शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव, रोहित पवार यांचा गंभीर आरोप

जाणून घ्या नेमकं काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी?
After Shiv Sena, now BJP's plot to break NCP, Rohit Pawar's serious accusation
After Shiv Sena, now BJP's plot to break NCP, Rohit Pawar's serious accusation

शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा भाजपचा डाव आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत रोहित पवार यांनी हा आरोप केला आहे. पवार कुटुंबीयांमध्ये फूट पाडण्याचा भाजपचा डाव असल्याचंही वक्तव्य त्यांनी केलं आहे.

काय म्हटलं आहे रोहित पवार यांनी?

शिवसेनेत ज्या प्रमाणे फूट पडली ती फूट आपण सगळ्यांनीच पाहिली आहे. आता पुढचं लक्ष्य आम्ही असू शकतो. पवार कुटुंबात फूट पाडली की राष्ट्रवादी फोडता येईल असं भाजपला वाटतं. त्यामुळे ते पुढे आमच्यात फूट पाडण्याची परिस्थिती निर्माण करतील किंवा फूट पाडतील या आशयाचं वक्तव्य रोहित पवार यांनी केलं आहे.

खासदार सुप्रिया सुळे लोकसभेत, अजित पवार यांना राज्यात आणि मला सध्या जे काम करतो आहे तेच करण्याची इच्छा आहे. पण भाजपने ज्याप्रमाणे शिवसेनेत दोन गट पाडले त्याचप्रमाणे त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडायचा आहे असा आरोप रोहित पवार यांनी केला. याबाबत अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र शरद पवार यांनी काही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही.

अजित पवार यांनी रोहित पवारांच्या या वक्तव्याबाबत काय म्हटलं आहे?

"मी रोहितला विचारतो तू जे वक्तव्य केलं ते नेमकं कोणत्या अर्थाने केलं? त्याचा अर्थ काय आहे ते विचारतो." असं म्हणत अजित पवार यांनी रोहित पवारांविषयीच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. फोडाफोडीचं राजकारण, फोडणं वगैरे.. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवायचा अधिकार आहे. भाजपला आहे, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला आहे, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आहे. मनसेलाही तो अधिकार आहे. काय होतं कुणी आज काल या सगळ्याबाबत वेगळं काही मत व्यक्त केलं की त्याचे अर्थ काढले जातात असंही अजितदादांनी म्हटलं आहे.

रोहित पवार आणखी काय म्हटले आहेत?

शिवसेनेत जी फूट पडली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला वाढायला आणखी वाव आहे असं वाटत नाही का? हा प्रश्न विचारला असता रोहित पवार म्हणाले की आम्ही या घटनेकडे संधी म्हणून पाहात नाही. प्रत्येक पक्षाला त्यांचं धोरण असतं. जे घडलंय त्यामुळे आम्ही आनंदी आहोत का हा प्रश्न असेल तर त्याचं उत्तर नाही असंच आहे असंही रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in