केंद्रीय मंत्र्याने खोली बंद करून अधिकाऱ्यांना केली बेदम मारहाण; एकाचा हातच मोडला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

आढावा घेण्यासाठी कार्यालयात बोलवलेल्या दोन सनदी अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याने बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी केंद्रीय राज्यमंत्री विश्वेश्वर टुडू यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी खुर्चीने मारहाण केल्याने एका अधिकाऱ्याचा हात मोडला असून, दुसरा अधिकारी जखमी झाला आहे. दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अधिकाऱ्यांना मारहाण केल्याची घटना ओडिशातील बारीपदा येथे घडली. काही महिन्यांपूर्वी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारावेळी टुडू यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलं होतं. ते आदिवासी कल्याण आणि जलशक्ती मंत्रालयाचे राज्यमंत्री आहेत.

केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडू यांनी शुक्रवारी (२१ जानेवारी) एक बैठक बोलावली होती. या बैठकीला जिल्हा नियोजन आणि पर्यवेक्षण विभागाचे उप संचालक अश्विनी कुमार मलिक आणि सहाय्यक संचालक देवाशीष महापात्रा यांना बोलवण्यात आलं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मारहाण करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आढावा बैठकीदरम्यान केंद्रीय मंत्री टुडू काही मुद्द्यांवर संतापले. त्यानंतर त्यांनी मीटिंग सुरू असलेल्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि अधिकाऱ्यांवर खुर्चीने हल्ला केला. या घटनेत देवाशीष महापात्रा यांचा हात मोडला. तर अश्विनी कुमार मलिक जखमी झाले आहेत.

ADVERTISEMENT

दोन्ही अधिकाऱ्यांना बारीपदा येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात भरती करण्यात आलं. अधिकाऱ्यांना उपचार सुरू आहेत. दरम्यान, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘आजतक’ला दिलेल्या माहिती प्रमाणे केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडू यांच्याविरोधात दोन्ही अधिकाऱ्यांनी पोलिसांत तक्रार दिली होती. त्या तक्रारीवरून बारीपदा शहर पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३२३, ३२५, २९४ आणि ५०६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

हात मोडलेले अधिकारी देवाशीष महापात्रा यांनी घटनेबद्दल माहिती दिली. ‘आधी मंत्र्यांनी शिष्टाचाराचं (प्रोटोकॉल) उल्लंघन केलं असल्याचं सांगून आम्हाला झापलं. आचारसंहिता लागू असल्याने फाईल घेऊन त्यांच्या कार्यालयात आल्यास आचारसंहितेचं उल्लंघन ठरतं हे आम्ही त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. राज्यात नगर पंचायत निवडणूकीमुळे आचार संहिता लागू आहे. यावरून ते संतापले आणि त्यांनी आम्हाला मारहाण करण्यास सुरूवात केली’, असं महापात्रा म्हणाले.

केंद्रीय मंत्र्यांनी आरोप फेटाळले…

केंद्रीय मंत्री विश्वेश्वर टुडू यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत. ‘ते माझ्याकडे आले. जवळपास अर्धा तास आमची बैठक चालली. जेवणाची वेळ झाल्याने संपूर्ण आढावा घेता आला नाही. त्यामुळे मी त्यांना पुन्हा येण्यास सांगितलं. मात्र, ते आलेच नाही.’

‘मी त्यांना केंद्र सरकारने ७ कोटी रुपये कसे खर्च केले याबद्दलची फाईल घेऊन येण्यास सांगितलं होतं. आता ते बिनबुडाचे आरोप करत आहेत. मी जर त्यांना मारलं असतं, तर पुन्हा माझ्या कार्यालयात येऊ शकले असते का?’, असं टुडू यांनी म्हटलं आहे.

दुसरीकडे जखमी झालेले अधिकारी अश्विनी मलिक यांनी टुडू यांच्या गंभीर आरोप केले आहेत. ‘जेव्हा आम्ही दोघं मंत्र्यांना पक्षाच्या कार्यालयात जाऊन भेटलो. MPLADS ची फाईल घेऊन जायचं विसरलो. त्यावरून ते आमच्यावर संतापले. त्यांनी आम्हाला शिवीगाळ केली आणि नंतर प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण करण्यास सुरूवात केली. आम्ही कशीबशी सुटका करून पळालो,’ असं अश्विनी मलिक यांनी म्हटलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT