ठाकरेंच्या मेहुण्याची संपत्ती जप्त; ‘मुख्यमंत्र्यांनी वेळ वाया न घालवता पदाचा राजीनामा द्यावा’

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे मेहुणे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर यांची तब्बल 6.45 कोटी रुपयांच्या सपत्तीवर आज ईडीने टाच आणली. ईडीने निवेदन प्रसिद्ध करत ही माहिती दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रियांचा भडीमार सुरू झाला. महाविकास आघाडीतील नेत्यांसह भाजपच्या नेत्यांनीही या प्रकरणावर भूमिका मांडली. काय म्हणाले विविध राजकीय पक्षाचे नेते बघुयात…

ADVERTISEMENT

“त्रास देण्यासाठीच हा कार्यक्रम हाती घेतलाय”

“या सगळ्या साधनांचा गैरवापर हा या देशासमोरील महत्वाचा प्रश्न आहे. तुम्ही दिलेली आकडेवारी खरी असेल, तर ती स्वच्छ सांगते. याच्यामध्ये फक्त राजकीय किंवा अन्य हेतूने कुणाला तरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हातामध्ये घेतलेला आहे. स्पष्ट सांगायचं म्हणजे ५-१० वर्षांपूर्वी ईडी नावाची संस्था कुणाला माहिती नव्हती. आता ही ईडी गावागावात गेली. दुर्दैवाने या सगळ्या गोष्टींचा गैरवापर सध्या चालू आहे. बघुयात आता याला काही पर्याय आहे का, पण त्यावर आता चर्चा न केलेली बरी”, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या कारवाईवर मांडली.

हे वाचलं का?

श्रीधर पाटणकरांवर ईडीची कारवाई; राऊत म्हणाले, ‘आम्ही सर्व तुरुंगात जायला तयार’

“पंतप्रधानांच्या भूमिकेला जनतेचं समर्थन” :- “चौकशी यंत्रणा आपलं काम करत असते, त्यांना त्यांचं काम करू दिलं पाहिजे. पंतप्रधानांनी ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी भूमिका देशासमोर मांडली आहे. त्याला जनसमर्थन आहे. त्यामुळे कर नाही, त्याला डर कशाला. आता ज्या कारवाया होत असतील, त्या कारवाईमधून सत्य बाहेर येईल,” भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.

सगळ्यात मोठी ब्रेकींग न्यूज: रश्मी ठाकरेंच्या भावाची संपत्ती ED कडून जप्त

ADVERTISEMENT

“…तर उद्धव ठाकरेंची झोप उडेल”

ADVERTISEMENT

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. दोन डझनहून अधिक कंपन्यांमध्ये कंत्राटदारांचा पैसा आला. श्रीधर पाटणकरांच्या खात्यातून जे पैसे दिले गेले, त्याची चौकशी झाली, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची झोप उडेल. उद्धव ठाकरेंचं सरकार हे माफिया सरकार आहे. त्यांच्या घोटाळ्यांवर कारवाई होईल. सगळा हिशोब आम्ही जनतेसमोर ठेवू”, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर सोमय्यांनी एक ट्विट केलं आहे, ज्यात घोटाळेबाजांना सोडणार नाही, असंही म्हटलं आहे.

“सूड भावनेनं कारवाई होतेय, मुद्दामहून होतेय, असं म्हणण्याचं अजिबात कारण नाही. यामध्ये तक्रारी झालेल्या आहेत. लोकांनी कागदपत्रं दिलेली आहेत. त्यानुषंगाने ईडी चौकशी करतेय. आता चौकशीतून जे समोर येईल. त्यावर कारवाई होईल. मला वाटतं केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर होतोय. केंद्र सरकार सूड भावनेनं वागतंय असं समजण्याचं अजिबात कारण नाही”, असं भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले.

“केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करण्याचं काम केंद्रातील भाजपचं सरकार ठरवून करत आहे. विरोधकांवर केंद्रीय तपास यंत्रणेचे हल्ले करून घाबरण्याचे प्रयत्न करत आहे. याचा कुठेही परिणाम होऊ शकत नाही. याचा महाविकास आघाडीवर काहीही परिणाम होणार नाही. त्यांनी सगळे प्रयोग केले आहेत. हताश झालेली, देश विकणारी भाजप केंद्रात बसली आहे. त्यांच्या या पोकळ धमकीला महाविकास आघाडी घाबरत नाही,” असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

“या धाडी टाकल्या जात आहेत. केंद्रीय यंत्रणांचा हस्तक्षेप राज्यात वाढत आहे. केंद्रातील भाजप सरकारची मानसिकता दुर्बल होताना दिसत आहे. अस्थिर होत आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडी राहिली, तर ही आघाडी आपल्याला महागात पडेल, अशी धास्ती त्यांनी घेतली आहे. पुढे चालून त्यांना राजकारणात मोठं नुकसान भोगावं लागणार, कदाचित त्यामुळे त्यांनी हे सत्र चालवलं आहे. आमचं सरकार कुणीही पाडू शकणार नाही, इतकंच मी सांगेन,” असं ऊर्जा मंत्री तथा काँग्रेसचे नेते नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नातेवाईकावर कारवाई केल्याचं आणि त्यांची संपत्ती जप्त केल्याचं समोर आलं आहे. आतातरी उद्धव ठाकरेंनी वेळ वाया न घालवता मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा. हे संपूर्ण सरकारचं अशा कारनाम्यांमध्ये गुंतलेलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला पाहिजे”, असं भाजपचे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT