ठाकरे सरकारचा अहंकार दुर्योधनाच्या अहंकारासारखाच-देवेंद्र फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ठाकरे सरकारचा अहंकार महाभारतातील दुर्योधनाच्या अहंकारासारखाच आहे असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं आहे. सत्ता जेव्हा डोक्यात जाते तेव्हा विरोधी पक्षाची आवश्यकता राहात नाही. आमच्या काळात मी स्वतः मुख्यमंत्री स्वतःहून चर्चा करायला जात होतो. आता या सरकारचं धोरण विरोधी पक्ष नाही हे बरंच आहे असं आहे त्यामुळे या सरकारचा लोकशाहीवर विश्वास नाही. पण एक तुम्हाला नक्की सांगतो की असे लोक टिकत नाहीत. पांडवांनी फक्त पाच गावांची मागणी केली होती. मात्र त्यावेळी दुर्योधन काय म्हणाला होता की सुईच्या टोकावर मावेल इतकी भूमिही आम्ही देणार नाही असं म्हटला होता. दुर्योधनाच्या अहंकारासारखाच या महाविकास आघाडी सरकारचा अहंकार आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

या वक्तव्यानंतर जेव्हा फडणवीस यांना दुर्योधन कोण असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा काही गोष्टी तुमच्यावर सोडतो आहे, तुम्ही ठरवा दुर्योधन कोण, दुःशासन कोण, भीष्म पितामह कोण आहेत आणि कर्ण कोण ? असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी टोलेबाजी केली. एवढंच नाही तर केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदेच राज्य सरकारने मान्य केले आहेत. त्यात काही बदल सुचवले आहेत मात्र ते फार मोठे किंवा अगदी पूर्णपणे वेगळे असे बदल नाहीत. तिन्ही कायद्यांना जो विरोधच केला जात होता तसं न करता शेवटी मोदी सरकारचे तिन्ही कायदे या सरकारने स्वीकारले आहेत याचा मला आनंद आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

ठाकरे सरकारने अहंकाराच्या भावनेतून आमच्या बारा आमदारांवर कारवाई केली. त्यांना विरोधकांची गरजच नव्हती. त्यामुळे आम्ही पाच तास प्रतिविधानसभा चालवली. ज्येष्ठ आमदार कालिदास कोळंबकर यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही पाच तास कामकाज केलं. या प्रतिविधानसभेतून आम्ही ठाकरे सरकारचा बुरखा फाडला आहे. सरकारच्या कारभाराचे वाभाडे काढले. शेतकरी, विद्यार्थी, मराठा तरूण, ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन सुरूच राहणार असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

हे वाचलं का?

विधानसभेचं पावसाळी अधिवेशन दोन दिवस चाललं. या अधिवेशनात पहिल्याच दिवशी भाजपची कोंडी महाविकास आघाडी सरकारने केली. कारण महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या बारा आमदारांना निलंबित केलं. तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या समोर गोंधळ घातल्या प्रकरणी आणि त्यांच्या दालनात त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत सभात्याग केला. तसंच अधिवेशनाच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशीही कामकाजावर बहिष्कार टाकला आणि प्रतिविधानसभा चालवली. अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सोमवारी झालेला प्रकार महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाज आणणारा होता असं वक्तव्य केलं आहे. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारची तुलना थेट महाभारतातल्या दुर्योधनाशी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT