विनायक मेटेंची पत्नी अधिकारी, तर मुलं घेताहेत शिक्षण; असं आहे शिवसंग्रामच्या नेत्याचं कुटुंब
–रोहित हातांगळे, बीड शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. १९९६ पासून आमदार असलेल्या विनायक मेटेंचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय नसली, तरी आता त्यांचे भाऊ सक्रिय राजकारणात आहेत. मेटे यांच्या पत्नी मात्र राजकारणापासून दूर आहेत. त्या वरिष्ठ अधिकारी आहेत. विनायक मेटे यांच्या कुटुंबांबद्दलची माहिती विनायक मेटे यांनी […]
ADVERTISEMENT
–रोहित हातांगळे, बीड
शिवसंग्राम पक्षाचे नेते आणि आमदार विनायक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला. १९९६ पासून आमदार असलेल्या विनायक मेटेंचा राजकीय प्रवास संघर्षमय राहिला. त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी राजकीय नसली, तरी आता त्यांचे भाऊ सक्रिय राजकारणात आहेत. मेटे यांच्या पत्नी मात्र राजकारणापासून दूर आहेत. त्या वरिष्ठ अधिकारी आहेत.
विनायक मेटे यांच्या कुटुंबांबद्दलची माहिती
विनायक मेटे यांनी पदवीपर्यंत (बी.ए.) शिक्षण घेतलेलं होतं. १९९६ पासून विधान परिषदेच्या माध्यमातून मेटे राजकारणात आहे. त्यांच्या पत्नीचं नाव डॉ. ज्योती आनंदराव लाटकर-मेटे असं आहे. त्या नाशिक येथे धर्मादाय कार्यालयात सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत आहेत.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
विनायक मेटे यांना दोन मुलं असून, त्यांच्या मुलाचं नाव आशुतोष विनायक मेटे (वय १८), तर मुलीचं नाव आकांक्षा विनायक मेटे (वय २१) आहे. विनायक मेटे यांना दोन भाऊ आहेत. रामहरी तुकाराम मेटे आणि त्र्यंबक तुकाराम मेटे अशी त्यांच्या भावांची नावं आहे.
ADVERTISEMENT
रामहरी तुकाराम मेटे हे राजेगाव ग्रामपंचायतीचे (ता. केज, जि. बीड) माजी संरपंच होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे केजचे तालुकाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केलंय. शिवसंग्राम युवक आघाडीचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. विनायक मेटे यांच्या वहिनी वैशाली रामहरी मेटे यांनी केज पंचायत समितीच्या सभापती म्हणून काम केलंय.
ADVERTISEMENT
विनायक मेटेंचा राजकीय प्रवास
१९८६ मध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा कार्यकर्ता म्हणून विनायक मेटेंनी काम सुरू केलं होतं. १९८७ मध्ये पिंपरी चिंचवड येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची महाराष्ट्राचे जनसंपर्क प्रमुख निवड करण्यात आली होती.
१९९४ मध्ये परभणी येथे झालेल्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या सरचिटणीसपदी निवड झाली होती.
१९९५ मध्ये त्यांनी मराठवाडा लोकविकास मंचची स्थापना केली होती. १९९८ मध्ये नवमहाराष्ट्र विकास पार्टीची स्थापनाही विनायक मेटेंनी केली होती.
विनायक मेटेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केलं. १९९९ मध्ये राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं होतं. २००२ मध्ये त्यांनी शिवसंग्राम संघटनेची स्थापना केली होती.
विनायक मेटे यांची विधिमंडळ कारकीर्द
३१ जानेवारी १९९६ ते २० एप्रिल २००० या काळात ते पहिल्यांदा विधान परिषदेत गेले. राज्यपाल नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांनी काम केलं. २८ जुलै २००० ते २७ जुलै २००६ मध्ये ते आजपर्यंत ते विधानसभा सदस्यांतून विधान परिषदेतून निवडून गेले होते. सलग ते पाचव्यांदा विधान परिषदेवर निवडून गेले होते.
ADVERTISEMENT