
नॅशनल हेराल्ड प्रकरणी (National Herald Case) काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे. सोनिया गांधी कार्यालयात एजन्सीच्या प्रश्नांना उत्तरे देत असताना काँग्रेस रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळाली. खुद्द राहुल गांधीही (Rahul Gandhi) रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. मंगळवारीही राहुल गांधी मोदी सरकारचा निषेध करत असताना पोलिसांनी त्यांना विजय चौकातून ताब्यात घेतले. काही काँग्रेस कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले.
आता या सगळ्या कारवाईमध्ये राहुल गांधींचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्या फोटोत राहुल गांधी रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेले दिसत आहेत. पोलिसांकडून त्यांना आंदोलन करु दिले जात नसल्याचे आरोप राहुल गांधी करत आहेत. देशात पोलीस राजवट सुरू आहे. हे भारताचे कटू सत्य आहे की इथे मोदी राजा आहे असे गांधी म्हणाले.
आता काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवरून राहुल गांधींचा हा फोटो शेअर केला आहे. यासोबतच त्यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा 45 वर्षे जुना फोटोही शेअर केला आहे. त्या फोटोत इंदिरा गांधी जमिनीवर बसलेल्या दिसत आहेत. हे दोन्ही फोटो शेअर करताना काँग्रेसने लिहिले आहे की, ''जंजीर बढ़ा कर साध मुझे, हाँ, हाँ दुर्योधन! बाँध मुझे। बाँधने मुझे तो आया है, जंजीर बड़ी क्या लाया है? इतिहास दोहरा रहा है...''
इंदिरा गांधींचा काँग्रेसने शेअर केलेला फोटो १९७७ सालचा आहे. हीच वेळ होती जेव्हा स्वातंत्र्यानंतर काँग्रेस पहिल्यांदाच निवडणूक हरली होती, तेव्हा खुद्द इंदिरा गांधींना त्यांची रायबरेलीची जागाही वाचवता आली नाही. त्यानंतर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाने सरकार स्थापन केले होते. काही वर्षांनी इंदिरा गांधींनी सत्तेत जोरदार पुनरागमन केले ही वेगळी बाब आहे.
काँग्रेसद्वारा प्रकाशीत नॅशनल हेराल्ड वृत्तपत्राची मालकी असलेल्या यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडमधील आर्थिक गैरव्यवहार प्रसंगी ईडी सोनिया गांधींची चौकशी करत आहे. 2013 मध्ये, एका ट्रायल कोर्टाने भारतीय जनता पक्षाचे (भाजप) खासदार सुब्रमण्यम स्वामी यांच्या खाजगी तक्रारीच्या आधारे यंग इंडियन विरुद्ध आयकर विभागाच्या तपासाची दखल घेतली होती. तेव्हापासून या प्रकरणामुळे गांधी कुटुंबाच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यानंतर अनेकवेळा त्यांना चौकशीला हजर राहावं लागले आहे.