भाजपचे ‘हेच’ का ते साडेतीन नेते? जे आता आहेत महाविकास आघाडीच्या रडारवर
मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक हाय वोल्टेज पत्रकार परिषद घेतली होती. त्याआधी भाजपचे साडेतीन नेत्यांबाबत आपण गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या वगळता कोणाचं फारसं नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे ते साडेतीन नेते कोण याबाबत त्यांनी काहीही खुलासा केला नव्हता. मात्र, राज्यातील राजकारण दिवसागणिक […]
ADVERTISEMENT

मुंबई: शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी एक हाय वोल्टेज पत्रकार परिषद घेतली होती. त्याआधी भाजपचे साडेतीन नेत्यांबाबत आपण गौप्यस्फोट करणार असल्याचं म्हटलं होतं. दरम्यान, या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी किरीट सोमय्या वगळता कोणाचं फारसं नाव घेतलं नव्हतं. त्यामुळे ते साडेतीन नेते कोण याबाबत त्यांनी काहीही खुलासा केला नव्हता. मात्र, राज्यातील राजकारण दिवसागणिक बदलत आहे. अशातच महाविकास आघाडी देखील आक्रमकपणे राजकारण करत असल्याचं या घडीला दिसतं आहे. त्यामुळे आता भाजपमधील साडेतीन नेते कोण? याविषयी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे.
महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री नवाब मलिक यांना अटक केल्यानंतर सरकारला मोठा धक्का बसला आहे. मात्र, असं असलं तरी भाजपसमोर झुकायचं नाही असं ठरवून महाविकास आघाडीने आता आक्रमक बाणा स्वीकारला आहे. कारण आता त्यांनीही भाजपच्या काही नेत्यांवर अटकेची टांगती तलवार कायम ठेवली आहे.
हेच का साडे तीन नेते?
केंद्रीय यंत्रणांकडून राज्य सरकारमधील अनेक नेत्यांवर धाडसत्र, अटक अशा गोष्टी सुरु असताना आता राज्य सरकार देखील भाजपच्या काही मंत्र्यांच्या अटकेची तयारी करत असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपचे मंत्री नारायण राणे, त्यांचे पुत्र नितेश राणे, भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या हे सध्या महाविकास आघाडीच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे हेच का ते साडेतीन नेते अशी चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे.