महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या टाटा एअरबस प्रकल्पाचं रविवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिपूजन

वाचा सविस्तर बातमी काय असणार आहे या खास एअरक्राफ्टची खासियत ?
Bhumi Pujan of Tata Airbus project moved from Maharashtra to Gujarat on Sunday by Prime Minister Modi
Bhumi Pujan of Tata Airbus project moved from Maharashtra to Gujarat on Sunday by Prime Minister Modi

महाराष्ट्रातून गुजरातला गेलेल्या टाटा एअरबस या प्रकल्पाचं रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. ३० ऑक्टोबरला म्हणजेच येत्या रविवारी हे भूमिपूजन होणार आहे. टाटांचा हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यावरून महाराष्ट्रात राजकारण रंगलं आहे. कारण वेदांता फॉक्सकॉनपाठोपाठ आणखी एक मोठा प्रकल्प राज्याच्या बाहेर गेला आहे. त्यावरून शिंदे-फडणवीस सरकावर टीका केली जाते आहे. अशात आता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं जाणार आहे.

२०२१ मध्ये एअरबसोबत झाला होता करार

सप्टेंबर २०२१ मध्ये एअरबस डिफेन्स अँड स्पेस यांच्यासोबत २१ हजार कोटींचा करार करण्यात आला होता. यामध्ये जुन्या AVRO 748 च्या जागी C295 एअरक्राफ्ट खरेदी करण्याचा करार झाला होता. ५६ विमानांची मागणी करण्यात आली होती. यातले १६ स्पेनहून तयार होणार आहेत. तर ४० एअरक्राफ्ट गुजरातच्या वडोदरामध्ये निर्मिले जाणार आहेत. सप्टेंबर २०२१ मध्ये जो करार झाला तो भारताने एअरबस डिफेंस आणि स्पेस यांच्यासोबत केला होता.

मेक इन इंडियाला मिळणार प्रोत्साहन

संरक्षण मंत्रालायाच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं की ही विमानं पूर्णपणे स्वदेशी बनावटीची असतील. मेक इन इंडिया या प्रोजेक्टला उर्जा देण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प तयार होतो आहे. सप्टेंबर २०२३ ते ऑगस्ट २०२५ या कालावधीत १६ एअरक्राफ्ट सोपवले जातील. त्यानंतर २०२६ ते २०३१ या पाच वर्षांच्या कालावधीत स्वदेशी बनावटीचे एअरक्राफ्ट तयार केले जातील.

एअरक्राफ्टचं वैशिष्ट्य काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सातत्याने संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर झालं पाहिजे असा उल्लेख करत असतात. अशात देशात अशा प्रकारच्या एअरक्राफ्टची निर्मिती होणं हे त्या दृष्टीने एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे एअरक्राफ्ट अवघड भागातही जाऊ शकतं. या एअरक्राफ्टमध्ये ७१ सैनिक, ४४ पॅराट्रूप्स आणि २४ स्ट्रेचर घेऊन जाण्याची क्षमता आहे. नैसर्गिक संकटाला तोंड देऊ शकतील अशी ही विमानं तयार केली जाणार आहेत. रेस्क्यू ऑपरेशन करण्यासाठी भारतीय वायुदलाला या विमानांची मोलाची मदत मिळू शकणार आहे.

महाराष्ट्रात रंगलं आहे राजकारण

महाराष्ट्रातला वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर बराच गदारोळ झाला होता. आरोप-प्रत्यारोपांचं राजकारण रंगलं होतं. अशात नागपुरात येणारा टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला आहे. २२ हजार कोटींचा हा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याने पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारवर टीका सुरू झाली आहे. अशात आता ३० ऑक्टोबरला म्हणजेच येत्या रविवारी या प्रकल्पाचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in