'शिवाजी:द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया' हे पुस्तक इतिहास नाही, जेम्स लेनची मुंबई तकच्या मुलाखतीत कबुली

मुंबई तकला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत जेम्स लेनने दिलं स्पष्टीकरण
'शिवाजी:द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया' हे पुस्तक इतिहास नाही, जेम्स लेनची मुंबई तकच्या मुलाखतीत कबुली

सध्या महाराष्ट्रात जेम्स लेनचा विषय चांगलाच गाजतो आहे. बाबासाहेब पुरंदरे यांना जेम्स लेनच्या पुस्तकावरून वाद निर्माण करून सॉफ्ट टार्गेट करण्यात आलं असा आरोप राज ठाकरे यांनी त्यांच्या भाषणात केला. तर दुसरीकडे शरद पवार यांनी हे सगळे आरोप फेटाळले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा जेम्स लेनचा विषय समोर आला. अशात जेम्स लेन यांनी मुंबई तकला एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे की माझ्या पुस्तकात कोणतंही ऐतिहासिक तथ्य मांडलेलं नाही.

जेम्स लेन
जेम्स लेन फाईल फोटो-सौजन्य-फेसबुक

प्रकरण काय?

जेम्स लेन हा एक अमेरिकन लेखक होता. १९९० च्या दरम्यान तो भारतात आला, तो प्रामुख्याने महाभारताचा अभ्यास करण्यासाठी. हा अभ्यास करण्यासाठी जेम्स लेनने निवड केली ती पुण्यातील भांडारकर प्राच्याविद्या संशोधन संस्थेची. मात्र संशोधन करता करता त्याच्या लक्षात आलं की महाराष्ट्रातील जनतेवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा मोठा प्रभाव आहे आणि त्याचवेळी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहायचं नक्की केलं. या विषयावर आपला अभ्यास पूर्ण झाल्यावर जेम्स लेनचं 'शिवाजी : द हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे पुस्तक आँक्सफर्ड प्रकाशनाने जून २००३ मध्ये प्रकाशित केलं.

बाबासाहेब पुरंदरे आणि काही मंडळींनी १० नोव्हेंबर २००३ ला ऑक्सफर्ड इंडिया प्रेस प्रकाशन संस्थेला पत्र लिहिलं. हे पुस्तक तात्काळ मागे घ्या, अशी मागणी केली होती. या पत्राला आँक्सफर्ड इंडिया प्रेसने २१ नोव्हेंबर २००३ ला म्हणजेच ११ दिवसात लगेच उत्तर दिलं. त्यांनी जेम्स लेनच्या वादग्रस्त पुस्तकाबाबत माफी मागितली. यानंतर जेम्स लेनने डिसेंबर २००३ ला आपल्या या वादग्रस्त पुस्तकातील लिखाणाबाबत फँक्स करत माफीनामा पाठवला.

not a single word discussed with babasaheb purandare huge revelation made by james lane himself in exclusive interview
not a single word discussed with babasaheb purandare huge revelation made by james lane himself in exclusive interview

आता जेम्स लेनचं म्हणणं काय?

प्रश्न: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची अवमानकारक माहिती कोणी पुरवली होती?

उत्तर (जेम्स लेन): तुम्ही प्रश्न चुकीच्या पद्धतीने विचारत आहात. मला कोणीही माहिती पुरवली नाही. माझं पुस्तक लोकांमध्ये प्रचलित असलेल्या कथांबद्दल आहे. या कथा सांगत असलेल्या लोकांनी काय Narrative सेट करून ठेवलंय त्याबद्दल आहे. काही लोक रामदास यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात, तर काही तुकाराम महाराज यांना शिवाजी महाराजांचे गुरु मानतात. यातलं काय खरं आहे, त्यात मला काहीही रस नाही. पण एक गट पहिल्या Narrative च्या बाजूने आहे तर दुसरा दुसऱ्या narrative च्या बाजूने. असं का?

'शिवाजी:द हिंदू किंग ऑफ इस्लामिक इंडिया' हे पुस्तक इतिहास नाही, जेम्स लेनची मुंबई तकच्या मुलाखतीत कबुली
'पान क्रमांक 93, उतारा चौथा..', जेम्स लेनच्या पुस्तकाबाबत आव्हाडांनी काय केला होता दावा?

प्रश्न: तुमच्याकडे असलेल्या अवमानकारक माहितीचा आधार काय?

उत्तर (जेम्स लेन): माझं पुस्तक काळजीपूर्वक वाचणाऱ्याच्या लक्षात येईल की मी कुठलंही ऐतिहासिक तथ्य मांडल्याचा दावा केलेला नाही. मी शिवाजी महाराजांचा अवमान केलाय, अशी टीका करणाऱ्यांनी चुकीचा अर्थ काढलाय. पुन्हा सांगतो मी कथांबद्दल बोलतोय, इतिहासातील तथ्यांबद्दल नाही.

प्रश्न: या विषयाबाबत तुमचं बाबासाहेब पुरंदरेंशी बोलणं झालं होतं का? त्यांचं म्हणणं काय होतं?

उत्तर (जेम्स लेन): मी कधीही बाबासाहेब पुरंदरेंशी एका शब्दानेही बोललेलो नाही.

छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज

प्रश्न: महाराजांबद्दलचे अवमानकारक शब्द तुम्ही मागे घेतले. ते कशामुळे?

उत्तर (जेम्स लेन): युक्तिवाद करताना मी पुरेशी काळजी घेतली नाही आणि त्याचा परिणाम इतरांना भोगावा लागला.

बाबासाहेब पुरंदरे
बाबासाहेब पुरंदरेफोटो- सौजन्य-फेसबुक

प्रश्न: बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार केला. त्याकडे तुम्ही कसं बघता?

उत्तर (जेम्स लेन): पुरंदरे यांनी एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची थोरवी मांडली. त्याबद्दल त्यांचं कौतुकही झालं. त्यांच्यावर आज होत असलेली टीका ही अठराव्या आणि एकोणिसाव्या शतकात वाचला गेलेल्या इतिहासाचा परिपाक आहे. शिवाजी महाराजांचे वंशज खरेखुरे क्षत्रीय नव्हते असं त्या काळातील काही ब्राह्मणांना वाटत असे. त्यातून निर्माण झालेल्या रोषाचा परिणाम ब्राह्मण आणि मराठा यांच्यात इतिहासाच्या आकलनावरून झालेल्या वादात पाहायला मिळतो.

प्रश्न: तुमच्या पुस्तकावरून होणाऱ्या वादाकडे तुम्ही कसं बघता?

उत्तर (जेम्स लेन): छत्रपती शिवाजी महाराज महान नायक होते. त्यांचं चरित्र हा आज गांभीर्यपूर्वक अभ्यास करण्याचा विषय राहिलेला नाही याचं मला दुःख वाटतं. याउलट तत्कालिक राजकीय वाद निर्माण करण्यासाठी त्यांच्या चरित्राचा दुरुपयोग होतोय.

एकंदरीत ही मुलाखत जर नीट वाचली तर जेम्स लेन यांनी हा दावा केला आहे की आपल्या पुस्तकात काहीही ऐतिहासिक तथ्य नाही. आता या सगळ्या प्रकरणाचा पुढचा अध्याय काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

Related Stories

No stories found.