननं रशियासमोर काही मागण्या ठेवल्या असून, त्यात तत्काळ युद्ध थांबवावं अशी प्रमुख मागणी केली आहे.

रशियाच्या संसदेनं देशाबाहेर लष्कर वापरण्याची परवानगी दिल्यानंतर रशियाने 24 फेब्रुवारी रोजी युक्रेनवर आक्रमण केलं. विशेष लष्करी अभियानाखाली करण्यात आलेल्या या कारवाईवेळी रशियन लष्कराने युक्रेनमधील नागरी वसाहतींवरही हल्ले केले. रशियाकडून डागण्यात आलेल्या मिसाईल नागरी वस्तीतील इमारतींवर येऊन कोसळल्या असून, या युद्ध संघर्षात मोठी जीवित आणि वित्त हानी झाली आहे.

युक्रेनची राजधानी कीव्हवर ताबा मिळवण्यासाठी हल्ले करणाऱ्या रशियन लष्कराला युक्रेन लष्कराकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं गेल्याचं दिसून आलं. गुरुवारपासून (24 फेब्रुवारी) सुरू असलेला हा संघर्ष कधी थांबणार? अशी चर्चा सुरू असतानाच आज रशिया आणि युक्रेनमधील संवादाची कोंडी फुटली.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सुरुवातीला युक्रेननं बेलारुसमध्ये चर्चेस नकार दिला होता. मात्र, अखेर आज दोन्ही देशांच्या शिष्टमंडळांची बैठक बेलारुसमध्येच, पण युक्रेनच्या सीमेनजिकच्या भागात पार पडली. तब्बल साडेतीन तास दोन्ही देशांच्या प्रतिनिधींची बैठक चालली. या बैठकीत युद्ध उद्भवल्याने 5 लाखांपेक्षा अधिक नागरिकांनी देश सोडला असून, तत्काळ युद्ध थांबवण्याची मागणी युक्रेननं रशियाकडे केली आहे. त्याचबरोबर क्रीमिया आणि डोनबाससह संपूर्ण युक्रेनमधील सैन्य माघारी बोलावं, अशी मागणीही युक्रेनने रशियाकडे केली आहे. ही मागणी रशियाकडून नाकारली जाण्याचीच शक्यता व्यक्त केली जात आहे.

36 देशांसाठी रशियाची हवाई बंद

ADVERTISEMENT

ब्रिटन, अमेरिका, युरोपीय संघासह अनेक देशांनी युक्रेन केलेल्या आक्रमणानंतर रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. विमानांना प्रवेश बंद करण्याबरोबर हवाई हद्दीही बंद करण्यात आल्या आहेत. याला रशियाकडूनही प्रत्युत्तर देण्यात आलं असून, रशियाने ब्रिटन, जर्मनीसह जगातील 36 देशांच्या एअरलाईन्ससह हवाई वाहतुकीवरही बंदी घातली आहे.

ADVERTISEMENT

दरम्यान, तिकडे स्वित्झर्लंडने युरोपीय संघाप्रमाणेच रशियावर निर्बंध लादले आहेत. जगातील अनेक देशांनी रशियाची आर्थिक कोंडी केली असून, याचा परिणाम सोमवारी रशियाच्या बाजारात झाल्याचं दिसून आलं. रशियाचं चलन असलेल्या रुबलच्या दरात लक्षणीय घट झाली आहे.

मृतांचा आकडा मोठा

रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर झालेल्या लष्करी संघर्षात प्रचंड जीवित हानी झाली आहे. युक्रेनमध्ये 14 मुलांसह 352 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर युक्रेनच्या लष्कराने रशियाचे 4 हजार 300 सैनिक मारले असल्याचा दावा युक्रेनच्या प्रशासनाकडून करण्यात आला आहे. रशियाने युक्रेनविरुद्धच्या संघर्षात आपले सैनिक मारले गेल्याचं आणि जखमी झाल्याचं म्हटलं आहे, मात्र त्यांचा आकडा जाहीर केलेला नाही. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार प्रमुख मिशेल बॅचलेट यांनी सोमवारी झालेल्या संघर्षात युक्रेनमध्ये सात मुलांसह कमीत कमी 102 नागरिकांचा मृत्यू झाला असल्याचं म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT