डोंबिवली हादरली.. बारजवळ फक्त धक्का लागला म्हणून 6 जणांनी मिळून आकाशचा केला Murder, जागीच संपवलं
धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून डोंबिवलीत एका तरुणाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. ज्या प्रकरणात पोलिसांनी अवघ्या 24 तासांच्या आत सगळ्या आरोपींना अटक केली.
ADVERTISEMENT

डोंबिवली: डोंबिवली एमआयडीसी परिसरातील मालवण किनारा बार अँड रेस्टॉरंटजवळ झालेल्या धक्कादायक खुनाचा मानपाडा पोलिसांनी अवघ्या 24 तासांत छडा लावत 6 आरोपींना अटक केली आहे. अमर राजेश महाजन (वय 36), अक्षयकुमार शंकर वागळे (वय 26), अतुल बाळू कांबळे (वय 24), निलेश मधुकर ठोसर (वय 42), प्रतिकसिंग प्रेमसिंग चौहान (वय 26) आणि लोकेश नितीन चौधरी (वय 24) असे आहेत.
बारच्या दारात घडलं तरी काय?
ही घटना रविवारी, 9 नोव्हेंबर रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली. एमआयडीसी फेज 2 मधील मालवण किनारा बारच्या प्रवेशद्वारावर धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून 38 वर्षीय आकाश भानू सिंग याचा चाकूने वार करून खून करण्यात आला.
नवी मुंबईतील कॉल सेंटरमध्ये कार्यरत असलेल्या आकाशचा धाकटा भाऊ बादल सिंग यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार मानपाडा पोलिसांनी तत्काळ खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
आकाश सिंग आपल्या मित्रांसह जेवणासाठी मालवण किनारा बारमध्ये गेला होता. प्रवेश करताना त्याचा अक्षय वागळेला धक्का लागला. चुकून धक्का लागल्याचे समजावून सांगूनही अक्षय संतापला आणि त्याने आकाशला मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यानंतर अक्षयने आपल्या मित्रांना फोन करून बोलावले. सहाही जणांनी मिळून आकाशला बारमधून ओढत बाहेर आणले आणि रस्त्यावर बेदम मारहाण करून चाकूने सपासप वार केले.










