मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना काय निरोप दिला?
गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुठे आहेत ही चर्चा सुरू झाली. याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडच्या संदर्भात जी बैठक बोलावली होती त्या बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. त्यांनी या बैठकीला राजेश टोपे आणि दिलीप वळसे पाटील यांना पाठवलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे WhatsChatBoat च्या कार्यक्रमात उद्धव […]
ADVERTISEMENT

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कुठे आहेत ही चर्चा सुरू झाली. याचं प्रमुख कारण होतं ते म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हिडच्या संदर्भात जी बैठक बोलावली होती त्या बैठकीला उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. त्यांनी या बैठकीला राजेश टोपे आणि दिलीप वळसे पाटील यांना पाठवलं होतं. मात्र दुसऱ्याच दिवशी म्हणजे WhatsChatBoat च्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे होते. तसंच कोस्टल रोडच्या ऑनलाईन कार्यक्रमातही त्यांची झलक दिसली.
मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती असल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्याविषयी प्रश्न विचारण्यास सुरूवात केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नगरसेवक, शाखाप्रमुख या सगळ्यांची बैठक घेतली होती त्यावेळी आपण लवकरच बाहेर पडणार आहोत अशी घोषणा केली होती. येत्या दोन आठवड्यात मी बाहेर पडणार असल्याचा महत्त्वाचा निरोप उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना दिला आहे. याचाच अर्थ असा होतो की मुंबई महापालिकेच्या निवडणुका या मार्च महिन्यात घेतल्या जाऊ शकतात. मुख्यमंत्र्यांनी एक प्रकारे त्याचं सूतोवाच केलं आहे असं म्हणता येईल.
मी योग्यवेळेस सगळ्या प्रश्नांची उत्तरं देईन असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपण महापालिका निवडणुकीसाठी तयार असलं पाहिजे असं महाविकास आघाडीतल्या इतर पक्षांचंही म्हणणं आहे. सुप्रीम कोर्टाची सुनावणी ओबीसी आरक्षणाबाबत करणार आहे. त्याकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या विभागप्रमुखांच्या बैठकीत सांगितलं की मी लवकरच बाहेर पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या ऑनलाईन सगळीकडे उपस्थिती लावत आहेत. यातून हे स्पष्ट आहे की उद्धव ठाकरेंना कार्यकर्त्यांमध्ये हा मेसेज द्यायचा आहे की मी प्रचारासाठी उपलब्ध असणार आहे.
पक्षप्रमुख प्रचारात असतील तर प्रचाराला आणखी जोर येतो. तेच लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी दोन आठवड्यात आपण बाहेर पडणार असल्याचं वक्तव्य केलं. भाजपकडून त्यांच्या अनुपस्थितीवर वारंवार प्रश्न उपस्थित केले जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा हे वक्तव्य केलं की मुख्यमंत्र्यांनी त्यांचा कार्यभार इतर कुणाकडे तरी सोपवावा. असं असताना मी उपलब्ध आहे आणि लवकरच तुमच्यासोबत असेन हा संदेश मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. ज्याला आत्ता सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महत्त्व आहे.