वीर सावरकर जयंती: काँग्रेस आणि शिवसेनेच्या वादाचा दिवस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: भारतीय स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर (Vinayak Damodar Savarkar) यांची आज 138वी जयंती आहे. याचनिमित्ताने शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ट्विट करत सावरकरांचा उल्लेख थेट ‘भारतरत्न’ असा केला आहे. त्यांनी आपल्या या ट्विटमधून एकप्रकारे भाजपला डिवचण्याचा देखील प्रयत्न केला आहे. मात्र, दुसरीकडे आता यावरुन काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कारण शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेस (Congress) या दोन्ही पक्षांमध्ये सावकरांबाबत दोन विरुद्ध स्वरुपाची मतं आहेत.

विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती असली तरी आतापर्यंत हाच दिवस अनेकदा काँग्रेस आणि शिवसेनेच्या वादाचा दिवस ठरत असल्याचं पाहायला मिळालं आहे. गेली अनेक वर्ष शिवसेनेने कट्टर हिंदुत्वाचा पुरस्कार करताना सावरकरांचं हिंदुत्व अंगीकारत असल्याचं वारंवार म्हटलं होतं. तर दुसरीकडे काँग्रेसच्या अनेक नेत्यांकडून सावरकरांवर अत्यंत टोकाची टीका करण्यात आली आहे. सावरकरांचं स्वातंत्र्य लढ्यात कोणत्याही प्रकारचं योगदान नव्हतं. अशाप्रकारची वक्तव्यं अनेकदा काँग्रेस नेत्यांकडून वारंवार करण्यात आली आहे.

दुसरीकडे याच वक्तव्यांवरुन शिवसेना सातत्याने काँग्रेसवर निशाणा साधत आल्याचं पाहायला मिळालं आहे. मात्र, 2019 विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात शिवसेनेने काँग्रेसच्या मदतीने जेव्हा सत्ता स्थापन केली त्यावेळी सावरकरांच्या मुद्द्यांवर हे दोन्ही पक्ष काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं होतं. मात्र, सत्ता स्थापन होऊन महिना देखील देखील झाला नाही तोच याच मुद्द्यावरुन दोन्ही पक्षांमध्ये पुन्हा जुंपल्याचं पाहायला मिळालं होतं.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मुख्यमंत्री ठाकरेंनी विधानसभेत विरोधकांना लगावले प्रचंड टोले

सावरकरांवरुन काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये नेहमीच रंगतो वाद

ADVERTISEMENT

14 डिसेंबर 2019 रोजी म्हणजे महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार आल्याच्या अगदीच काही दिवसांनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका जाहीर सभेत असं म्हटलं होतं की, ‘माझं नाव राहुल सावरकर नाही, माझं नाव राहुल गांधी आहे. मी सत्य बोलत आहे आणि यासाठी मी कधीही माफी मागणार नाही. मी मरण पत्करेन पण माफी मागणार नाही.’ असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं.

ADVERTISEMENT

त्यांच्या याच वक्तव्यामुळे शिवसेनेने आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली होती. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राहुल गांधींना उत्तर देताना असं म्हटलं होतं की, ‘वीर सावरकर फक्त महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशाचे देवता आहे. सावरकर या एका नावात राष्ट्राभिमान आणि स्वाभिमान आहे. नेहरु आणि गांधी यांच्याप्रमाणेच सावरकरांनी देखील स्वातंत्र्यलढ्यात आपली आहुती दिली आहे. त्यामुळे अशा प्रत्येक देवतेचा सन्मान केला गेला पाहिजे. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.’

यावेळी संजय राऊत यांनी असंही म्हटलं होतं की, ‘आम्ही पंडित नेहरु, महात्मा गांधी यांना मानतो, तुम्ही वीर सावरकरांचा अपमान करुन नका. सुज्ञास अधिक सांगणे न लगे.’

दरम्यान, मध्यप्रदेशमधील भोपाळमध्ये काँग्रेस सेवा दलाच्या एका निवासी शिबिरात शिबिरार्थींना विविध पुस्तकं देण्यात आली होती. ज्यामधील एक पुस्तक हे वि. दा. सावरकरांवरील होतं. ज्यामध्ये सावरकरांवर अत्यंत गंभीर आणि आक्षेपार्ह स्वरुपाची टीका करण्यात आली होती. ज्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेस या मुद्द्यावरुन चर्चेत आली होती.

गोध्राच्या तुलनेत शेतकऱ्यांचं आंदोलन शांत, सेनेचा मोदींवर पलटवार

यावेळीही शिवसेनेने या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेसवर टीका केली होती. शिवसेना नेते संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की, ‘वीर सावरकर हे महान होते, आहेत आणि राहतील. त्यांच्याबद्दलची आमची श्रद्धा अशा फालतू पुस्तकाने कधीच कमी होणार नाहीत. भोपाळमध्ये तयार झालेली ही घाण म्हणजे हे पुस्तक आहे. ते अनधिकृत असून ते महाराष्ट्रात आणलं जाणार नाही. सावरकरांवर इतरांनी आम्हाला ज्ञान देण्याची गरज नाही.’

याशिवाय काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी देखील अनेकदा सावकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. 2004 साली देखील मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांविरुद्ध वादग्रस्त टीका केल्यानंतर आणि अंदमानमधील जेलमधून त्यांच्या नावाची पाटी हटविण्यावरुन बाळासाहेब ठाकरे यांनी जोडे मारो आंदोलन सुरु केलं होतं. त्यामुळे सुरुवातापासूनच शिवसेना सावरकरांबाबत खूपच भावनात्मक आणि संवेदनशील असल्याचं पाहायला मिळालं आहे.

दरम्यान, आज विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती असून आता शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील आपल्या सावरकरांना आदरांजली अर्पण केली आहे. दुसरीकडे याबबत काँग्रेसचे नेते नेमकं काय बोलणार हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे.

काँग्रेस नेत्यांनी आतापर्यंत अनेकदा सावरकरांविरुद्ध अनेकदा आक्रमक वक्तव्य केली आहेत. मात्र, आता राज्यात शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत आहेत. अशावेळी हे दोन्ही पक्ष आजच्या दिवस सावरकरांच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा भिडणार का? याबाबत राजकीय वर्तुळात बरीच चर्चा आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT