माई आणि मी रोज संपर्कात होतो का? तर नाही, पण...; सिंधुताईंच्या आठवणींनी तेजस्विनी झाली भावूक

सोशल मीडियावर पोस्ट लिहून व्यक्त केल्या भावना; आठवणींना दिला उजाळा
सिंधुताई सपकाळ आणि तेजस्विनी पंडित.
सिंधुताई सपकाळ आणि तेजस्विनी पंडित.facebook

अनाथ मुलांना मायेची उब देत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या अनाथांच्या माई अर्थात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रभर हळहळ व्यक्त केली जात असून, सिंधुताईंच्या आयुष्यावरील चित्रपटात भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आठवणींना उजाळा दिला.

तेजस्वीनीने मांडलेल्या भावना तिच्याच शब्दात...

अनेक लोकांनी विचारलं तू अजून कसं काही लिहलं नाहीस....पोस्ट नाही केलं ?

पटकन जज (judge) करतो ना आपण त्यांच्या सोशल मीडियावरून (social media) माणसाला?

पण कुटुंबातल्या माणसांना घरातलं कुणी गेल्यावर सोशल मीडियावर (social media) पोस्ट करण्याची मनःस्थिति आणि वेळ खरंच असतो? माझीही काहीशी अशीच अवस्था झाली.

रात्री ममता ताईच्या फोनवरून बातमी कन्फर्म (confirm) झाल्यावर काही क्षण पायातली ताकदच गेली. थक्क झाले होते.

खूप वेळ फोन वाजत होता. प्रतिक्रियेसाठी. काही जड छातीने उचलले, काही नाही उचलता आले... कारण ती वेळ खरंच नाजूक होती.

सिंधुताई सपकाळ आणि तेजस्विनी पंडित.
'चिंधी'ची सिंधुताई झाली अन् हजारो अनाथांना माय मिळाली; असा होता माईंचा संघर्ष

माई आणि मी रोज संपर्कात होतो का तर नाही... पण तुमच्या आयुष्यात एखादी अशी व्यक्ती येऊन जाते की, तुमचं आयुष्यच बदलून जातं आणि ह्यात त्यांचा हातभार आहे ह्याचं त्यांना भान ही नसतं. चित्रपटानंतर काही वेळा त्यांना भेटण्याचा योग आला... कधीच कुणाला नावाने हाक न मारता 'बाळा' म्हणणार्‍या माईंना माझं नाव मात्र पाठ होतं. हातात हात घेऊन माझी पाठ थोपटायच्या. मला चित्रपट बघून कायम म्हणायच्या 'मी हे आयुष्य जगले आहे पण तू मला जिवंत केलंस!

'अभिनेत्री' म्हणून एक तेजस्विनी पंडित आहे बरंका इथे; अशी ओळख मला मी सिंधुताई सपकाळ ह्या चित्रपटाने दिली. अनेक आंतराष्ट्रीय, राष्ट्रीय पुरस्कार आम्ही पटकावले.

अभिमान वाटतो की ज्या कलाक्षेत्रात मी काम करते, त्यातून माईंचं हे महान कार्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचा खारीचा का असेना पण मला वाटा उचलता आला.

आणि एक व्यक्ती म्हणून त्यांचा तो अविस्मरणीय प्रवास मी स्क्रीन (screen) वर जगू शकले, त्यातून बरेच काही शिकू शकले ह्याचा आनंद आहे. परकाया प्रवेश म्हणतात ना तेच! कळत नकळत खूप काही दिलं तुम्ही मला माई.

महाराष्ट्र तुमच्या जाण्याने पोरका झाला...! पण माझ्यासाठी तुम्ही जिवंतच असाल आणि तुमच्यावर आधारित असलेला चित्रपट तुमच्या लढवय्या वृत्तीची, तुमच्या संघर्षाची ग्वाही, प्रेरणा माझ्या रूपी देत राहील.

सिंधुताई सपकाळ आणि तेजस्विनी पंडित.
सिंधुताई सपकाळांना कोणता आजार झाला होता?; रुग्णालयाच्या बुलेटीनमध्ये काय म्हटलंय?

लोकहो एक विनंती....

घाई घाईने RIP लिहिण्याच्या ह्या जगात त्यांचंही एक कुटुंब आहे (आणि ते खूप मोठं आहे) ते अत्यंत अवघड परिस्थितीतून जात आहे. ह्याचा आपल्याला विसर पडण्याची शक्यता आहे... त्यांना वेळ द्या. त्यांना कुटुंबातील व्यक्तीच्या जाण्यानं झालेलं दुःख व्यक्त करण्यासाठी थोडा वेळ द्या (Let them atleast have some time to mourn on a family members death). तब्येत बरी नसल्यामुळे उद्या त्यांच्या अंत्यदर्शनासाठी जाता येणार नाही, पण ईश्वर चरणी प्रार्थना. माईंच्या आत्म्यास शांती लाभो. आणि ममता ताई, दीपक दादा, ममता बाल सदनच्या कुटुंबाला ह्या अवघड परिस्थितीशी लढण्याची ताकद देवो.

ओम शांती.

माई....

- तुमचीच चिंधी, सिंधुताई आणि माई

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in