CM Eknath Shinde and DCM Devendra Fadnavis
CM Eknath Shinde and DCM Devendra FadnavisMumbai Tak

Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लाऊन बसलेल्या नेत्यांना फडणवीसांचा मेसेज

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी दिवाळीनिमित्त अनौपचारिक गप्पा मारल्या

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार हा प्रश्न सातत्यानं विचारला जात आहे. तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्वच कॅबिनेट मंत्र्यांकडे दोन किंवा अधिक खात्यांचा पदभार आहे. त्यामुळे मंत्र्यांवर खात्याच्या जबाबदारीचं मोठं ओझं असल्याचं दिसून येत. अखेर या कामाच्या ओझ्याला स्वतः फडणवीसच वैतागले आहेत. त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्तार गरजेचा असून तो लवकरात लवकर होणार असल्याचं स्पष्ट केलं.

देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी दिवाळीनिमित्त अनौपचारिक गप्पा मारल्या, त्यावेळी त्यांना राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल प्रश्न विचारण्यात आला. फडणवीस म्हणाले, हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार करण्यात येईल. राज्यमंत्री तरी लवकर दिले पाहिजेत. खूप त्रास होतो. फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर या हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

वर्षा की सागर?

यावेळी पत्रकारांनी पुन्हा मुख्यमंत्री होणार का? या अर्थाने देवेंद्र फडणवीस यांना वर्षा बंगला की सागर बंगला असा प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल उत्तर दिलं. ते म्हणाले, वर्षा ते सागरचा प्रवास म्हणजे वर्षा शेवटी सागराला जाऊन मिसळते. त्यामुळे शेवटी तुम्ही कुठे राहता हे महत्वाचं नाही, पण तर तू तुम्ही काम काय करता हे महत्वाचं आहे, असं उत्तर दिलं.

शिंदे गट - अपक्षांना मंत्रिमंडळ विस्ताराचे वेध

महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यानंतर पहिला मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर हा छोटेखानी विस्तार आटोपण्यात आला. त्यामुळे मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांचा पत्ता कट झाला. शिंदे गटातील अनेक जण मंत्रिमंडळात संधी मिळणार, यामुळे आनंदात होते. मात्र, ऐनवेळी त्यांना बाहेरच राहावं लागलं.

दुसरीकडे शिंदे गटासोबत गेलेल्या अपक्षांनाही मंत्रिपदाची आस होती. पण, भाजप आणि शिंदे गटाने अपक्षांनाही मंत्रिमंडळ विस्तारात स्थान दिलं नाही. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्यानं आमदार नाराज असल्याची चर्चा सातत्यानं होत आहे. संजय शिरसाट, बच्चू कडू यांच्यासह काहींनी त्यांची नाराजी जाहीरपणे बोलूनही दाखवली आहे. त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ विस्तार हा शिंदे-फडणवीसांठी कसरतीचा ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
logo
Mumbai Tak
www.mumbaitak.in