‘ही बेकायदेशीर गुढी उद्ध्वस्त करून…’, ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, जनतेला हाक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Uddhav Thackeray Vs Eknath Shinde, Maharashtra Politics: मराठी नववर्षानिमित्त उद्धव ठाकरेंनी सामना अग्रलेखातून सद्यस्थितीवर भाष्य करताना पुन्हा शिंदे-फडणवीस सरकारला लक्ष्य केलं. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान, केंद्रीय यंत्रणा आणि स्वायत्त संस्था या मुद्द्यावर बोट ठेवत ठाकरेंनी खडेबोल सुनावले. त्याचबरोबर जनतेने संकल्प करण्याचं आवाहनही केले आहे.

ADVERTISEMENT

ठाकरेंनी सामना अग्रलेखात म्हटलं आहे, “हिंदू धर्मीयांचा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून इतर सर्व सणांमध्ये गुढीपाडव्याचे एक आगळेवेगळे स्थान आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नको तितक्या प्रभावामुळे 1 जानेवारीला सुरू होते तेच खरे नवीन वर्ष असा गैरसमज नवीन पिढीचा होऊ शकतो. मात्र मराठी पंचांगानुसार चैत्र मासारंभ म्हणजे गुढीपाडव्यालाच नूतन वर्षाची सुरुवात मानले जाते.”

“शिशिर ऋतूतील पानगळ संपवून गुढीपाडव्याला वसंत ऋतूचे आगमन होते. वृक्षसंपदेवरील जुनी पाने झडून त्यांना नवी पालवी फुटू लागते. पळस, गुलमोहर इत्यादी वृक्षांवर रंगीबेरंगी फुलांची उधळण दिसू लागते. आंबा बहरतो व पहाटे पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. या अर्थाने जीवसृष्टीमध्ये स्थित्यंतर घडवणारा आणि निसर्गातील मरगळ झटकून नवचैतन्य बहाल करणारा सण म्हणून गुढीपाडव्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.”

हे वाचलं का?

Old Pension Scheme : संप मागे, पण खरंच जुनी पेन्शन योजना लागू होणार का?

Uddhav Thackeray: “गुढी उभारणे शेतकऱ्यांसाठी कठीण होऊन बसले आहे”

“मात्र, यंदा निसर्गाची अवकृपा अशी झाली की, गुढीपाडव्याच्या तोंडावरच शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पाऊस आणि गारपिटीने हिसकावून घेतला. शेतकरी वर्षभर काबाडकष्ट करतो. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांनी आपले उत्पादनही मोठ्या प्रमाणात वाढवले आहे. मात्र या वाढीव उत्पादनास खर्चाच्या तुलनेत अत्यंत तुटपुंजा भाव मिळत असल्याने यशाची आणि संपन्नतेची गुढी उभारणे शेतकऱ्यांसाठी कठीण होऊन बसले आहे”, अशी चिंता ठाकरेंनी व्यक्त केली.

ADVERTISEMENT

“पेन्शनच्या मागणीसाठी गेले काही दिवस सुरू असलेला संप आता सुदैवाने संपला आहे. त्यामुळे गारपीट व अवकाळी पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांचे जे प्रचंड नुकसान झाले, त्याचे पंचनामे झटपट करणे आता सहज शक्य आहे. हे काम सत्वर झाले तर गुढीपाडव्यानंतर का होईना, नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या हाती येऊ शकेल”, अशी आशा ठाकरेंनी व्यक्त केली आहे.

election 2024: भाजपचा प्लान, केंद्राकडे प्रस्ताव! महाराष्ट्रात मध्यावधी?

ADVERTISEMENT

“खोकेशाहीच्या माध्यमातून घटनाबाह्य सरकारे”, ठाकरेंचं टीकास्त्र

“मांगल्य, चैतन्य, उत्साह आणि संकटांवर मात करून वाईट शक्तींविरुद्ध मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून गुढीपाडव्याकडे पाहिले जाते. आज देशातील लोकशाही संकटात आहे, राज्यघटना संकटात आहे. घटनात्मक संस्थांचा मनमानी पद्धतीने गैरवापर सुरू आहे. ‘खोके’शाहीच्या माध्यमातून घटनाबाह्य सरकारे स्थापन केली जात आहेत”, अशी टीका मोदी सरकारवर करत “असत्याच्या काठीवर उभारलेली सत्तेची ही बेकायदेशीर गढी उद्ध्वस्त करून सत्याची व खऱ्याखुऱ्या लोकशाहीची गुढी उभारण्याचा संकल्प आता जनतेलाच करावा लागेल!”, असं आवाहन ठाकरेंनी जनतेला केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT