भूतबाधेच्या नावाखाली तरुणीसोबत भयानक प्रकार! उदबत्तीचे चटके अन् राख खायला दिली, अखेर बेशुद्ध झाली अन्...
आरोपींनी पीडित तरुणीच्या अंगात एक आत्मा असून ते भूत बाहेर काढण्यासाठी जादू-टोणा करायचं असल्याचा दावा करून पीडितेसोबत धक्कादायक कृत्य करण्यात आलं.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
भूतबाधेच्या नावाखाली तरुणीसोबत भयानक प्रकार!
उदबत्तीचे चटके अन् राख खायला दिली...
पीडितेच्या प्रकृतीत बिघाड
Crime News: आजच्या आधुनिक काळात सुद्धा देशातील सुशिक्षित लोक देखील अंधश्रद्धेला खत-पाणी घालत असल्याच्या घटना पाहायला मिळतात. केरळच्या कोट्टायम जिल्ह्यातून अशीच एक बातमी समोर आली आहे. येथे एका तरुणीचा तिच्या मित्रांनी आणि कुटुंबियांनी भूतबाधेच्या नावाखाली बराच काळ शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचं सांगितलं जात आहे. आरोपींनी पीडित तरुणीच्या अंगात एक आत्मा असून ते भूत बाहेर काढण्यासाठी जादू-टोणा करायचं असल्याचा दावा करून पीडितेसोबत धक्कादायक कृत्य करण्यात आलं.
रात्री उशिरापर्यंत जादू-टोण्याचे विधी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणासंदर्भात आरोपी युवक अखिल दास (26), त्याचे वडील दास (54) आणि एक मांत्रिक शिवदास (54) यांना अटक करण्यात आली आहे. संबंधित घटना ही मागील आठवड्यातच घडल्याची माहिती आहे. आरोपी आरोपानुसार, तरुणाच्या कुटुंबियांनी एका मांत्रिकाला त्यांच्या घरी बोलावलं आणि भूतबाधेच्या नावाखाली तरुणीवर जादू-टोणा करण्याचे विधी सुरू करण्यात आले. पीडितेनं याबाबत सांगितलं की जादू-टोण्याचा हा प्रकार सकाळी 11 वाजता सुरू झाला आणि रात्री उशिरापर्यंत चालू होता.
हे ही वाचा: मुंबईची खबर: आता 4 तासांचा प्रवास केवळ 90 मिनिटांत... तब्बल 9 वर्षांनंतर 'या' कॉरिडोरच्या कामाला सुरूवात होणार!
राख खायला दिली अन् उदबत्तीचे चकटे...
संबंधित तरुणीने पोलिसात तक्रार करताना सांगितलं की, जादू-टोण्याच्या विधी दरम्यान, तिला विडी ओढण्यास आणि दारू पिण्यास भाग पाडण्यात आलं. इतकेच नव्हे तर, तिला सिंदूर मिसळलेली राख खायला देण्यात आली आणि तिच्या शरीरावर सुद्धा उदबत्तीचे चटके देण्यात आले. सतत वेदना होऊ लागल्याने पीडितेची तब्येत अचानक बिघडली आणि ती बेशुद्ध पडली. मात्र, तरुणीची प्रकृती आणखी खालावत गेल्याने तिच्या वडिलांना संशय आला. त्यानंतर, त्यांनी लगेच पोलिसात या प्रकरणाबाबत तक्रार दाखल केली.
हे ही वाचा: राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस, शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानं बच्चू कडूंचा संताप
पोलिसांचा तपास
पोलिसांनी या घटनेचा तपास केला आणि यामध्ये सहभागी असलेल्या तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली. मात्र, मांत्रिकाला आपल्या घरी बोलवणारी पीडितेची आई अद्याप फरार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच, संबंधित घटनेनंतर आरोपी मांत्रिक शिवदास पोलिसांपासून लपून बसला होता आणि त्याने त्याचा फोन सुद्धा बंद केला होता, परंतु पोलिसांनी त्याला थिरुवल्ला येथील मुथूर परिसरातून अटक केली. आता, न्यायालयाने तिन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून सध्या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती आहे.










