
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा लावण्याबाबतचा आदेश कार्यकर्त्यांना दिल्यानंतर पुणे शहरात याचे विपरीत पडसाद उटमताना दिसले. राज ठाकरे यांचे खंदे समर्थक आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी लाऊडस्पीकरच्या भूमिकेबद्दल मी दुविधेत असल्याचं सांगितलं. यानंतर वसंत मोरेंच्या नाराजीनाट्याची चर्चा रंगत असताना पक्षाने पुण्याच्या नेतृत्वात बदल केले आहेत.
पुणे शहराध्यक्ष पदावरुन वसंत मोरे यांना हटवण्यात आलं असून माजी नगरसेवक साईनाथ बाबर यांची शहराध्यक्ष पदावर नेमणुक केली आहे. दरम्यान वसंत मोरे यांनी नवीन नेमणुकीचं स्वागत करत आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन साईनाथ बाबर यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अरे मी तर कधीपासून तुझाच मावळा आहे असं म्हणत वसंत मोरे यांनी आपला मावळ्याच्या वेशातला आणि बाबर यांचा शिवाजी महाराजांच्या वेशातला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे.
वसंत मोरे यावेळी म्हणाले की, गेल्या ३ दिवसांपासून मी नाराज नाही असं सांगतो आहे. माझी भूमिका ही लोकप्रतिनिधी म्हणून होती. शहर अध्यक्ष हा पक्षाचा असतो आणि नगरसेवक हा लोकांचा असतो. मी राज ठाकरेंना शहराध्यक्ष पदाबद्दल सांगितले होते. मी मे महिन्यापर्यंत अध्यक्ष राहील त्यानंतर दुसऱ्याला ही जबाबदारी द्या असं मी त्यांना सांगितलं होतं. मी पक्षावर आणि राज साहेबांनवर खोटं प्रेम केलं नाही. जे पोटात आहे, ते डोक्यात आहे आणि तेच ओठांवर आहे. मी पक्षासोबत राहील, तसेच मला कोणाच्या ही पाठिंब्याची गरज नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरेंनी घेतलेल्या लाऊडस्पीकरच्या निर्णयाला वसंत मोरे यांनी विरोध दर्शवला होता. माझ्या प्रभागात मुस्लीम मतदार आहेत. त्यांच्याकडून तुम्ही काय भूमिका घेणार असे मला विचारले जात आहे. त्यामुळे हा विषय माझ्यासाठी अडचणीचा ठरत असल्याने माझ्या भागात मशिदीवरील भोंगे यांच्याविरोधात भोंगे लावले जाणार नाहीत असं मोरे यांनी सांगितलं होतं.