MNS, BJP युती होणार का? राज ठाकरेंच्या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलं उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आणि माझी भेट नाशिकला अचानक झाली होती. त्यानंतर त्यांनी सहज भेटायला बोलावलं होतं. मी आज भेटायला आलो होतो. आमच्यात राजकीय चर्चा झाली. मात्र भाजप-मनसे युतीचा प्रस्ताव आमच्या बैठकीत नव्हता. एकमेकांना समजून घेणं, एकमेकांचे विचार जाणून घेणं हे महत्त्वाचं असतं. राज ठाकरे यांची परप्रांतीयांविषयीची भूमिका आहे ती बदलल्याशिवाय आम्ही युतीबाबत चर्चाही करू शकत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

मला एक क्लिप राज ठाकरेंनी दिली होती. उत्तर प्रदेशच्या लोकांसमोर राज ठाकरेंनी केलेलं एक भाषण होतं ती क्लिप ऐक असं त्यांनी मला सांगितलं. मी ते भाषण ऐकलं त्यानंतरही माझ्या मनात काही प्रश्न होते. त्यामुळे आमच्यात त्याविषयी चर्चा झाली. सदीच्छा भेट, राजकीय चर्चा हे आमच्या भेटीचे उद्देश होते. मात्र युतीची चर्चा झाली नाही असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं. ही भेट सकारात्मक ठरली. आमच्यात भूमिकांबाबत चर्चा झाली.

मी एबीव्हीपीचं काम करत होतो तेव्हा राज ठाकरे भारतीय विद्यार्थी सेनेचं काम करत होते. मला व्यक्ती म्हणून राज ठाकरे हे तेव्हापासूनच आवडतात. मात्र भाजप आणि मनसे या दोन पक्षांच्या भूमिका वेगळ्या आहेत. त्यांनी मोठ्या भूमिकेत यायला हवं हे माझं त्यांना सांगणं वेगळं. आत्ता तरी मनसे आणि भाजप एकत्र येऊन निवडणूक लढवण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. माझ्या मनात जे प्रश्न होते त्याबाबत मी राज ठाकरे यांच्याशी त्यावर चर्चा केली. मी गेले वर्षभर बोलतो आहे की राज ठाकरेंनी भूमिका बदलली पाहिजे. तर त्याचं उत्तर मी इतकंच सांगेन की आज ती वेळ यायची पाहिजे.

हे वाचलं का?

उत्तर प्रदेशात नोकऱ्या मिळणार असतील तर त्या 80 टक्के उत्तर प्रदेशीयांना मिळाल्या पाहिजेत आणि महाराष्ट्रात नोकऱ्या मिळणार असतील तर त्या 80 टक्के महाराष्ट्रीयन लोकांना मिळाल्या पाहिजेत असं मला राज ठाकरे यांनी सांगितलं. त्यावर मी त्यांना म्हणालो की जम्मू काश्मीरमध्ये अशी परिस्थिती होती की तिथे तिथल्या स्थानिकांशिवाय कुणालाही नोकरी, काम मिळत नव्हतं. कलम 370 लागू केल्यानंतर ही परिस्थिती बदलली. मुंबईच्या बाबत तुम्ही व्यापक भूमिका घेतली पाहिजे कारण तुमचं हे म्हणणं आहे ते कटुता दर्शवणारं आहे असं मी राज ठाकरेंना सांगितलं. असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. दोन राजकीय नेते भेटले की पुन्हा भेटू म्हणतात. त्यामुळे पुन्हा भेट घेतली तर त्यात गैर काही नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT