बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणी पोलीस पोहोचले चार जिल्ह्यांत, तपासात आतापर्यंत काय सापडलं?
मुंबईतल्या वांद्रे न्यायालय परिसरात बोगस प्रतिज्ञापत्र आढळून आली. चार हजारांहून अधिक असलेली ही प्रतिज्ञापत्रं ठाकरे गटाकडून केली जात असल्याचा आरोप शिंदे गटाने केला. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून, चार पथकं चार जिल्ह्यांत पोहोचली आहेत. शिंदे गट आणि ठाकरे गटाने शिवसेनेवर दावा केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्रं मागवली होती. दोन्ही […]
ADVERTISEMENT

मुंबईतल्या वांद्रे न्यायालय परिसरात बोगस प्रतिज्ञापत्र आढळून आली. चार हजारांहून अधिक असलेली ही प्रतिज्ञापत्रं ठाकरे गटाकडून केली जात असल्याचा आरोप शिंदे गटाने केला. या प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपास सुरू केला असून, चार पथकं चार जिल्ह्यांत पोहोचली आहेत.
शिंदे गट आणि ठाकरे गटाने शिवसेनेवर दावा केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने कागदपत्रं मागवली होती. दोन्ही गटांकडून पाठिंबा असलेल्या पदाधिकाऱ्यांची प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आली. दरम्यान, ८ ऑक्टोबर रोजी वांद्रे न्यायालय परिसरात एका ठिकाणी मोठ्या प्रमाणात नोटरीचं काम चालू होतं. याची माहिती तक्रारदाराने पोलिसांना दिली.
मुंबई पोलिसांच्या निर्मल नगर पोलिसांनी सर्व प्रतिज्ञापत्र जप्त केली. ४ हजार ६२२ प्रतिज्ञापत्र जप्त करण्यात आल्यानंतर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा ८ कडे देण्यात आला. पोलिसांकडून तपास सुरू असून, पोलिसांची पथकं तपासासाठी नाशिक, पालघर, कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात पोहोचली आहेत.
बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणात पोलिसांनी काय सांगितलं?
बोगस प्रतिज्ञापत्र प्रकरणाच्या तपासासंदर्भात गुन्हे शाखा ८ चे पोलीस निरीक्षक सूर्यमोहन बोलमवाड यांनी माहिती दिली. बोलमवाड म्हणाले, “बॉन्ड पेपरवर नोटरी करणाऱ्याची चौकशी करण्यात आली. त्याने व्यवस्थित उत्तर दिलं नाही. सध्या हे प्रतिज्ञापत्र बोगस आहेत की खरे आहेत, याची पडताळणी गुन्हे शाखेची चार पथकं करत आहे. महाराष्ट्रातल्या कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर आणि पालघर जिल्ह्यात पथकं गेली आहेत. ज्या व्यक्तींच्या नावे शपथपत्र आहे, त्या व्यक्तींकडून उलटतपासणी केली जात जाईल आणि पुढे तपास केला जाईल”, अशी माहिती बोलमवाड यांनी दिली.